Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
बांगला देशाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर
असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी आज ढाका इथे बांगला देशचे अर्थमंत्री अबुल माल अब्दुल मुहित यांच्याशी द्विपक्षीय
चर्चा केली. दोन्ही देशातले आर्थिक संबंध तसंच व्यापार
आणि गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. यावेळी साडेचार अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या
ऋण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात
आल्या. अरुण जेटली आज बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार आहेत.
****
जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेजवळ आज पाकिस्ताननं
पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आज सकाळी नऊच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं
या भागातल्या देगवार सेक्टरमध्ये गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय
सैन्यानं याला चोख प्रत्युत्तर
दिलं. दरम्यान, काश्मीरमध्ये बांदिपुरा भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याच्या माहितीनंतर
लष्करानं या भागात शोधमोहीम सुरू केली असल्याचं वृत्त आहे.
****
लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम
रहीम उर्फ गुरमीत सिंहची साथीदार हनीप्रीत हिला आज दुपारी दोन वाजता न्यायालयासमोर
सादर केलं जाणार आहे. बाबा राम रहीमच्या अटकेनंतर पंचकुला इथे
झालेल्या हिंसेच्या संदर्भात हनीप्रीत आरोपी आहे. अधिक तपासणीसाठी हनीप्रीतला पोलिस
कोठडी देण्याची मागणी पोलिस न्यायालयाकडे करणार
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बँक खाती आधार क्रमांकांशी संलग्न झाल्यानंतर बनावट खातेदार
ओळखणं सोपं होईल, असं केंद्रीय
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली मध्ये सायबर सुरक्षा विषयक
एका परिषदेमध्ये ते काल बोलत होते. आधार क्रमांकांशी संलग्न करण्याच्या नियमामुळे ३
कोटी बनावट गॅस नोंदण्या आणि दोन कोटी सत्तर लाख बनावट शिधापत्रिका उघडकीला आल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.
****
देशाच्या सगळ्या
भागांमधल्या प्रतिभावान खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी ''राष्ट्रीय
शालेय आणि महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा'' आयोजित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही माहिती दिली. या निर्णयानुसार 'खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय
क्रीडा स्पर्धा' येत्या डिसेंबर मध्ये, तर ''खेलो इंडिया राष्ट्रीय महाविद्यालयीन क्रीडा
स्पर्धा'' पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात सुरु होतील. या वार्षिक क्रीडा स्पर्धांमधून दरवर्षी एक हजार खेळाडूंची
निवड केली जाणार असून त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात
येणार आहे.
****
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, अर्थात
नॅब, या
संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक
आणि आदर्श संस्था पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दहावी, बारावी
तसंच पदवी परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या अंध विद्यार्थ्यांसाठीही हे पुरस्कार दिले जातात. या सगळ्या श्रेणींच्या पुरस्कारासाठी
अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर ही आहे. यासंदर्भातल्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या
नाशिक इथल्या कार्यालयात संपर्क करावा, असं आवाहन नॅब या
संस्थेनं केलं आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या तूर उत्पादकांना देण्याची
थकित रक्कम पणन महासंघाने खरेदी विक्री संघाकडे हस्तांतरित केली आहे. येत्या दोन दिवसात
शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तूर विक्रीचे पैसे जमा होतील,
असं पणन महासंघानं म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात हवामानावर आधारित
पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख, द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी
आणि मोसंबी पिकासाठी ३१ ऑक्टोबर आणि आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर २०१७ , अशी आहे. शेतकऱ्यांनी
जास्तीत जास्त संख्येनं या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
उघड्यावर शौच करण्यापासून
मुक्त होण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला चार
पुरस्कार देऊन सन्मानित केलं असल्याची माहिती स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली
आहे. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. हे
लक्ष्य गाठण्यासाठी सरकारनं मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्रेचाळीस लाख शौचालयं
उभारण्यात आली, असं नमूद करत,
जालना आणि पालघर जिल्ह्यांमध्ये कमालीची सुधारणा दिसून आल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment