Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.
****
पहिल्या तिमाहित एकूण देशांतर्गत
उत्पन्नाचा वृद्धीदर पाच पूर्णांक सात टक्के असणं ही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब
असून, हे अर्थव्यवस्थेसाठी एक आव्हान असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं
आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीपूर्वी उत्पादक हे त्यांच्या जवळचा साठा संपवण्यासाठी
प्रयत्नशील राहिल्यामुळे वृद्धीदरात घट नोंदवली गेली असल्याचं त्यांनी नमूद केलं. या
काळात सेवा क्षेत्रात आणि गुंतवणूकीत सुधारणा झाली असली तरी जी एस टीमुळे उत्पादन क्षेत्रावर
परिणाम झाला असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे येत्या कालावधीत सरकारला धोरण आणि गुंतवणूकीच्या
दृष्टीकोनातून काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि स्वित्झर्लंड या
राष्ट्रांनी कर चुकवेगिरी आणि करांमधल्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठीचे सहकार्य अधिक
वृद्धींगत करण्यावर भर दिला आहे. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा डोरिस लुथार्ड या सध्या
भारताच्या दौ-यावर असून दोन्ही देशांनी एकमेकांमध्ये आपोआप माहितीच्या देवाणघेवाणीसाठीच्या
करारावर स्वाक्षऱ्या केल्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. लुथार्ड आणि पंतप्रधान मोदी
यांच्या भेटीनंतर जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
स्वित्झर्लंडनं करांच्या बाबत माहिती देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत भारतानं समाधान
व्यक्त केलं, तसंच स्वित्झर्लंड जागतिक स्तरावरील करारांचीही योग्य प्रकारे अंमलबजावणी
करेल, अशी आशाही व्यक्त केली.
****
माजी गृहसचिव राजीव महर्षी
यांची देशाचे महालेखा परिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. शशीकांत शर्मा यांचा कार्यकाळ
या महिन्याच्या ३० तारखेला संपत असल्यामुळे त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. याबाबत
औपचारिक आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अश्विनी अत्त्री, अनिता पटनाईक
आणि रंजनकुमार घोष यांची उपमहालेखा परिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, माजी माहिती आणि
प्रसारण सचिव सुनिल अरोरा यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात
आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अरोरा यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं
आहे.
****
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी
राजीव कुमार यांची वित्त सेवा विभागाचे सचिव म्हणून, तर अनिता कारवाल यांची केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. कुमार हे सध्या कार्मिक
मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहे. वित्त सेवा विभागाकडून बँका, वित्त संस्था,
आयुर्विमा कंपन्या आणि राष्ट्रीय विमा कंपन्यांचं काम बघितलं जातं.
****
नागपुर - मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस आसनगाव
- वासिनाड स्थानकादरम्यान रुळावरुन घसरल्यामुळे नांदेड, औरंगाबादमार्गे सिकंदराबादहून
मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. परिणामी मुंबईहून येणारी
मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते नागपूर नंदिग्राम एक्सप्रेस तसंच मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसही
आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण
मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पाच सप्टेंबर पर्यंत विनाविलंब
शुल्कासह विद्यापीठात प्रवेश घेता येणार आहेत.
याशिवाय विद्यार्थ्यांना शंभर रुपये विलंब
शुल्कासह सहा ते १५ सप्टेंबर पर्यंत, तर पाचशे रुपये विलंब शुल्कासह १६ ते ३० सप्टेंबर
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र कृषिविज्ञान
विद्याशाखा आणि बी.एडच्या प्रवेशासाठी ही मुदतवाढ नसल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात
आलं आहे.
****
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स
- सीटूचं पहिलं श्रमिक साहित्य संमेलन येत्या दहा आणि अकरा सप्टेंबरला जालना इथं आयोजित
करण्यात आलं आहे. संमेलनाचे निमंत्रक सुभाष थोरात यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसीय
संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार
असून, यात विविध विषयांवरील परिसंवादात नामवंत वक्ते आणि चळवळीतले नेते मार्गदर्शन
करणार आहेत.
****
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या छोट्या धरणांमधून गोदावरी नदीपात्रात
पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं जायकवाडी
धरण आता जवळ जवळ ७८ टक्के भरलं आहे. धरणात सध्या ४२ हजार ६९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याची आवक सुरु आहे.
****
जर्मनीतल्या हॅम्बर्ग इथं सुरु असलेल्या
जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गौरव बिधूडीनं कांस्य पदक पटकावलं.
यापूर्वी शिव थापा, विकास कृष्ण आणि विजेंद्र सिंह यांनीही या स्पर्धेत कांस्य पदक
जिंकलं आहे.
****
No comments:
Post a Comment