Tuesday, 5 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 05.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ० सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** गणेशोत्सवासह सार्वजनिक उत्सवांमध्ये ध्वनिक्षेपकांच्या वापरावर बंदी घालणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

** येत्या १४ ऑक्टोबरला जाहीर ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची काँग्रेसची मागणी 

** आज अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी सर्वत्र चोख व्यवस्था

आणि

** डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधक प्राध्यापक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी उपकेंद्राचं उद्घाटन

****

गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये ध्वनिक्षेपकांच्या वापरावर बंदी घालणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला, सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, यांच्या पीठानं काल हा आदेश दिला. मुंबई ध्वनिपदुषण मुक्त परिसर राखण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या शुक्रवारी, ध्वनिक्षेपकाच्या वापरावर बंदी घातली होती. त्यानंतर राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं प्रतीपक्षाला नोटीस जारी करत, हा आदेश दिला.

****

स्थावर मालमत्ता नियमन कायदा - रेराला आव्हान देणाऱ्या याचिका जलद गतीनं निकाली काढाव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. तसंच देशात  रेरा विषयी याचिका जिथे प्रलंबित असतील तिथं मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा येण्याची वाट पाहावी, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात गेल्या तीन वर्षात ग्रामीण भागात अकरा लाख घरांची निर्मिती करण्यात आली असून शहरांमध्येही  मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यावर भर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात काल ते बोलत होते. महारेराच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्रात नियामक प्राधिकरण स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्यस्तरीय लोकशाही दिनातून जनतेच्या आतापर्यंत ९९ टक्क्यांहून अधिक तक्रारी दूर करण्याचं काम सरकारनं केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल झालेल्या शंभराव्या ऑनलाईन लोकशाही दिनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १८ तक्रारींवर तत्काळ निर्णय घेतले. यामध्ये बीड, औरंगाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यातल्या तक्रारींचा समावेश होता. जालना जिल्ह्यातल्या पानेवाडी इथले माणिकराव अवघड यांना शेततळ्याचं अनुदान मिळालं नसल्याच्या तक्रारीची, तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

****

येत्या १४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. १४ ऑक्टोबर रोजी धम्म प्रवर्तन दिन असून, या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी नागपूर इथं दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी जात असल्यामुळे निवडणुकांची तारीख बदलावी असं ते म्हणाले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या आठ सप्टेंबरला मराठवाडा दौऱ्यावर येत असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.  

****

आज अनंत चतुर्दशी. गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. मराठवाड्यात सर्वत्र गणेश विसर्जनासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, विसर्जनासाठी ठराविक जागा नेमून दिल्या आहेत. औरंगाबाद इथल्या श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे सकाळी अकरा वाजता संस्थान गणपती इथून मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. शहरात औरंगपुरा भागात जिल्हा परिषद मैदानावर मुख्य विर्सजन विहीर असून शिवाजीनगर, हडको एन १२, हर्सुल, सातारा परिसर, चिकलठाणा, संर्घषनगर, मुकुंदवाडी याठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

परभणी इथं महापालिकेच्यावतीनं घरगुती गणेशमूर्तींचं संकलन करून, त्यांचं विसर्जन केलं जाणार आहे. प्रभाग समिती अ अंतर्गत विसावा क्वॉर्नर इथं, प्रभाग समिती क अंतर्गत दुर्गा माता मंदिर आशीर्वाद नगर इथं, तर प्रभाग समिती ब अंतर्गत कृत्रीम रेशीम केंद्र कार्यालय इथं गणेशमूर्ती जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जलशुद्धीकरण केंद्राजवळ तयार केलेल्या हौदातच गणेशभक्तांनी गणपती विसर्जन करण्याचं आवाहन मनपा आयुक्त राहूल रेखावार यांनी केलं आहे.

****

कर्जमाफीसाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या ५१ लाख ऑनलाईन अर्जांपैकी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक ऑक्टोबर पूर्वी पैसे जमा करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भाजप सरकार पूर्णतः सत्तेत मशगूल झालं असून, सरकारने केलेल्या अनेक घोषणांपैकी कृतीमध्ये कोणतीच गोष्ट आणली नसल्याची टीका तटकरे यांनी केली.

****

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं, असं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. काल परतूर इथं भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातून तीन लाख २ हजार, जालना दोन लाख ८२ हजार, बीड दोन लाख ८७ हजार, नांदेड दोन लाख ८४ हजार, परभणी एक लाख ९८ हजार, हिंगोली एक लाख ३४ हजार, तर लातूर जिल्ह्यातून दोन लाख २८ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

आज शिक्षक दिन, या निमित्तानं नवी दिल्लीत आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. राज्यातल्या २५ शिक्षकांचा यावेळी गौरव होणार असून, यामध्ये मराठवाड्यातल्या पाच शिक्षकांचा समावेश आहे. लातूर इथले रामकिसन सुरवसे, गोपाल सूर्यवंशी, उस्मानाबाद इथल्या उर्मिला भोसले, तसंच बीड इथले नंदा राऊत, आणि कमलाकर राऊत यांचा यामध्ये समावेश आहे. सन्मान पदक, प्रमाणपत्र आणि  ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

आपल्या समस्या सोडवण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रांचं अनुकरण न करता आपण स्वत: उपाय शोधले पाहिजे, असं मत नवी दिल्ली इथल्या नॅशनल फिजीकल लॅबोरेटरीजचे संचालक डी. के अस्वाल यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधक प्राध्यापक पुरस्कार, अस्वाल यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र सिरसाठ, डॉक्टर के.एम.जाधव, डॉक्टर रामफल शर्मा, रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर सी.एच.गील, डॉक्टर बापू शिंगटे, संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर के.व्ही.काळे, ग्रंथालयशास्त्र विभागाच्या डॉक्टर वैशाली खापर्डे आणि रसायनतंत्रज्ञान विभागाचे डॉक्टर अनिकेत सरकटे यांना, अस्वाल यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी उपकेंद्राचं काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उपकेंद्रामुळे परभणी शहर आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, असं मत व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केलं. या उपकेंद्रात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देणार असल्याचं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितलं.   

****

आठवं मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन बीड इथं आयोजित केलं जाणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. येत्या नोव्हेंबरमध्ये हे संमेलन होणार असून, २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद इथं होणाऱ्या परिषदेच्या बैठकीत संमेलनाध्यक्षाची निवड होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका येत्या ११ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. मानधन वाढीसंदर्भात स्थापन समितीच्या शिफारसींनुसार मे २०१७ मध्ये अध्यादेश काढण्याचं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नसल्यानं बेमुदत संप पुकारला जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...