Saturday, 21 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.10.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·     मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप मध्यरात्रीनंतर मागे; २२ डिसेंबरपर्यंत वेतनवाढीचा निर्णय घेऊन उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे सरकारला निर्देश

·     सार्वजनिक तसंच खाजगी क्षेत्रातल्या तीन बँकांना विविध अल्प बचत योजनांतर्गंत ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारची परवानगी

·     नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सुलभ बनवण्याच्या धोरणाला राज्य सरकारकडून दोन वर्षांची मुदतवाढ

आणि

·     डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत आणि दहाव्या पुरुष हॉकी अशिया चषक स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तानसोबत सामना

****

राज्य परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांचा संप मध्यरात्रीनंतर मागे घेण्यात आला आहे. या संपाविरोधातल्या जनहित याचिकांवर काल मुंबई उच्च न्यायालयालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हा संप अवैध असल्याचं सांगत संपकरी कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे तसंच राज्य सरकारला येत्या २२ डिसेंबरपर्यंत वेतनवाढीचा निर्णय घेऊन उच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी काल रात्री संप मागे घेत असल्याचं, एका पत्रकाद्वारे जाहीर केलं. जयप्रकाश छाजेड, संदीप शिंदे, हनुमंत ताटे, मुकेश तिगोटे, आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं हे पत्रक रात्री उशीरा जारी करण्यात आलं.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात परवा सोमवापर्यंत उच्चस्तरीय समिती स्थापन करून, ही समिती स्थापन झाल्याबाबत एस टी कामगार संघटनांना लेखी पत्राद्वारे कळवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

या समितीत वित्त सचिव, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश असेल. ही समिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एस टी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना, तसंच विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशीं चर्चा करेल.

या चर्चेतून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम वेतनवाढ आणि २२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वेतनवाढीचा निर्णय घेऊन, त्यासंदर्भात उच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

दरम्यान, राज्यातली प्रवासी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी गृहविभागानं अधिसूचना काढून सर्व खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतुक बस, कंपनी कामगार वाहुतक बस यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली होती. मात्र हा संप मागे घेण्यात आल्यामुळे, आता ही अधिसूचना रद्द झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्यानं, दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचे गेले चार दिवस हाल झाले.दरम्यान, आज पहाटे पासून एसटी बस धावण्यास सुरूवात झाली आहे. औरंगाबाद बस स्थानकावरून पुणे, जळगाव, इंदुर आदी बस रवाना झाल्याचं स्थानक नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलं.

****

केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व तसंच खाजगी क्षेत्रातल्या तीन बँकांना राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र - एन एस सी, आवर्ती जमा -  आर डी  आणि मासिक उत्पन्न योजना - एम आय पी यासारख्या विविध अल्प बचत योजनांतर्गंत ठेवी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.  खाजगी क्षेत्रामधल्या बँकांमध्ये आय सी आय सी आय,  एच डी एफ सी आणि ॲक्सिस बँकचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना आतापर्यंत फक्त सार्वजनिक भविष्य निधी, किसान विकास पत्र २०१४, सुकन्या समृद्धी योजना, वरिष्ठ नागरिक,  बचत योजना २००४ अंतर्गत ठेवी स्वीकारण्याची परवानगी होती.

****

राज्य सरकारनं नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सुलभ बनवण्याच्या धोरणाला दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. नक्षलवाद्यांविरूद्धचं हे धोरण यशस्वी ठरलं असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी केला आहे. गृहमंत्रालयानं या धोरणाला २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

*** *

राज्य सरकारवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन सुकाणू समितीनं केली आहे. सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले यांच्या नेतृत्वात काल नाशिक इथं सरकारवाडा पोलीस ठाण्यात हे निवेदन देण्यात आलं.  राज्य सरकारनं सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्यानं सरकारवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, असं समितीनं म्हटलं आहे. दरम्यान काल नाशिक इथं बळीराजा गौरव फेरी काढण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातही लासूर स्टेशन इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बळीराजा गौरव मिरवणूक काढून सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारं निवेदन पोलिस ठाण्यात सादर करण्यात आलं.

****

दिवाळी निमित्त होत असलेली गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून नांदेड-मुंबई-नांदेड अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. गाडी संख्या ७०५८ ही गाडी नांदेड इथून उद्या २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि मुंबई इथं दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ७०५७ ही गाडी मुंबई हून २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नांदेड इथं पोहोचेल. ही गाडी मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी या स्थानकांवर थांबेल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भावा बहिणीचं नातं अधोरेखीत करणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा काल सर्वत्र साजरा झाला. विक्रम संवत दोन हजार ७४ ला कालपासून प्रारंभ झाला. दिवाळीच्या पाडव्याला अनेक ठिकाणी म्हशी आणि रेड्यांची मिरवणूक 'सगर' काढण्यात आली जाते. औरंगाबाद तसंच जालना शहर परिसरात गवळी समाजबांधवांनी आपल्या म्हशी तसंच रेड्यांना सजवून मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

****

उस्मानाबाद इथल्या शंकर प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या लक्ष्मी येते घरा उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या दिवशी शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या सात मुलींच्या नावे प्रत्येकी सात हजार रूपयांच्या मुदत ठेवीच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत ही ठेव कायम राहणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धाराशिवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

तुळजापूर इथल्या तुळजा भवानीच्या मंदिरात काल दिवाळी पाडव्यानिमित्त संस्कार भारतीच्या ३० कलाकारांनी विविध रांगोळ्याचं रेखाटन केलं. नगराध्यक्ष पंडीतराव जगदाळे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उदघाटन झालं. या रांगोळ्यावर ठिकठिकाणी पणत्या ठेवण्यात आल्यामुळे मंदिराचा आसमंत उजळून निघाला होता.

भूम इथंही शिवनेरी क्रीडा क्लब आणि पत्रकार संघाच्यावतीनं एक दिवा शहिदांसाठी उपक्रमाअंतर्गत देवी मंदिरात शेकडो दिवे लावण्यात आले तसंच माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

****

डेन्मार्क खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताचा किदंबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत प्रथम मानांकन असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसनचा १४-२१, २२-२० आणि २१-७ असा पराभव केला.

महिला एकेरीत सायना नेहवालचा जपानच्या एकाने यामाकुची हिनं १०-२१, १३-२१ असा पराभव केला. पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयचाही कोरियाच्या सोन वानकडून १३-२१, १८-२१ असा पराभव झाला.

****

बांगलादेशात ढाका इथं सुरू असलेल्या दहाव्या पुरुष हॉकी अशिया चषक स्पर्धेत तिसऱ्या आणि अखेरच्या सुपर फोर सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघात लढत होणार आहे. भारतीय संघ चार गुणांसह तालिकेत प्रथम क्रमांकावर तर पाकिस्तान एका गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे.

****

नांदेड जिल्ह्यात नाम फाऊंडेशनच्यावतीनं जिल्ह्यातल्या ११५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळीचे भेट म्हणून १५ हजार रूपयांचा धनादेश दिला तसंच १७ महिला वारसदारांना साडीचोळीची भेट दिली. यावेळी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक बेलखोडे, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे तसंच डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यात आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेनं औरंगाबाद जिल्हा परिषद कार्यालयासमोर मानधन मिळावं या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातल्या संगणक परिचालकांना फेब्रुवारीपासून मानधन मिळालेलं नाही. त्याचबरोबर हे मानधन महिना सहा हजार रुपये करावं अशीही त्यांची मागणी आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...