Monday, 2 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 02.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०२ ऑक्टोबर २०१ दुपारी १.०० वा.

****

जनतेनं एकत्र काम केल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धांच्या बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. स्वच्छता अभियानात अधिकाधिक लोक सहभागी झाले असून, माध्यमांनीही या अभियाचा योग्य रितीनं प्रचार प्रसार केल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्वच्छता ठेवणं ही आता देशवासियांची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोपही आज होत आहे. 

****

जम्मू काश्मीरमधल्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळच्या सुमारास लष्करी तळ आणि रहीवाशी भागांवर गोळीबार केला, यात एक लहान मुलगा आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर १२ नागरिक जखमी झाले. बराच वेळ या परिसरात दोन्ही बाजुनं गोळीबार सुरु होता.

****

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरचं अंशदन पुढच्या वर्षी मार्च पर्यंत बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाअंतर्गत ही वाढ करण्यात आली आहे.

****

लष्कर आणि तत्सम सेवांमधल्या नोकऱ्यांमध्ये दलितांसाठी आरक्षण ठेवण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याप्रकरणी आपण लवकरच संरक्षण मंत्र्यांना भेटणार असल्याचं आठवले यांनी पुणे इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. निवडणुकीपूर्वी आम्ही ज्या घोषणा दिल्या होत्या, आश्वासनं दिली होती, त्यांची पूर्तता होण्यासाठी कालावधी लागेल, असं सांगतानाच आठवले यांनी, केंद्राच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम नजीकच्या काळात दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

****

मराठी साहित्यातले ज्येष्ठ लेखक ह मो मराठे यांच्या पार्थिव देहावर पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठे यांचं आज पहाटे दिर्घ आजारानं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते.

****

स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज जालना इथं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेव दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हीरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थीनी, सामाजिक संस्था, नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 

****

राज्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये सध्या शुन्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान गतिमान झालं असून, ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिकार्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ करावीत, असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मिशन अंत्योदय अंतर्गत हे अभियान पंधरा ऑक्टोबर पर्यंत राबवलं जाणार असलं, तरी अनेक जिल्हा परिषदांनी आधीच स्वच्छतेचं काम सुरू केलं असल्याचं त्या म्हणाल्या. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना गौरवण्यात येणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.

****

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची न्यायालयीन कोठडी सत्र न्यायालयानं १३ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सध्या कासकर अटकेत आहे. या बरोबरच इकबालच्या आणखी दोन साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित ५२वं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या यजमान पदाचा मान सिंधुदुर्ग मधल्या नेरूरपार इथल्या वसुंधरा विज्ञान केंद्राला मिळाला आहे. येत्या १६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार असून समारोपाला वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

****

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात कोकण विभागात सरासरीच्या १० टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात १७ टक्के अधिक, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस झाला. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात सरासरीच्या ७० ते ८० टक्के पाऊस पडला. तर विदर्भात अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नसल्याचं यात सांगण्यात आलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग काल दुपारी बंद करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर पाण्याची आवक वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जात होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...