Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा नाही, प्रशासनानं देऊ केलेली वेतनवाढ कर्मचारी
संघटनांनी फेटाळली
** मांगल्याचं प्रतीक असलेली दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी; अनेक
कुटुंबियांनी फटाक्याची आतषबाजी न करता लुटला दिवाळीचा आनंद
** दीर्घ
आणि मोठ्या कर्जदारांना कर्ज फेडीसाठी दहा वर्षाची मुदतवाढ देण्याची तसंच व्याज माफ
करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मागणी
आणि
** डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी श्रीकांत
आणि एच. एस. प्रणॉय रॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सायना नेहवालची विजयी घोडदौड
कायम
****
राज्य परीवहन महामंडळ-
एसटी महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये काल कोणताच तोडगा निघू शकला नाही,
त्यामुळे आज चौथ्या दिवशीही हा संप सुरूच राहील, असं एस.टी. कर्मचारी संघटनांनी
स्पष्ट केलं आहे. प्रशासन आणि कर्मचारी संघटनामध्ये आतापर्यंत चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या.
यावेळी प्रशासनानं ३५ टक्के वाढ द्यायला मान्यता दिली होती,
मात्र संघटनाना ही वाढ मंजूर नसल्यामुळे चर्चा निष्फळ ठरल्या.
त्यामुळे आता संप मागं घेतल्यानंतरच चर्चा होईल, अशी भूमिका
प्रशासनानं घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागं घेऊन तात्काळ कामावर हजर व्हावं
असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. मात्र कर्मचारी संघटना
आपल्या मागणीवर ठाम आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात संप झाल्यानं महामंडळाला आर्थिक
फटका बसला आहे. दिवाळीत उत्पन्नात वाढ होते.
****
मांगल्याचं प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष
दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात
उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या सणानिमित्त काल घराघरांत आणि कार्यालये, व्यावसायिक
तसंच दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी - कुबेर पूजन करण्यात आलं. त्यानंतर
झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळून निघाला. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची
आतषबाजी सुरू होती. मात्र तरीदेखील यावर्षी फटाक्यांच्या आतषबाजीचं प्रमाण कमी असल्याचं
आढळून आलं. अनेक कुटुंबियांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली. ग्रामीण भागातही मोठ्या
उत्साहात दिवाळी साजरी झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी
काल काश्मीरमध्ये गुरेझ खोऱ्यात भारतीय सैन्य दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत
दिवाळी साजरी केली. जवळपास दोन तास ते तिथं होते. सलग चौथ्या वर्षी पंतप्रधानांनी सैनिकांसोबत
दिवाळी साजरी केली. प्रत्येकालाच आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा आनंद लुटायला आवडतो.
आपणही सुरक्षा दलांना आपलं कुटुंब मानत असल्यामुळं त्यांच्या सोबत आहोत असं पंतप्रधान
म्हणाले. सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना बलिदान आणि शौर्याची परपंरा लाभली असल्याचं
सांगून. पंतप्रधानांनी या जवानांचं कौतुक केलं. जवानांसोबत काही वेळ घातल्यानंतर आपल्याला
नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी पंतप्रधानांनी जवानांना
मिठाईचं वाटप केलं तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यावेळी
उपस्थित होते.
संरक्षण मंत्री निर्मला सितारामन
यांनी काल निकोबार इथल्या वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली, तसंच त्यांच्याशी
विविध विषयांवर चर्चा केली.
****
राज्यात नुकत्याच दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा
जिंकत बहुमत मिळवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते काल
औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र तसंच राज्य सरकारनं राबावलेल्या विविध
लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात सरकार यशस्वी ठरल्यामुळेच
हे यश संपादन करता आल्याचं त्यांनी म्हटलं. एसटी महामंडळाच्या संघटनांसोबत मुख्यमंत्री
चर्चा करत असून लवकरच याविषयी तोडगा निघणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याप्रकरणी मनेसेचे नगरसेवक संजय
तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल
केली आहे. अन्य
सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तुर्डे हे मनसेचे मुंबईतले एकमेव नगरसेवक
आहेत. शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना पैसे देऊन पक्षात घेतलं असल्याचं, तसंच
आपल्यालाही रक्कम देऊ केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य शासनानं दिलेली
कर्जमाफी अल्पभूधारक आणि पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी लाभदायी असली तरी दीर्घ
मुदतीच्या कर्जदारांना या कर्जमाफीचा लाभ होणार नाही, त्यासाठी दीर्घ आणि मोठ्या कर्जांना
फेडीसाठी पुढे दहा वर्षाची मुदतवाढ द्या आणि त्यावरील व्याज माफ करा अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे.
सोलापूर इथं एका कार्यक्रमात
ते बोलत होते. जे शेतकरी मोठे आहेत, आणि त्यांनी फळबाग अथवा इतर कारणांसाठी दीड लाख
रुपयांपेक्षा अधिक रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेलं आहे, त्यांना या कर्जमाफीमध्ये फायदा
होणार नाही, असं पवार म्हणाले. राज्यातला शेतकरी प्रमाणिक आहे. त्यामुळे त्यांना शेतीसाठी
लागणारे पाणी, खते, बियाणे आणि वेळेवर कर्ज पुरवठा केला तर शेतकरी कदापी कर्जमाफी मागणार
नाही असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी
श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय रॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयने
ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा रजत पदक विजेत्या मलेशियाच्या ली चोंग वेइचा २१-१७, ११-२१,
२१-१९ असा पराभव केला. किदांबी श्रीकांतनंही दक्षिण कोरियाच्या जीओन ह्योक जीनचा २१-१३,
८-२१, २१-१८ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायना नेहवालनं पहिल्या
फेरीत ऑलिम्पिक स्पर्धा विजेत्या कॅरोलिना मरीनचा पराभव केला तर दुसऱ्या फेरीत थायलंडच्या
निचॉन जिंदापोलचा २२
- २०, २१ - १३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महिला एकेरीत भारताची एकमेव सायना नेहवाल
ही खेळाडू उरली आहे. पी. व्ही सिंधूचा
चीनच्या चेन युफीकडून धक्कादायक पराभव झाल्यामुळे तिचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
****
जालना शहरातली बसस्थानक रस्त्यावरची
चार दुकानं काल सायंकाळी भीषण आग लागून खाक झाली. आगीच्या या घटनेत कृषी साहित्याच्या
तीन आणि वस्तू भंडाराच्या एका दुकानातलं साहित्य जळाल्यानं मोठं नुकसान झालं. जालना
नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं सात तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर
इथल्या तुळजाभवानी मंदिरात काल भेंडोळी उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. यानिमित्तानं
तुळजाभवानी मंदिरात भेंडोळी विधीवत काढून हा उत्सव साजरा झाला. हा उत्सव पाहण्यासाठी
भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
शालेय
शिक्षण विभागाच्या सरल या संगणक प्रणालीमध्ये माहिती भरण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबरवरुन
आता येत्या सोमवारपर्यंत म्हणजे २३
ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून
ही माहिती देण्यात आली. ही संगणक प्रणाली दहावीच्या संगणक प्रणालीशी जोडली जाणार आहे,
त्यामुळेच जर ही माहिती वेळेत भरली गेली नाही तर दहावीच्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम
होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शालेय शिक्षण विभागाच्या
वतीनं यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या राज्यातल्या जवळपास दोन कोटी २५ लाख विद्यार्थ्यांची
माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्याचं काम सुरु आहे.
****
नाशिकच्या हिंदुस्थान ॲरोनॉटीक्स लिमिटेड या कारखान्यात
पाचव्या टप्प्यात लढाऊ विमानं तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण
मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. लढाऊ हेलीकॉप्टर
आणि विमानं बनविण्यासाठी खासगी क्षेत्रानं पुढाकार घेतल्यास अशा उद्योगांना पूर्णतः
सहकार्य केलं जाईल असं भामरे म्हणाले. संरक्षण क्षेत्रातल्या काही सरकारी उद्योगांशिवाय
बहुतांशी साधनांसाठी विदेशांवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे भारतात अशी साधनं तयार
होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ई पी एफ ओनं आपल्या
ग्राहकांना आधार क्रमांक त्यांच्या सार्वत्रिक खाते क्रमांकाशी जोडण्यासाठी ऑनलाईन
सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी एफ इंडिया डॉट जीओव्ही
डॉट इन या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे.
****
No comments:
Post a Comment