आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१९ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
शेतकऱ्यांच्या विश्वासाप्रती
शिवसेना बांधील असून, सरकारनं शेतकऱ्यांशी अहंकारानं वागू नये असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख
उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना
कार्यकारिणीची काल मुंबईत बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.
****
राज्य मंत्रिमंडळात सदाभाऊ
खोत यांचं स्थान कायम असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते
काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून
बाहेर काढल्यामुळे त्यांना मंत्रिपदावरुन दूर करावं अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष खासदार
राजू शेट्टी यांनी केली होती.
****
बंजारा समाजातर्फे काल औरंगाबाद
इथं मोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात हनुमंतखेडा इथं
अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या या मोर्चात बंजारा बांधव मोठ्या संख्येनं
सहभागी झाले होते.
****
परभणी इथं कृषी विभागात कार्यरत
कृषी सहाय्यक संदीप मानोलीकर याला पाच हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक
पथकानं काल रंगेहाथ पकडलं. शासनाकडून मंजूर अनुदान मिळण्यासाठी शेती तपासणी अहवाल देण्याकरता,
त्यानं लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मातंग समाजानं उच्च शिक्षणाची
कास धरून दारिद्र्य रेषेतून वर यावं हीच अण्णाभाऊ साठे यांना खरी श्रद्धांजली ठरेल,
असं मत माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. मातंग समाज प्रबोधन
परिषदेच्या वतीनं जालना इथं आयोजित मातंग समाज प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. नगराध्यक्षा
संगीता गोरंट्याल यांनी यावेळी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जालना शहरात
कलाभवन उभारण्याची घोषणा केली.
****
हिंगोली इथं परवा रात्री
झालेल्या हाणामारीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. या
प्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment