Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलं कोणत्याही धोक्याचा सामना
करण्यास सक्षम असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं
आहे. ते आज जम्मू काश्मीरमध्ये एका चर्चेदरम्यान बोलत होते. सीमेवर
आणि नियंत्रण रेषेवर होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांचा सामना भारतीय सुरक्षा दलं प्रभावीपणे
करत असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाविरूद्ध लढण्यात जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या
उत्कृष्ट योगदानाबद्दल सिंह यांनी त्यांचे आभार मानले.
****
पोलिस स्मृतिदिन उद्या देशभरात पाळला जाणार
आहे. नवी दिल्लीत पोलिस स्मारक मैदानावर गृहमंत्री राजनाथा
सिंह हुतात्मा पोलिसांना श्रद्धांजली वाहतील. २१ ऑक्टोबर
१९५९ रोजी भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना दहा पोलिस जवान शहीद झाले
होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिन पाळला जातो.
****
देशाचे महान्यायअभिकर्ता रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा
राजीनामा दिला आहे. २०१४ मध्ये या पदावर नियुक्त केलेल्या रणजीत कुमार यांच्या सलग
दुसऱ्या कार्यकाळाला नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यांनी वैयक्तिक कारणांनी
राजीनामा दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढवून
प्रवासाची वेळ कमी करणार आहे. यामुळे पाचशे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवासाचा अवधी
जवळपास दोन तासांनी कमी होणार आहे. पुढच्या महिन्यात रेल्वेच्या वेळापत्रकाची पुनर्रचना
केल्यानंतर हा निर्णय अंमलात येईल. रेल्वेगाड्यांच्या वेगाचा आढावा घेण्यात येत असून,
या निर्णयामुळे ५० मेल आणि जलद गाड्यांचा अतिजलद गाड्यांमध्ये समावेश होईल.
****
दिवाळी निमित्त होत असलेली गर्दी लक्षात घेवून दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून नांदेड-मुंबई-नांदेड अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. गाडी संख्या ७०५८ ही गाडी नांदेड
इथून परवा २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि
मुंबई इथं दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. परतीच्या
प्रवासात गाडी संख्या ७०५७ ही गाडी मुंबई हून २३ ऑक्टोबर
रोजी सायंकाळी पाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नांदेड इथं पोहोचेल. ही गाडी
मनमाड, औरंगाबाद,
जालना, परभणी या
स्थानकांवर थांबेल.
****
धुळे इथं फटाके
फोडण्यास मनाई केल्यामुळं झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या झाली. मनमाडजीन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी
धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर इथं स्पीकरवर गाणी लावण्याच्या वादातून एकाची हत्या
झाली, डिप्टी सिग्नल चौक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली
आहे.
****
एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज चौथ्या दिवशीही सुरू ठेवला आहे. या संपामुळे प्रवाशांचा आजही
खोळंबा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केल्यामुळं आज संप मिटेल अशी शक्यता वर्तवली जात
आहे. संपावर तोडगा निघावा म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
दरम्यान संप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर
आज दुपारी सुनावणी घेण्यात आली.
दरम्यान, राज्यातली प्रवासी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी
गृहविभागानं अधिसूचना काढून सर्व खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतुक बस,
कंपनी कामगार वाहुतक बस यांना प्रवासी वाहतूक
करण्यास मान्यता दिली आहे. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा संप ज्यावेळी मागे घेतला जाईल, त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात येईल, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
*****
दीड लाख रुपयावरील
दीर्घ मुदतीच्या कर्ज फेडण्यासाठी दहा वर्षांची मुदत द्यावी, अशी मागणी माजी
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे, ते सोलापूर जिल्ह्यात वडाळा इथं एका
कार्यक्रमात बोलत होते. राज्यशासनानं कर्जमाफी योजनेत दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ
केलं, मात्र दीर्घ मुदतीच्या कर्जमाफीसाठी अट घातली असल्यानं, अनेक शेतकरी या योजनेपासून
वंचित राहण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. अशा शेतकऱ्यांचं कर्जावरचं व्याज पूर्णपणे माफ करावं असंही पवार म्हणाले.
शेतमालास उत्पादन खर्च आधारित भाव, मुबलक पाणी,
खते-बियाणे, आणि नवीन तंत्रज्ञान दिल्यास
कर्जमाफीची गरज पडणार नाही, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
*****
आज दिवाळीच्या पाडव्याला अनेक ठिकाणी
म्हशी आणि रेड्यांची मिरवणूक
'सगर' काढली जाते. जालना शहर परिसरात गवळी समाजबांधवांनी आपल्या म्हशी तसंच रेड्यांना
सजवून मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
****
भारतीय जनता पक्षाचे पुणे
शहराचे माजी उपाध्यक्ष प्रेम अडवाणी यांचं अल्पशा आजारानं निधन झाले. ते ८७
वर्षांचे होते. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत काम केलेले प्रेम अडवाणी सामाजिक
आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते.
****
No comments:
Post a Comment