Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांना चांगला भाव
मिळण्यासाठी केंद्र सरकारनं १० वर्षांनंतर तूर, उडिद आणि मूग डाळींवरील निर्यात बंदी
मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी व्यापार महासंचलनालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात
ही माहिती देण्यात आली. सध्या काबली हरभरा डाळ आणि सेंद्रीय डाळी निर्यात करण्याची
परवानगी आहे. सरकारनं प्रोत्साहन दिल्यानंतर देशामध्ये डाळींच उत्पादन हे गेल्यावर्षीच्या
१६ दशांश चार दशलक्ष टनांवरून २०१६-१७ या वर्षात, २२ पूर्णांक चार दशलक्ष टन इतकं वाढलं
आहे.
****
देशाच्या रसायने, पेट्रोलियम
आणि अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत गेल्यावर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यावर्षी
दुहेरी अंकान वाढ झाली असून, ही निर्यात १० पूर्णांक २९ टक्क्यांवर पोहोचली आहे. वाणिज्य
मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत, देशाची निर्यात गेल्यावर्षीच्या ऑगस्टमधल्या
२१ दशांश ५९ कोटी अमेरिकी डॉलरवरून, यावर्षी ऑगस्टमध्ये २३ दशांश ८१ कोटी अमेरिकी डॉलर
इतकी झाली आहे. यावर्षी मे महिन्यात देशाच्या एकूण निर्यातीत आठ टक्के तर जून महिन्यात
चार दशांश ३९ टक्के एवढी वाढ झाली असल्याचं या आकडेवारीत म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर यंत्रणेशी
जोडलेल्या संस्था - जी एस टी एनला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली आज बंगळूरूमध्ये बैठक
होणार आहे. जी एस टी परिषदेनं तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी पाच सदस्यीय जी एस टी एन
स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
****
सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रीय
न्यायिक नेमणूक आयोग - एन जे ए सी कायदा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असून, त्यावर
तीव्र शब्दांमध्ये टिका केली जाऊ शकते, असं कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि दिल्ली
उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए पी शहा यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली
इथं ‘न्यायाधिशांची निवड, पारदर्शकता, जबाबदारी आणि स्वातंत्र्य’ या विषयावर आयोजित
एका चर्चासत्रात बोलत होते. एन जे ए सी कायदा ही एक चांगली कल्पना होती आणि त्यामध्ये
असलेल्या काही त्रुटी दूर केल्या जाऊ शकत होत्या, असंही ते म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमधल्या अरनिया
सेक्टर इथं सीमेपलिकडून पाकिस्ताननं आज पुन्हा गोळीबार केला. मध्यरात्रीनंतर पाकिस्तानी
सैन्यानं लष्करी तळ आणि रहिवासी भागांवर गोळीबार सुरु केला, तसंच बॉम्बगोळे फेकले.
आज सकाळपर्यंत हा गोळीबार सुरु होता, यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. मागील
चार दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.
****
दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन यांच्या साथीनंच शेती शाश्वत
होण्यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं द कंपाउंड लाईव्हस्टोक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
ऑफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. दुग्ध व्यवसाय
विकासासाठी महाराष्ट्राला १० हजार ८८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय कृषीमंत्री
राधामोहन सिंह यांनी यावेळी सांगितलं.
****
देशातलं पहिलं वृक्ष लागवड संमेलन उद्या मुंबई इथं होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी ही माहिती दिली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या
या संमेलनात राज्य सरकारच्या ५० कोटी
वृक्ष लागवड मोहिमेत तसंच नदी स्वच्छता आणि नद्यांचं पुनरुज्जीवन या कार्यक्रमात व्यापक
लोकसहभाग मिळवत जनजागृती आणि लोकप्रबोधन करण्यात येणार आहे.
****
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या वणी इथल्या सप्तश्रृंगी गडावर दरवर्षी
दस-याच्या दिवशी दिला जाणा-या बोकडबळीची प्रथा यंदापासून बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
प्रशासनानं घेतला आहे. या प्रथेमुळे निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि पशूहत्या रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तहसीलदार कैलास
चावडे यांनी सांगितलं. बोकडबळी प्रथेबाबत कोणीही अफवा पसरवत भाविकांच्या भावना भडकवण्याचा
प्रयत्न करू नये अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
****
अखिल भारतीय मान्सून परिषद आजपासून जालना इथं सुरु होत आहे. ‘सर्वास’ या आंतरराष्ट्रीय
प्रवासी संघटनेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे.
****
कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या
अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सिंधूनं चीनच्या
बिंगजियाओचा २१-१०, १७-२१, २१-१६ असा पराभव
केला.
****
No comments:
Post a Comment