Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
** शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची
रक्कम १५ ऑक्टोबर
पासून हस्तांतरित करण्यात येणार - कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर
** खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इकबाल कासकरसह
तिघा जणांना आठ दिवसांची
पोलीस कोठडी
** शासकीय कामकाजात परिवर्तन
घडून आणण्यासाठी निवडक योजनांमध्ये मलेशियाच्या पेमांडू संस्थेनं विकसित केलेली बीग
फास्ट रिझल्टस् ही कार्यपद्धती स्वीकारण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी
** पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात
पाणी सोडल्याची सोशल मिडियावरुन अफवा
आणि
** पतंजली योगपीठाचे मराठवाडा
प्रमुख, मिलिंद शुक्ल यांचं निधन
****
कर्ज
माफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची मंजूर रक्कम १५ ऑक्टोबर पासून
हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल सांगितलं.
मुंबई इथं कर्ज मर्यादा ठरवण्यासाठीच्या
उपसमितीची बैठक घेतल्यानंतर पीटीआयला त्यांनी ही माहिती दिली.
सरकार
दिवाळीपूर्वी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करू इच्छित असल्याचं ते म्हणाले. १५
ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या पडताळणी झालेल्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची
रक्कम भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर सदरील बँका ही रक्कम कर्जरकमेपोटी
वळती करुन घेतील. अन्य शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी झाल्यानंतर लगेचच त्यांच्या
खात्यातही कर्जमाफीची रक्कम भरली जाईल असं ते म्हणाले.
कर्जमाफी
झालेल्या शेतकऱ्यांची यादीचं गावामध्ये सार्वजनिक वाचन करण्याचा सरकारचा विचार आहे.
यामुळे कर्जमाफी झालेल्या पात्र शेतकऱ्यांची तपासणी होईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख
यांनी सांगितलं. मात्र याबाबत अद्याप
निर्णय घेण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर
याच्यासह तीन आरोपींना ठाणे न्यायालयानं काल आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाण्यातल्या
एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी सोमवारी कासकरसह तिघांना ताब्यात
घेतलं होतं. जैन नामक या व्यावसायिकानं घोडबंदर मार्गावर २०१३ साली सदनिका प्रकल्पांसाठी
जागा घेतली होती, मात्र कासकर यानं ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत जैन यांना
जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच या प्रकल्पातल्या चार सदनिका आणि ३० लाख रुपये खंडणीही
मागितली होती. त्यामुळे जैन यांनी कासकरविरुद्ध तक्रार दाखल केली. या खंडणी प्रकरणात
काही राजकीय नेत्यांची नावंही समोर आली आहेत, असं ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी
काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
शासकीय कामकाजात परिवर्तन घडून आणण्यासाठी शालेय शिक्षण,
पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसंच सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागाच्या निवडक योजनांमध्ये
मलेशियाच्या परफॉर्मन्स मॅनेजमेंट आणि डिलीवरी युनिट- पेमांडू संस्थेनं विकसित केलेली
बीग फास्ट रिझल्टस् ही कार्यपद्धती स्वीकारण्यास राज्य मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली.
या कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीमुळे आरोग्य विभागाला बाल मृत्युचे प्रमाण कमी होण्यास
मदत होईल, असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं.
राज्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यासाठी विविध स्तरावर
स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांवर शासकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यास आणि अभियानाच्या
अंमलबजावणी संदर्भात सहकार्य करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये
महाराष्ट्र पर्यटन धोरणाशी सुसंगत सुधारणा करायलाही यावेळी मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची मुंबई,
पुणे, नागपूर इथं पुढच्या दोन वर्षासाठी खंडपीठं
स्थापन करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी
किमान दोन पंचमांश सभासदांनी लेखी विनंती करणं आवश्यक करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा
परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या
नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडल्याची अफवा काल सोशल मिडियावरुन पसरवण्यात
आली. यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या
अफवेच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार महेश सावंत यांनी काल एक बैठक घेऊन ही अफवा असल्याचं
सांगितलं. त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, राज्यात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात दुपारी मुसळधार पाऊस झाला.
सातारा, कोकणातही सगळीकडे मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन
विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला असून राधानगरी
धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दुपारी काही वेळ जोरदार पाऊस
झाला. पुढच्या २४ तासांत राज्यात मुसळधार
पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
वैजापूर ते कोपरगांव आणि औरंगाबाद ते चाळीसगाव या लोहमार्गास निधी देण्याची मागणी औरंगाबादचे
आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश
प्रभू औरंगाबाद इथं आले असता, त्यांनी नांदेड विभाग हा मध्य रेल्वेस
जोडण्याची, तसंच वैजापूर ते कोपरगाव आणि औरंगाबाद ते चाळीसगांव
लोहमार्गाला निधी देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे या कामाचा
पाठपुरावा करण्याची मागणी सावे यांनी या निवेदनात केली आहे.
****
पवन ऊर्जेपासून एक हजार २७५ मेगावॅट वीज निर्मिती होत असून, त्यामुळे औरंगाबाद शहरातलं भारनियमन तात्पुरतं
बंद करण्यात आलं आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर
यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरसेवकांसोबत
बैठक घेऊन वीज चोरी बंद करण्यासाठी जनजागृती करण्याकरता अभियान राबवण्यात येणार असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पतंजली योगपीठाचे मराठवाडा प्रमुख, पतंजली उत्पादनांचे मराठवाडा वितरक,
तसंच बांधकाम व्यावसायिक मिलिंद शुक्ल यांचं काल पहाटे निधन झालं. शुक्ल गेल्या काही दिवसांपासून आजारी
होते, त्यांच्यावर पुण्याच्या रूबी रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं प्रतापनगर
इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
जालना जिल्ह्यातल्या बहुतांशी शेतकऱ्यांनी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आपल्या जमिनी शासनाला देण्यास अनुकुलता दर्शवली
आहे. काल सात शेतकऱ्यांच्या जमिनींची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आणखी
१०५ शेतकऱ्यांच्या जमिन खरेदीची प्रक्रिया येत्या आठवडाभरात पूर्ण केली जाणार असल्याचं
रस्ते विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश मनियार यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या
सलगरा गावात आईसह तीन मुलींचा शेतातल्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागचं
कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना इथल्या नितीन ताराचंद या व्यावसायिकाची
काल अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. खंडणीच्या कारणावरुन ही हत्या झाल्याचं पोलिस
सूत्रांनी सांगितलं. ताराचंद दुपारी ४ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले असतांना एका
मोटारसायकलवर आलेल्या मारेकऱ्यांनी कटरिया यांच्यावर तलवारीनं वार केले. कटारिया यांचा
जागेवरच मृत्यू झाला. संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं असल्याचं पोलिस सूत्रांनी
सांगितलं
****
यशवंतराव
चव्हाण स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार
काल अंबाजोगाई इथं ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथ नेरळकर यांना प्रदान करण्यात आला.
जेष्ठ विचारवंत डॉ जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
२५ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
शाळेतल्याच
एका शिक्षकाचे वेतन आणि महागाई भत्याचे बिल काढण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेतल्याच्या
आरोपावरून लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या उजनी इथल्या सावित्रीबाई फुले प्राथमिक
शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चंद्रकात डोकडे यांना काल लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी
रंगेहाथ पकडलं.
****
No comments:
Post a Comment