Saturday, 5 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 05.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

भारताच्या १३व्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी आज मतदान सुरू असून, मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम वेंकय्या नायडू आणि विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नागरी व्यवहार, गृहनिर्माण, माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री म्हणून काम केलं आहे, तर गोपालकृष्ण गांधी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू असून, त्यांनी पश्चिम बंगालचं राज्यपालपद भुषवलेलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या सोपोर भागात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. केंद्रीय राखीव पोलिस दल, लष्कर आणि पोलिसांच्या पथकानं काल रात्रीच्या सुमारास या भागात शोधमोहीम सुरु केली होती. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि स्फोटकं सापडल्याचं एका वरीष्ठ अधिकार्यांनं सांगितलं. या चकमकीत एक पोलिस जखमी झाला.

****

संसदेचं काम परिणामकारकपणे व्हायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते संसद सभागृहात रालोआचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार वेंकय्या नायडू यांच्या भाषण संग्रहाचं विमोचन करताना बोलत होते. येणारा पाच वर्षांचा कालावधी हा देशासाठी खूप महत्वाचा असून, या काळात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे असतील, ही चांगली बाब असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जीएसटी परिषदेची आज बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या, नफेखोरीविरोधातल्या तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठीच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीला मंजूरी देण्यात येणार आहे. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्पादकांना, जीएसटीमधल्या कराच्या बचतीचे फायदे ग्राहकांना देण्यास सांगितलं आहे.

****

नक्षलवादाचा सामना करण्यासाठी सुरक्षा आणि विकासावर आधारित एक सर्वंकष धोरण राबवलं जाईल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत नक्षलग्रस्त भागात विकास प्रकल्प आणि सुरक्षेसंबंधातल्या मुद्द्यांचा आढावा घेत असताना बोलत होते. मात्र नक्षलवादाचा सामना करत असताना स्थानिक लोकांच्या अधिकारांच संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही ते म्हणाले. या बैठकीत रस्ते, विकास प्रकल्प, हवाई जोडणी, विद्युत, शिक्षण, आरोग्य आणि बँकींगसंदर्भातल्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

****

पाकिस्तानमध्ये जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याला भारताविरोधी दहशतवादी कारवाया करण्यासाठी मिळत असलेलं स्वातंत्र्य ही काळजीची बाब असल्याचं भारतानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं अशा दहशतवाद्यांविरोधातल्या आंतरराष्ट्रीय बंधनांचं शंभर टक्के पालन केलं पाहिजे, असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. सईदची दहशतवादी संघटना केवळ भारताविरोधातच नव्हे तर इतर राष्ट्रांविरोधातही दहशतवादी कारवाया करत असल्याचं ते म्हणाले.

****

सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्याच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करणार्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या चिखलदा इथं त्या उपोषण करत आहेत. पाटकर आणि अन्य ११ कार्यकर्त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला असून, त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

कोपर्डी इथल्या बलात्कार आणि खून प्रकरणातला आरोपी संतोष भोवाळला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात आता केवळ एका साक्षीदाराची साक्ष होणार आहे. आरोपीला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यावरील पुढची सुनावणी १७ ऑगस्टला होणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा एसटी बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे. त्यासाठी बसस्थानके, बसथांबे इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचा-यांची नियुक्ती करून प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा तिसर्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. रविचंद्रन अश्विननं पाच, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर उमेश यादवनं एक बळी घेतला. श्रीलंकेची फलंदाजी सुरु झाली असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या एक बाद पाच धावा झाल्या होत्या. भारत ४३४ धावांनी आघाडीवर आहे.

****


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...