Thursday, 19 October 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 19.10.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

समान पद समान निवृत्तीवेतन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळच्या गुरेज खोऱ्यात भारतीय सैन्य दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत पंतप्रधानांनी आज दिवाळीचा सण साजरा केला, त्यावेळी ते बोलत होते. जवळपास दोन तास ते या सैनिकांसोबत होते. सलग चौथ्या वर्षी पंतप्रधानांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधानांनी जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या. सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना बलिदान आणि शौर्याची परपंरा लाभली असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी या जवानांचं कौतुक केलं. जवानांसोबत काही वेळ घालवल्यानंतर आपल्याला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यावेळी उपस्थित होते.

****

संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी आज निकोबार इथल्या वायुसेना केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली, तसंच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

****

अफगाणिस्तानमधल्या दक्षिण कंदहार प्रांतात तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. अफगाणिस्तानमध्ये पसरवण्यात येत असलेल्या दहशतवादाबद्दल भारत गंभीर असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे ४३ सैनिक मारले गेले. मध्यरात्रीच्या सुमारास तालिबान्यांनी सैनिकांच्या छावणीवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु केला. या हल्ल्यानंतर सहा अफगाण सैनिक बेपत्ता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

राज्यात नुकत्याच दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकत बहुमत मिळवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र तसंच राज्य सरकारनं राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात सरकार यशस्वी झाल्यामुळेच हे यश संपादन करता आल्याचं त्यांनी म्हटलं. एस टी महामंडळाच्या संपाबाबत बोलतांना एसटी महामंडळाच्या संघटनांसोबत मुख्यमंत्री चर्चा करत असून लवकरच याविषयी तोडगा निघणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज सलग तिऱ्या दिवशीही सुरु राहिला, या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत. धुळे इथं आज एसटी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शनं केली. सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी हा संप सुरु असून, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार एसटी कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसात एसटीच्या धुळे विभागाचं एक कोटी ९० लाखांचं उत्पन्न बुडालं आहे. तर रायगड एस टी विभागास संपाच्या पहिल्या दिवशी ५० लाखांचा फटका बसला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

संपामुळे  प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी अहमदनगरच्या परिवहन कार्यालयानं शालेय विद्यार्थ्यांच्या बसमधून प्रवासी वाहतूक सुरु केली आहे, तर अकोले इथून खाजगी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरु करण्यात आला आहे. राहाता आणि शिर्डी याठिकाणीही खाजगी बसेस मोठ्या संख्येनं उपलब्ध असल्यामुळे वाहतुक सुरळीत सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याप्रकरणी मनेसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. अन्य सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तुर्डे हे मनसेचे मुंबईतले एकमेव नगरसेवक आहेत. शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना पैसे देऊन पक्षात घेतलं असल्याच, तसंच आपल्यालाही रक्कम देऊ केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. 

****

शालेय शिक्षण विभागाच्या सरल या संगणक प्रणालीमध्ये माहिती भरण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबरवरुन आता २३ ऑक्टोबर वाढवण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली. ही संगणक प्रणाली दहावीच्या संगणक प्रणालीशी जोडली जाणार आहे, त्यामुळेच जर ही माहिती वेळेत भरली गेली नाही तर दहावीच्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या राज्यातल्या जवळपास दोन कोटी २५ लाख विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्याचं काम सुरु आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्यामन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ३वा भाग असेल.

****

No comments: