Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी
इथल्या साई जन्मस्थळाचा विकास करण्याबाबत विचार व्हावा, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी म्हटलं आहे. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष
सोहळ्याचा राष्ट्रपतींनी ध्वजारोहणानं शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.
साई संस्थान अपारंपरिक वीजेच्या वापरातून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचा
गौरवपूर्ण उल्लेख करत, राष्ट्रपतींनी स्वच्छतेच्या बाबतीत अधिक सजग राहण्याचं आवाहन
केलं.
तत्पूर्वी राष्ट्रपतींनी शिर्डी आंतरराष्ट्रीय
विमानतळाचं उद्घाटन करुन, शिर्डी - मुंबई विमान हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हवाई मार्गानं जोडल्यामुळे शिर्डीच्या आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, आणि अधिकाधिक
रोजगार निर्माण होईल, असं राष्ट्रपती म्हणाले.
राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यावेळी उपस्थित
होते. या विमानसेवेअंतर्गत शिर्डी विमानतळाहून मुंबईसाठी चार तर
हैदराबाद आणि दिल्लीसाठी एक एक विमान सोडण्यात येणार आहे.
****
चीनच्या सीमेलगत
राहणारे लोक देशासाठी सामारिक दृष्टया महत्वाचे असून, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं
स्थलांतर होऊ देता कामा नये, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
ते काल उत्तराखंडमधल्या जोशीमठ इथं स्थानिक नागरिक आणि भारत- तिबेट सीमा
पोलिस जवानांशी
संवाद साधत होते. सीमेवरच्या लोकांच्या
समस्या सोडवण्यासाठी खास शिबीरं आयोजित करावीत असंही गृहमंत्री म्हणाले.
****
सशस्त्र सीमा दलाचे
महासंचालक म्हणून रजनीकांत मिश्रा यांनी सुत्रं स्वीकारली आहेत. ते १९८४ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे पोलिस अधिकारी
आहेत. २००३ मध्ये त्यांना पोलिस पदक आणि २००९ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकानं सन्मानित
करण्यात आलं आहे.
****
तेलंगणामधल्या सूर्यपेट
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६५ वर आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसला
झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला.
ही बस विजयवाडाहून हैदराबादला जात होती.
****
महाराष्ट्र राज्य
मार्ग परिवहन महामंडळ एस टीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या ‘संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पा’चा शुभारंभ उद्या करण्यात
येणार आहे. या अंतर्गत सर्व एसटी बस आणि बस स्थानके स्वच्छ केली जाणार आहेत. परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई इथं ही घोषणा केली. एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयांच्या
मुख्य बस स्थानकांवर उद्या सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पाच्या
माध्यमातून स्वच्छ बस आणि टापटीप बसस्थानकं, प्रसाधनगृहं प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध
असतील, असा विश्वास रावते यांनी व्यक्त
केला.
****
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या
आधारसह सर्व माहिती ऑनलाईन भरली तरच शाळांना शिक्षक मान्यता दिली
जाईल असा अप्रत्यक्ष इशारा शालेय शिक्षण
विभागानं राज्यातल्या सर्व अनुदानित आणि सरकारी शाळांना दिला आहे. मात्र शिक्षकांना
विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींकडे मात्र शिक्षण विभागाकडून
दुर्लक्ष केलं जात असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. आवश्यक
असूनही विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांनी
अद्ययावत न केल्यामुळे अनेक
शाळांमध्ये गरजेपेक्षा कमी शिक्षकपदं मान्य
झाल्याचं शिक्षण विभागानं म्हटलं आहे.
****
पैठणच्या
जायकवाडी धरणाच्या चार दरवाजातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
अद्याप सुरू आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक मंदावल्यानं, विसर्ग
कमी होण्याची शक्यता आहे. धरण शंभर टक्के भरलं असून, डाव्या कालव्यातून एक हजार तर
उजव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
****
भारत ऑस्ट्रेलिया
यांच्यादरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज नागपूर इथं खेळला
जाणार आहे. दुपारी दीड सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत प्रारंभीचे तिन्ही सामने जिंकून भारतानं ही
मालिका यापूर्वीच जिंकली
आहे. एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेनंतर या दोन्ही देशांच्या संघांमध्ये तीन ट्वेंटी
ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यातला पहिला सामना येत्या शनिवारी रांची इथं
होईल.
****
सॅनफ्रान्सिस्को
खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या दीपिका पल्लीकलचं आव्हान काल उपान्त्य फेरीत संपुष्टात
आलं. जागतिक क्रमवारीत एकविसाव्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाचा मलेशियाच्या निकोल
डेविडनं ३ - ११, शून्य - ११, ३
- ११ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment