Monday, 4 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 04.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र
०४ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
जगात शांतता आणि विकासासाठी राष्ट्रांचं एकमेकांना सहकार्य गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चीनमधल्या झीयान शहरात आयोजित ९व्या ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेत ते आज बोलत होते. या परिषदेचं औपचारिक उद्घाटन काल झालं. ब्रिक्स बँकेनं कर्ज देण्यास सुरुवात केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, भारत गरीबीशी लढत असल्याचं नमूद केलं. विकसनशील देशांच्या व्यापारी कंपन्यांची गरज भागवण्यासाठी ब्रिक्स रेटिंग एजन्सी - ब्रिक्स मानांकन संस्था स्थापन करण्याचा विचार पंतप्रधानांनी व्यक्त केला. जगात स्थिरता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं सहकार्य आणि योगदानासाठी ब्रिक्स समुहानं मजबूत मांडणी केल्याचं ते म्हणाले.
****
अर्थमंत्री अरुण जेटली आज सुरक्षेच्या मुद्यावर जपानच्या अर्थमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान ही खूप महत्वपूर्ण चर्चा असल्याचं ते म्हणाले. या बैठकीत नवनिर्वाचित संरक्षण मंत्री निर्मला सितारामन सहभागी झाल्या असत्या, मात्र त्यांनी अद्याप पदभार न स्वीकारल्यानं आपण ही चर्चा करणार असल्याचं जेटली यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.   
****
केंद्रीय मंत्रिमंडळातले नवीन मंत्री आज नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा, तर मुख्तार अब्बास नक्वी आज अल्पसंख्याक मंत्रालयाचा पदभार स्वीकारतील. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड हे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. 
****
राज्यातली ३० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश असलेली जवळपास ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयं बंद होणार असल्याचे संकेत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद - AICTE नं दिले आहेत. आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव, तसंच ३० टक्क्यांहून अधिक जागा सलग पाच वर्षे भरली न जाणारी महाविद्यालयं बंद करण्याचा AICTE चा नियम आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणात सुमारे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.
****
औरंगाबाद खंडपीठाची क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...