Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 16 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
उपराष्ट्रपती
एम.वेंकय्या नायडू यांनी लोकप्रतिनिधींनी विकासाची फळं तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी
प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज आशियायी लोकसंख्या आणि विकास संस्थेच्या शिष्टमंडळाला
संबोधित करताना नवी दिल्लीत बोलत होते. लोकसंख्या नियंत्रण, गरिबी निर्मूलन आणि पर्यावरण
संवर्धन हे कोणत्याही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे विषय असल्याचं नायडू यावेळी
म्हणाले.
****
दरम्यान, राष्ट्रनिर्माणात
महत्वाची भूमिका बजावण्यासाठी महिलांचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सशक्तीकरण महत्वाचं
असल्याचं मत, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं. हैदराबाद इथं एका कार्यक्रमात ते आज बोलत
होते.
****
ओझोनचा थर
आणि पृथ्वीचं संरक्षण करणं गरजेचं असल्याचं, केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री डॉ.हर्षवर्धन
यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते
बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचं जतन करण्याच्या दिशेनं सर्वांनी काम केलं पाहिजे,
असं ते म्हणाले. ओझोनच्या संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या
उद्देशानं हा दिवस पाळण्यात येतो.
****
अटकेत असलेला
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम आज दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून
पंचकुलामधल्या सीबीआय न्यायालयासमोर आज हजर झाला. दोन खूनप्रकरणांमध्ये त्याला न्यायालयासमोर
हजर करण्यात आलं. दोन्ही प्रकरणांमध्ये असलेला साक्षीदार खट्टा सिंग याने त्याचा जबाब
पुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम
दिन उद्या १७ सप्टेंबरला साजरा होत असून, औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाजवळ
सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
होईल. बीड इथं जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण
होणार आहे. त्यापूर्वी प्रियदर्शनी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना
अभिवादन करण्यात येणार आहे.
दरम्यान, मराठवाडा
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा
दिल्या आहेत. या ऐतिहासिक लढ्यातल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसंच जनतेला
हार्दिक शुभेच्छा देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
डाळींच्या
निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मूग, उडीद डाळीला
हमी भाव देण्यासाठी होणार असल्याचा विश्वास, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा
पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र आणि
राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची मूग आणि उडीद डाळ हमी भावनं खरेदी करण्यासाठी सूचना केल्या
असून, त्याचा पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद शहरात
सुरु करण्यात आलेलं भारनियमन तात्काळ बंद करावं या मागणीसाठी आज एमआयएम आणि शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न
केल्यानंतरही या कार्यकर्त्यांनी आत प्रवेश करुन थेट महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक
ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनात प्रवेश करत, भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी केली.
****
भारतीय पुरातत्व
सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे आजपासून ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा केला जात आहे.
आज बीबी का मकबरा परिसरात मौलाना आझाद महाविद्यालयाच्या अध्यक्षा, पद्मश्री फातेमा
झकेरीया यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबवलं.
****
बुलडाणा शहरात
आज मुस्लिम समाजातल्या नागरिकांनी तीन वेळा तलाकवर दिलेल्या निर्णयाविरोधात आणि म्यानमारमध्ये
रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा काढला. तीन
वेळा तलाक रद्दचा निर्णय मान्य नसल्याचे फलक यावेळी झळकावण्यात आले. या मोर्चात महिलांचा
उस्फूर्त सहभाग असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी
तुकड्यांमध्ये २० टक्के वाढीव प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे
आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्याकडे केली आहे. विद्यापीठाशी
संलग्नीत मराठवाड्यातल्या वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश क्षमतेनुसार
पूर्ण झाले आहेत, मात्र एच.एस.सी.पुरवणी परीक्षेचा निकाल लागला असून त्या विद्यार्थ्यांना
पदवी प्रथम वर्ष शाखेला प्रवेश मिळावा म्हणून सततची मागणी होत असल्याचं चव्हाण यांनी
कुलगुरुंना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment