Saturday, 16 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 16.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१६ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या माछील सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथं आज सकाळी एका भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हे सर्वजण ४५ ते ६५ वर्ष वयोगटातले आहेत. जालना रस्त्यावर केंब्रीज शाळेजवळ सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या या जीपनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना धडक दिली, त्यापैकी चार जण जागीच ठार झाले, एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक जण सुदैवानं बचावला. अपघातानंतर वाहनचालक जीप सोडून पसार झाल्याची माहिती सिडको एम आय डी सी पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

****

तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवादरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावं म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी, असे निर्देश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. काल तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. भेसळयुक्त कुंकवाची विक्री, आणि घरगुती गॅस तसंच रॉकेलचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गमे यांनी यावेळी दिले.

****

लातूर तालुक्यातल्या टाकळी, बोपला, चाटा आणि धानोरी शिवारात बंधाऱ्यांवर काल जलपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश कराड यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा अभियानाला काल सर्वत्र प्रारंभ झाला. शासकीय कार्यालयांसह नागरिकांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली. ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियनउपक्रमालाही जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रियदर्शनी इंदिरा गांधी मैदानावर खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत या महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हाभरात सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळून हा क्रीडा महोत्सव साजरा केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...