Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.
****
केंद्रीय
मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, चार कॅबिनेट आणि नऊ राज्यमंत्र्यांना आज राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र
प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली असून, त्यांनी
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशमधले राज्यसभा सदस्य शिव प्रताप शुक्ल,
बिहारचे अश्विनी कुमार चौबे, राजकुमार सिंग, मध्य प्रदेशचे डॉ. विरेंद्र कुमार, कर्नाटकचे
अनंत कुमार हेगडे, सत्यपाल सिंह, राजस्थानचे गजेंद्र शेखावत, के अल्फोन्स आणि हरदीप
पुरी यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह
सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी नवीन मंत्र्यांचं अभिनंदन केलं. या मंत्र्यांचा अनुभव मंत्रिमंडळाला
होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या मंत्र्यांना खातेवाटप लवकरच होणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी मंत्रालय सोडण्याचे संकेत दिले असून, त्यांनी
ट्विटरवरुन रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि म्यानमार
या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. चीनमधल्या झीयान शहरात होणाऱ्या ९ व्या ब्रीक्स
शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. प्रबळ ब्रिक्स भागीदारीसाठी आपण चीनसह पाचही
सदस्य देशांशी एकत्रित विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा करणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं
आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्यानं
लष्कराच्या चौक्या आणि रहीवाशी भागांना लक्ष्य केलं. सीमेवर तैनात भारतीय जवानांनीही
या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं.
****
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीट मध्ये उत्तीर्ण न झाल्यानं तामिळनाडूमधल्या
एका विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हजारो विद्यार्थी
आंदोलन करत आहेत. चेन्नईत विद्यार्थ्यांनी व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनेक जागांवर
नाकेबंदी करण्यात आली असून, आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. अनिता असं या विद्यार्थीनीचं
नाव असून, तीनं नीट परिक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र
तिच्या बाजूनं निकाल न लागल्यानं तीनं गेल्या शुक्रवारी आत्महत्या केली.
****
विमुद्रीकरणानंतर
ज्या व्यक्ती आणि व्यापारी संस्थांनी दोन लाख कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली
आहे, त्यांनी कधीही प्राप्तीकर विवरणपत्र सादर केलं नव्हतं, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय
अर्थ मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अशा व्यक्ती आणि
संस्थांची संख्या २२ लाख २२ हजार इतकी आहे. रोख रक्कम जमा करणार्या व्यक्तींपैकी एक
तृतीयांश जणांनी त्यांचा उत्पन्नाचा तपशील सादर केला नसल्याचंही याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात
तूर खरेदी गैरप्रकाराची संपूर्ण चौकशी करून दोषींविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
तसंच निकषात बसूनही ज्यांची तूर खरेदी झाली नाही त्यांची खरेदी होण्यासाठीही प्रयत्न
करू असं आश्वासन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिलं आहे. खासदार राजीव सातव यांच्यासह
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
ज्या शेतक-यांची नावं संबंधीत यादीत नव्हती, त्यांनी घोषणापत्र दाखल केलं नाही, तरीही
त्यांची तूर खरेदी झाली, मात्र घोषणापत्र देऊनही अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित
आहेत. त्यांना शासनानं न्याय द्यावा, अशी मागणी
सातव यांनी केली.
जालना इथंही तूर
खरेदी घोटाळा प्रकरणात ७८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबादच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं उत्कृष्ट संशोधनासाठी देण्यात
येणाऱ्या नॅशनल रिसर्च प्रोफेसर पुरस्काराचं वितरण उद्या नवी दिल्लीच्या राष्ट्रीय
भौतिकशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पी.के.अस्वाल यांच्या
हस्ते केलं जाणार आहे. प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र सिरसाठ, डॉक्टर के.एम.जाधव, डॉक्टर रामफल शर्मा, रसायनशास्त्र विभागाचे
डॉक्टर सी.एच.गील, डॉक्टर बापू शिंगटे, संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर के.व्ही.काळे,
ग्रंथालयशास्त्र विभागाच्या डॉक्टर वैशाली खापर्डे आणि रसायनतंत्रज्ञान विभागाचे डॉक्टर अनिकेत सरकटे
यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान
सुरु असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज कोलंबो
इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधीचे
चारही सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment