Saturday, 2 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 2 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करणार आहेत. नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात पार पडेल, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, कलराज मिश्र, राजीव प्रताप रुडी, बंडारू दत्तात्रय, महेंद्र नाथ पांडे आणि फगन सिंग कुलास्ते या केंद्रीय मंत्र्यांनी याआधीच राजीनामे दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनात सचिव आणि सहसचिव म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासनात सुलभता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते नवी दिल्लीमध्ये ९० अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांशी संवाद साधताना बोलत होते. ज्या प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे प्रकल्प इतर अधिकाऱ्यांसाठीही सादर करण्यात यावे जेणेकरून अन्य ठिकाणीही या प्रकल्पांची पुनरावृत्ती करण्यात येईल, असं ते यावेळी म्हणाले.

****

गोरखपूरमधल्या बी आर डी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बालमृत्यू प्रकरणी डॉ. कफील खान यांना विशेष कृती दलानं अटक केली आहे. उच्चस्तरिय तपास पथकानं या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन प्रधान सचिव डॉ. राजीव मिश्रा आणि बालरुग्ण विभागाचे मंजूरी अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. कफील खान यांना दोषी ठरवलं आहे. यापूर्वीच डॉ.राजीव मिश्रा आणि त्यांच्या पत्नी डॉ.पूर्णिमा यांना अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

****

आसाम सरकारनं पुढच्या सहा महिन्यांसाठी संपूर्ण राज्य ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केलं आहे. राज्याच्या गृह आणि राजकीय विभागानं जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही घोषणा करण्यात आली. भूमिगत संघटनांद्वारे करण्यात येत असलेल्या हिंसक घटनांमुळे राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

****

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे राजदूत म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि भारताचा विशेष अभ्यास असलेले कॅनिथ जस्टर यांची नियुक्तीची घोषणा केली आहे. सिनेटनं मंजुरी दिल्यानंतर जस्टर हे रिचर्ड वर्मा यांची जागा घेतील. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून हे पद रिक्त आहे.   

****

ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांचं आज मुंबई इथं राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङमय, नाटक इत्यादी साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे. कवयित्री शिरीष पै या प्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत.  

****

ईद उल जुहा अर्थात बकरी ईद निमित्त औरंगाबाद इथं छावणीच्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली.

नाशिक शहरात धर्मगुरू हिसामुद्दीन अश्रफी यांच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लब मैदानावर नमाज पठण करण्यात आलं. यावेळी तिहेरी तलाक विषयी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं, तसंच दहशतवादाचा निषेध करण्यात आला.

अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातही ईदनिमित्त सामुहिक नमाज अदा करण्यात आल्याचं आमच्या वर्ताहरांनी कळवलं आहे.

****

आसनगाव- वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान दुरांतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प झालेली रेल्वे सेवा आज पाच दिवसानंतर सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी ही माहिती दिली. सध्या वेळापत्रकानुसार गाड्या सोडल्या जात नसून, केवळ विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. सिकंदराबादहून नांदेड, औरंगाबादमार्गे मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस, मुंबई - नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस आणि मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस या गाड्या आजही रद्द केल्या आहेत.

****

अमेरिका ओपन टेनिस स्पर्धेत भारताचा लिएंडर पेस आणि पूरब राजा यांची जोडी पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे. या जोडीनं सर्बियाच्या जोडीचा ६-१, ६-३ असा पराभव केला. सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाचा पहिल्या फेरीतल्या पराभवानंतरही ते या स्पर्धेत कायम आहेत.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना उद्या श्रीलंकेत कोलंबो इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधीचे चारही सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या खासगी आरामगाडीला काल रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात वाटून इथं झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार, तर ३५ जण जखमी झाले.

****

देशभरात स्वाईन फ्लूमुळे एक हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातल्या रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...