Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
सरदार सरोवर
प्रकल्पामुळे देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांचं भवितव्य बदलणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यात केवाडिया इथं उभारण्यात
आलेल्या सरदार सरोवर धरणाचं राष्ट्रार्पण केल्यानंतर दभोई इथं आयोजित सभेत ते बोलत
होते. या धरणाचा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या नागरिकांना लाभ
होणार असून, या राज्यातल्या जनतेच्या सहभागामुळेच हे धरण उभं राहीलं असल्याचं पंतप्रधान
यावेळी म्हणाले. सरदार सरोवर धरण देशातलं सर्वात मोठं आणि अमेरिकेतल्या ग्रँड क्युली
धरणानंतर जगातलं दुसरं सर्वात मोठं धरण आहे.
****
बॅडमिंटनपटू
पी व्ही सिंधूनं कोरिया ओपन सुपर सिरीजचं विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचं
अभिनंदन केलं आहे. संपूर्ण देशाला सिंधूचा अभिमान असल्याचं ते म्हणाले. कोरिया ओपनचं
विजेतेपद पटकावणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
****
जम्मू काश्मीर
मधल्या अरनिया सेक्टर इथं आज पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात एका स्थानिक महिलेचा
मृत्यू झाला. यात सीमा सुरक्षा बलाच्या एका जवानासह सात जण जखमी झाले आहेत. भारतीय
जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले आहेत. औरंगाबाद
इथं आज सोलार ऊर्जा दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. सोलर फीडरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज देण्यात येईल, असंही मुख्यमंत्री यावेळी
म्हणाले. मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या
थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळेच मराठवाड्याचा विकास झाल्याचं कामगार
आणि कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
म्हटलं आहे. लातूर इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण
पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी हुतात्मा
स्मारक स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
****
परभणी इथं
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभास
पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. पाटील यांनी यानंतर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक
घेऊन,
पिकांचं नुकसान
होऊ नये म्हणून कृषीपंपासाठी १२ तासांचा थ्री फेज वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे
निर्देश दिले. कमी पर्जन्यमान असलेल्या चाटोरी आणि बनवस गावांमध्ये अखंडीत वीज पुरवठा
उपलब्ध करुन दयावा, असे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.
****
हैद्राबाद
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट
ऑफ सोशिया इकॉनॉमिक रिसर्च अॅंड नॅशनल इंटिग्रेशन संस्थेच्या वतीनं 'मराठवाडा विकास'
या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी
शिक्षण, सिंचन, दळणवळण, औद्योगिक क्षेत्र, आणि शेतीपुरक उद्योगांची उभारणी करणं गरजेचं
असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं.
****
जालना इथल्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उभारण्यात आलेल्या माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या
अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात टोपे यांनी केलेलं कार्य
भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं पवार यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं शेतकरी कर्जमाफीचं
आश्वासन पाळलं असून, कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोवर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
केली जाईल, असं दानवे यांनी यावेळी नमूद केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आज उस्मानाबाद इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी गतीमंद मुलांना स्वच्छता पेटी आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधले कांद्याचे लिलाव उद्यापासून सुरू करण्याचं आश्वासन
व्यापाऱ्यांनी दिलं आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी आज कृषी उत्पन्न बाजार
समिती पदाधिकाऱ्यांची बेठक घेतली, त्यावेळी व्यापाऱ्यांनी हे आश्वासन दिलं. कांदा साठवणुकीवर
मर्यादा लागू करू नये, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी यावेळी केली.
****
पहिलं एकदिवसीय
बालकुमार साहित्य संमेलन येत्या बुधवारी २० सप्टेंबरला लोणावळा इथं होणार आहे. महाराष्ट्र
साहित्य परिषद आणि लोणावळ्याचं मनशक्ती प्रयोग केंद्र यांनी या संमेलनाचं आयोजन केलं
आहे. साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट
या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवणार असून, यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
No comments:
Post a Comment