Friday, 1 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 01.09.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०१ सप्टेंबर २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

केंद्रीय मंत्रीमंडळातल्या संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नवीन मंत्र्यांचा समावेश करणार असल्यामुळे आणखी काही मंत्री राजीनामा देण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय जलसंधारण राज्यमंत्री संजीव बालियान यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महसूल ज्ञान संगम २०१७ या वार्षिक संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या संमेलनात कर प्रशासकांना संबोधित करणार आहेत. महसूलात वाढ होण्यासाठी आणि महत्वपूर्ण क्षेत्रात कायदा आणि नियम प्रभावीपणे लागू होण्यासाठी अधिकार्यांमध्ये दुहेरी संबंध प्रस्थापित करणं, हा या संमेलनाचा उद्देश आहे.

****

मुंबईतल्या जेजे मार्गावरील भेंडीबाजार भागात काल सकाळी पाच मजली रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ३४ झाली आहे. सुमारे सव्वाशे वर्ष जुन्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ४० जणांना बाहेर काढण्यात आलं असून, उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  सभापतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्या विरूध्द भाजपाचा अविश्वास प्रस्ताव १३ विरूध्द शून्य मतांनी मंजूर झाला होता, त्यामुळे ही निवडणूक घेण्यात येत आहे.

****

आधार क्रमांक कायम खाते क्रमांक - पॅन शी जोडण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हे दोन्ही क्रमांक परस्पर संलग्न करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख होती. बॅंक खातं तसंच मोबाईल सिमकार्ड सह घरगुती वापराच्या गॅसचं अनुदान घेण्यासाठी वापरला जाणारा आधार क्रमांक, आता आयकर विवरण पत्र सादर करण्यासाठीही अनिवार्य आहे.

****

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातल्या ५१ अंगणवाडी सेविकांना काल केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं. यामध्ये राज्यातल्या तीन अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...