Sunday, 17 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 17.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण; मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन

** केंद्र तसंच राज्य सरकारचं कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री

** एअर मार्शल पद्मविभुषण अर्जन सिंग यांचं नवी दिल्लीत निधन

** औरंगाबाद इथं भरधाव जीपच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

आणि

** कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या मुक्तीसंग्राम स्मृतिस्तंभाजवळ सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते, लातूर इथं हुतामा स्मृती स्मारक स्तंभाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तर परभणीत राजगोपालाचारी उद्यानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार तसंच इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या ऐतिहासिक लढ्यातल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसंच जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

या मुक्तीसंग्रामाची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयातले इतिहासाचे शिक्षक मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी एक संकेतस्थळ तयार केलं आहे. ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट भाऊसाहेबउमाटे डॉट कॉम’ या संकेत स्थळाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..



या संकेतस्थळावर प्रामुख्याने स्वामी रामानंदतीर्थ, मुक्तीसंग्रामातील जालियनवाला बाग म्हणून ओळखलेलं गोरटा हत्याकांड, कल्हाळीच्या वीराची शौर्यगाथा, हुतात्मा वेदप्रकाश, हुतात्मा गोविंदराव पानसरे, ऑपरेशन पोलो या विषयांवरचे लेख, उपलब्ध असलेले फोटो, गोरटा हत्याकांडाचा माहितीपट, स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव सायगावकर यांची मुलाखत याचा समावेश आहे.

तरुणपिढीसाठी एका ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन भाउसाहेब उमाटे हे ॲप डाउनलोड करता येतं.

अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर

****

केंद्र तसंच राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत काल नागपूर इथं एका शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित धनादेश वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमांत ५० टक्के शुल्कमाफीची योजना सरकार राबवत असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख १० हजार विद्यार्थ्यांना २६० कोटी रुपयांचं वाटप केलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या ९ वर्षात या योजनेत सर्वात जास्त निधी वितरित केल्याचं ते म्हणाले.

****

डाळींच्या निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मूग, उडीद डाळीला हमी भाव देण्यासाठी होणार असल्याचा विश्वास, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांची मूग आणि उडीद डाळ हमी भावानं खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली असून, त्याचा पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले.

****

एअर मार्शल पद्मविभुषण अर्जन सिंग यांचं काल रात्री नवी दिल्लीत निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. काल सकाळी ृदयविकाराचा झटका आल्यानं, त्यांच्यावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. पंच तारांकीत मानांकनासह एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणारे ते वायुसेनेचे एकमेव अधिकारी होते. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. दुसऱ्या महायुध्दात ते सहभागी होते.

****

रायन इंटरनॅशल शैक्षणिक संस्थेच्या गुरुग्राम इथल्या शाळेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई नं , ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. गेल्या आठ सप्टेंबरला प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्शाची शाळेत हत्या झाली होती. या प्रकरणी ही नोटीस बजावत, सुरक्षा मानकं पूर्ण न केल्यानं मान्यता रद्द का करू नये, असं बोर्डानं  विचारलं आहे. शाळेकडून १५ दिवसांत उत्तर मागितलं असून, त्यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे.

****

मुंबईत चेंबूर इथला प्रसिद्ध आर. के. स्टुडिओ काल भस्मसात झाला. काल दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत सर्व लाकडी सामान, तसंच एक आणि दोन क्रमांकाचे स्टुडिओ खाक झाले, या स्टुडिओचं छत ही कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

****

राज्यात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी इथल्या सप्तश्रृंगी गडावर विजयादशमीला होणारी अजाबली प्रथा यंदापासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या प्रथेमुळे निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि पशूहत्या रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितलं. बोकडबळी प्रथेबाबत कोणीही अफवा पसरवू नये अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

चौथा श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या हस्ते बोजेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, अकरा हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याप्रसंगी बोजेवार यांची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक ना.वि. देशपांडे आणि कमलाबाई चाकूरकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पाल्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं शालेय साहित्य वाटप करण्यात आलं.

****

औरंगाबाद इथं काल सकाळी एका भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हे सर्वजण ४५ ते ६५ वर्ष वयोगटातले आहेत. जालना रस्त्यावर केंब्रीज शाळेजवळ सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या या जीपनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना धडक दिली, त्यापैकी चार जण जागीच ठार झाले, एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक जण सुदैवानं बचावला. अपघातानंतर वाहनचालक जीप सोडून पसार झाल्याची माहिती सिडको एम आय डी सी पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

****

कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात सिंधूनं चीनच्या बिंगजियाओचा  २१-१०, १७-२१, २१-१६ असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात सिंधुचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहराविरुध्द होणार आहे.

*****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई इथं एम चिदंबरम मैदानावर दुपारी दीड वाजता मालिकेतला पहिला सामना सुरू होईल. श्रीलंकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारातले सर्व सामने नुकतेच जिंकल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

****

स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचं आवाहन राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. जालना इथं काल स्वच्छता हीच सेवा अभियानाचा शुभारंभ लोणीकर यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांशी संवाद साधताना, स्वच्छतागृह उभारणीच्या कामात जालना जिल्हा विभागात आघाडीवर असून, ग्रामीण भागात स्वच्छतागृहांचा वापर वाढावण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

****

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे कालपासून स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. काल बीबी का मकबरा परिसरात या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबवलं.

****

औरंगाबाद शहरात सुरु करण्यात आलेलं भारनियमन तात्काळ बंद करावं या मागणीसाठी एमआयएम आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही या कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रवेश करुन महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनात थेट प्रवेश करत, भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी केली.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी तुकड्यांमध्ये २० टक्के वाढीव प्रवेश देण्यात यावा अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्याकडे केली आहे. विद्यापीठाशी संलग्नीत मराठवाड्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश क्षमतेनुसार पूर्ण झाले आहेत, मात्र बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल लागला असून त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रथम वर्ष शाखेला प्रवेश मिळावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...