Friday, 17 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.11.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

*******

  • सर्व प्रकारच्या डाळींवरची निर्यात बंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
  • पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठीचं चटई क्षेत्र वाढवण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
  • शासकीय कार्यालयात प्लास्टिकबंदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

आणि

  • चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश; पराभवामुळे सायना नेहवाल स्पर्धे बाहेर.

****

सर्व प्रकारच्या डाळींवरची निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी अधिक वाव मिळेल. एकात्मिक बाल विकास योजनेत असलेल्या सगळ्या उपयोजना कायम ठेवण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ११ कोटींहून अधिक लहान मुलं, मुली आणि महिलांना या योजनांचा लाभ होतो.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातल्या लोकांसाठीचं चटई क्षेत्र वाढवण्यासही मंत्रींमंडळानं मान्यता दिली आहे. हे क्षेत्र आता ३२३ चौरस फुटांवरुन ४३० चौरस फुटापर्यंत वाढवून सोळाशे चौरस फूट करण्यात आलं आहे. या योजनेतअंतर्गत ९ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर ४ टक्के तर १२ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर ३ टक्के सूट दिली जाणार आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरु करण्यात आली असून पूर्वलक्षी प्रभावाने हा बदल लागू केला जाईल.

वस्तू आणि सेवा कर- जीएसटी अंतर्गत येणाऱ्या अप्रत्यक्ष कराचा लाभ ग्राहकांना व्हावा, यासाठी राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरणस्थापन करायला मंत्रीमंडळानं मंजूरी दिली. जीएसटीच्या अंमलबजावणीचे फायदे सामान्य नागरिकांना मिळावेत यासाठी सरकारनं हे पाऊल उचलंलं असून यामुळे सरकारची कटीबद्धता दिसून येते, असं विधी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

प्राधिकरणाअंतर्गत एक स्थायी समिती तसंच प्रत्येक राज्यांमध्ये चौकशी समिती तयार केली जाईल. त्याचबरोबर केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळाचं सुरक्षा महासंचालकपदही नव्यानं तयार केलं जाईल, असं रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.

वस्तूच्या दरांमध्ये झालेल्या कपातीचा लाभ ग्राहकांना मिळत नसेल तर यासंदर्भात  ग्राहक त्या राज्यांच्या चौकशी समितीकडे तक्रार नोंदवू शकतील तसंच नफाखोरी घटनांच्या विरूद्ध थेट तक्रारी नागरिक स्थायी समितीकडे करू शकतील असं रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी म्हटलं आहे.

****

राज्य सरकारनं मंत्रालयासह शासकीय कार्यालयात प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत कालबद्ध पद्धतीनं सर्व शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. पर्यावरण मंत्रालयानं यावर्षी गुडी पाडव्यापासून प्लॅस्टिक कॅरी बॅगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅस्टिक बॅग ऐवजी स्वयं सहायता गटानं तयार केलेल्या कागद आणि कापडाच्या पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं मंत्री कदम यांनी सांगितलं. प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार असल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा पटेल यांना राज्यमंत्री पद समकक्ष दर्जा देण्यास शासनानं काल मान्यता दिली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गासाठी ७७ कोटी २० लाख रुपयांचा निधी राज्य शासनानं काल रेल्वे मंडळाला वितरीत केला. या मार्गाचं काम सध्या वेगानं सुरु आहे. या मार्गासाठी एकूण २ हजार ८२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यापैकी १ हजार ४१३ कोटी रुपये इतका निधी राज्य शासनं देणार आहे.

****

हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातल्या मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी लोणीकर बोलत होते. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं नोंदणी करुन आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असं आवाहन लोणीकर यांनी यावेळी केलं.

****

नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ..के.सिन्हा यांनी काल पूर्णा, परभणी आणि गंगाखेड रेल्वे स्थानकांना भेट देऊन, त्याठिकाणी सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. पूर्णा रेल्वे स्थानकावर मालगाडी परिक्षण केंद्र तयार करण्यात आलं असून, त्याच्या आधुनिकीकरणाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. परभणी रेल्वे स्थानकावर सरकत्या जिन्याचं काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार औरंगाबाद मधल्या सिडको एन-२ नालंदा बुध्द विहार, एन-७ आणि बुढीलेन हनुमान मंदीर या अनधिकृत धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काल महापालिका प्रशासनानं हटवलं.

****

औरंगाबाद इथं राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वृत्तपत्रांसंबंधी आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी काल धरणे आंदोलन करण्यात आलं. पत्रकार निवृत्तीवेतन योजना, छोट्या वृत्तपत्रांचे जाहिरात विषयक आणि अन्य प्रश्न, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि मजीठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांचं निवेदन पत्रकार हल्ला विरोधी कृती मिती, मराठी पत्रकार रिषद तसंच विवि पत्रकार संघटनांच्या वतीनं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांना देण्यात आलं. परभणी इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच मागण्यासाठी पत्रकारांनी धरणे आंदोलन केलं.

कोल्हापूर इथंही झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, कोल्हापूर प्रेस क्लबसह बेळगावातले पत्रकार सहभागी झाले होते.

****

औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालय आणि महात्मा गांधी मिशन वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं माध्यमांसमोरील आव्हानंया विषयावर चर्चासत्राचं आयोजन काल करण्यात आलं होतं. प्रादेशिक भाषेच्या माध्यमांच्या श्रोत्यांत वाढ होताना दिसत असल्याचं मत, माहिती खात्याचे उपसंचालक यशवंत भंडारे यांनी व्यक्त केलं.

लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयातही राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त प्राचार्य शिवशंकर पटवारी यांचं व्याख्यान झालं.

****

परभणी महोत्सवासाठी १५ लाख रुपयांचा निधी देण्यास महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं काल मंजुरी दिली. सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उद्यापासून सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय सबज्युनियर अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेसाठीही १० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली.

***

राज्यातल्या कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी शासनानं १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही.

****

शेतकरी, शेतमजूर यांना न्याय द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं तहसील कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला. येत्या ११ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना पवार यांनी दिला.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या युए हानचा पराभव केला. मात्र सायना नेहवालचा पराभव झाल्यामुळे स्पर्धेतलं तिचं आव्हान संपुष्टात आलं आहे.    

*****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाता इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारताच्या ११ षटकं पाच चेंडूंत तीन बाद १७ धावा झाल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे काल सामना उशिरा सुरु झाला. चहाच्या मध्यांतरानंतर खेळ सुरु झाला मात्र पावसामुळे पुन्हा खेळ थांबवावा लागला.

****

ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील यांचं काल मुंबईतल्या खासगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. शासकीय सेवेतून बाहेर पडून पत्रकारितेत आपला ठसा उमटवणाऱ्या पाटील यांनी, विस्तारित मुंबई तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रदीर्घ लेखन केलं आहे.

****

लातूर इथं आजपासून महाऊर्जा विभागाचं, विभागीय कार्यालय सुरु होणार आहे. यानिमित्त आजपासून अपारंपारीक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन साधनांची माहिती देणारं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २० नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार असल्याची माहिती महाऊर्जाचे महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी दिली आहे.



*******

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 11 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 11 April -2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...