Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
देशाचा विकास करण्यासाठी,
तसंच गरीबी, भ्रष्टाचार आणि कर्जबाजारीपणातून मुक्तीसाठी आता संग्राम करायचा असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज मराठवाडा मुक्तीसंग्राम
दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. औरंगाबाद या ऐतिहासिक शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची,
तसंच मराठवाड्यातल्या सर्वच शहरांचा विकास करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे
आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद इथं पालकमंत्री
दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाचा
शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करायला पाहिजे, असं रावते यावेळी म्हणाले.
****
जालना इथं टाऊन हॉल उद्यानातल्या
हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
झालं. या वेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचा लोणीकर यांनी सत्कार केला.
****
बीड इथं प्रियदर्शिनी उद्यानातल्या
स्मृतिस्तंभाजवळ जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तत्पूर्वी
जिल्हाधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
नांदेड इथं पालकमंत्री
अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. खोतकर यांनी यावेळी स्वातंत्र्य सेनानी
आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन, मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
औरंगाबाद शहराल्या वेदांत
नगर आणि पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचं उद्घाटन, आणि सौर ऊर्जा दालनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. यावेळी कायदा सुव्यवस्था बंदोबस्ताकरता ड्रोन कॅमेरा, ऑपरेशन ऑलआऊट आदींबाबत
सादरीकरण करण्यात आलं. ड्रोन कॅमेरा प्रणाली, विशेष पोलीस अधिकारी हा औरंगाबाद पोलिसांचा
स्तुत्य उपक्रम असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी
राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं सांगितलं.
****
केंद्रीय सूचना आणि प्रसारण
मंत्रालयानं खासगी वाहिन्या, रेडियो आणि सामुदायिक रेडियो केंद्रांना स्वच्छता अभियानाला
महत्वाचं स्थान देण्याचं आवाहन केलं आहे. स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचं रुप देण्यासाठी
माध्यमांनी स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणं गरजेचं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं
आहे.
****
वीज निर्मिती केंद्रांना
कोळशाच्या उपलब्धतेत आणि पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरतं भारनियमन
करण्यात येत आहे, त्यामुळे कृषी ग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात
आला आहे. पुरेशी वीज उपलब्ध होताच कृषीपंपांचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येईल, असं
महावितरणनं स्पष्ट केलं आहे. वीजेची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही
महावितरणनं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण
इथल्या जायकवाडी धरणातला पाणी साठा सुमारे ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या
१८ हजार १७० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
लातूर जिल्ह्यातल्या मांजरा
प्रकल्पात ८५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास
धरण भरण्याची शक्यता असल्यानं, नदीकाठच्या गावांना सतर्क रहाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं
केलं आहे.
दरम्यान, मराठवाड्यात आजही
अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात पाऊस सुरु आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
कोपर्डी इथल्या अत्याचार आणि खून खटल्यातल्या सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी
पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या १० ऑक्टोबरपासून खटल्याच्या अंतिम सुनावणीस सुरवात
होणार आहे. न्यायालयामध्ये 'सीडी' सादर करणारे 'यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण
यांची सरकार पक्षातर्फे आज उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले
यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या
चिखली इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अज्ञात इसमानं दगडफेक केल्यानं तणाव
निर्माण झाला आहे. यामुळे शहरातले सर्व दुकानं बंद करण्यात आले असून, दगडफेक करणाऱ्याला
पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बंदचं आवाहन करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं
कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम
सामन्यात सिंधूनं जपानच्या नोजोमी ओकुहराचा २२-१०, १९-२१, २१-१८ असा पराभव केला.
*****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात
होत असून, पहिला सामना चेन्नई इथं एम चिदंबरम मैदानावर होणार आहे. दुपारी दीड
वाजता सामन्याला
सुरुवात होईल. श्रीलंकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारातले
सर्व सामने नुकतेच जिंकल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.
****
No comments:
Post a Comment