Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** नैसर्गिक वायूसह पेट्रोलियम उत्पादनांवर मूल्यवर्धित कर - व्हॅटचे दर कमी करावेत
- केंद्रीय अर्थमंत्र्यांचं राज्य सरकारांना आवाहन
** शेतकऱ्यांच्या विश्वासाप्रती शिवसेना
बांधील; सरकारनं शेतकऱ्यांशी अहंकारानं वागू नये - पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
** गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणं हाताळण्यासाठी
२४ जलदगती न्यायालयं स्थापन करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
आणि
** येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद महापालिका शहरातली ब वर्गातली धार्मिक स्थळांची
अतिक्रमणं हटवणार
****
नैसर्गिक वायूसह पेट्रोलियम उत्पादनांवर मूल्यवर्धित कर - व्हॅटचे दर कमी करण्याचं
आवाहन, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं
आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू झाल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांच्या मूल्यामुळे
वस्तूंचा उत्पादन खर्च वाढण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. जीएसटीपूर्वी पेट्रोलियम
उत्पादनं आणि त्यांचा वापर करून बनवलेल्या वस्तूंवर व्हॅट आकारला जात होता. आता सर्व
वस्तूंवर जीएसटी आकारला जातो मात्र, पेट्रोलियम उत्पादनांवर व्हॅट आकारला जात असल्यामुळे
वस्तूंच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं, जेटली यांनी हे निर्देश दिले.
****
शेतकऱ्यांच्या विश्वासाप्रती शिवसेना बांधील असून, सरकारनं शेतकऱ्यांशी अहंकारानं
वागू नये असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. २०१९ च्या लोकसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकारिणीची काल मुंबईत बैठक झाली, त्यानंतर
पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. कर्जमाफीचे आकडे सरकारनं पटवून द्यावेत, असं सांगत
ठाकरे यांनी, देशाचं संरक्षण मंत्रिपद केंद्र सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवं, असं
नमूद केलं.
****
सत्तेचा भार सांभाळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शालीनता आणि विनम्रता
गहाळ झाल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलत होते. कर्जमाफी योजना जाहीर करुनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या
नाहीत, यावरुन शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही हे स्पष्ट होत असल्याचं सावंत
म्हणाले.
****
राज्य मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत यांचं स्थान कायम असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. खोत यांना स्वाभिमानी
शेतकरी संघटनेतून बाहेर काढल्यामुळे त्यांना मंत्रिपदावरुन दूर करावं अशी मागणी संघटनेचे
अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. त्यावर पाटील यांनी, खासदार शेट्टी राष्ट्रीय
लोकशाही आघाडीतच राहणार असतील तर त्यांना केंद्रातही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली.
****
सर्वांसाठी घर योजनेसाठी भविष्य निर्वाह निधीतून घेतलेल्या गृहकर्जावर दोन लाख
साठ हजार रुपये व्याज अनुदान दिलं जाईल, असं केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय
यांनी सांगितलं आहे. काल तामिळनाडूमध्ये एका गृहकर्ज योजनेचा प्रारंभ करतांना त्यांनी
ही माहिती दिली.
****
दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांचा ‘मासिक बाल संगोपन भत्ता’ दुपटीनं वाढवण्याचा
निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या महिलांना आता दरमहा तीन हजार रुपये बाल संगोपन
भत्ता मिळणार आहे. पहिल्या दोन अपत्यांसाठी, बालकाच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंत
हा भत्ता दिला जाणार आहे.
****
राज्यातल्या हरित धवल क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या
पुण्यतिथीनिमित्त काल विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला राज्य विधिमंडळाचे
प्रधान सचिव अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी विधिमंडळातले
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
१४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातल्या गंभीर स्वरूपाच्या
गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरीता २४ जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय
राज्य शासनानं घेतला आहे. या अंतर्गत मराठवाड्यात लातूर, बीड, माजलगाव, नांदेड, मुखेड,
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा, भूम या ठिकाणी न्यायालयांची स्थापना करण्यात येणार
आहे. पाच वर्षांसाठी ही न्यायालयं कार्यरत राहणार आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात १८ अतिरिक्त न्यायालयं स्थापन करण्याचा
निर्णयही शासनानं घेतला आहे. या अंतर्गत औरंगाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यांत न्यायालयं
स्थापन होणार आहेत.
****
येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद शहरातली ब वर्गातली धार्मिक स्थळांची अतिक्रमणं
हटवणार असल्याचं, औरंगाबाद महापालिकेनं म्हटलं आहे. यासंदर्भात महापालिकेनं काल मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र सादर केलं. त्यात महापालिकेनं अतिक्रमणं
हटवण्याचा कृती कार्यक्रम सादर केला आहे.
****
नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगावजवळ चारचाकी गाडी दुभाजकाला धडकून झालेल्या
अपघातात तीन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मृत
आणि जखमी सर्वजण आंध्र प्रदेशातल्या कुर्नूलचे रहिवासी आहेत. जखमींना नांदेड इथं जिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
जवळपास महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस
कालपासून मराठवाड्यात सक्रीय झाला आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल रात्री पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या. परभणी शहरातही काल रात्री दमदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
दरम्यान, मराठवाडयासह राज्यात काही ठिकाणी
येत्या २३ तारखेपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानी वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात
आला आहे. आपतकालीन प्रसंग उदभवल्यास नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन ही प्रशासनानं
केलं आहे.
****
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळूनही
तो निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना, येत्या २२ ऑगस्टपर्यंत, प्रवेश निश्चित करता
येणार आहेत. प्रवेश निश्चित करण्याची या शैक्षणिक वर्षातली ही शेवटची संधी असून, यानंतर
प्रवेशाची कोणतीही फेरी राबवणार नसल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात
आलं आहे. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरच्या नगराध्यक्षपदासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरची सुनावणी येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणार
आहे. हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं दिल्यानंतर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं
आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये मुंबई इथं झालेल्या सोडतीत हे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला
प्रवर्गासाठी जाहीर झालं होतं. त्यानंतर नगरविकास विभागाने यात बदल करून ते सर्वसाधारण
गटासाठी खुलं करण्याचा निर्णय घेत, निवडणूक विभागाच्या राजपत्रात तशी नोंद केली. त्याविरुद्ध
न्यायालयात हे आव्हान देण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाचे २०१४-१५ आणि २०१५-१६चे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट
ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार काल जाहीर झाले. २०१४-१५
साठीच्या शहरी विभाग पुरस्कारांमध्ये परभणीतल्या सत्यशारदा सार्वजनिक वाचनालय, आणि औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथल्या बाळासाहेब पवार
सार्वजनिक वाचनालयाचा समावेश आहे. ग्रामीण विभागाचा पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या धावज्याची
वाडी इथल्या शिवछत्रपती वाचनालयानं पटकावला आहे.
२०१५-१६ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट
सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारांमध्ये शहरी विभागातला ड वर्ग पुरस्कार परभणीतल्या ज्ञानसागर
सार्वजनिक वाचनालयाला तर ग्रामीण विभागातला पुरस्कार लातूर जिल्ह्यात आलमला इथल्या
विवेकानंद वाचनालयाला जाहीर झाला आहे .
****
शासनाने पिकांचे पंचनामे तत्काळ करून दुष्काळ जाहीर करावा,
या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर फुलंब्री इथं काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं
रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत, शेतकरी पाल्याची
शालेय शुल्क माफी, आदी प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment