Sunday, 19 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.11.2017 01.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १९ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*******

व्यापारी आणि उत्पादकांनी वस्तू आणि सेवा कराच्या दरात केलेल्या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी व्यापारी आणि उत्पादकांना केलं आहे. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. प्रत्येक किरकोळ विक्रेत्यानं कमी किंमतीत सगळे कर समाविष्ट होतील, याची खात्री करुन घ्यावी, असं ते म्हणाले. जीएसटी रेट फाईंडर ॲपवर ग्राहक जीएसटीच्या नवीन दरांबाबत माहिती बघू शकतात, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी विवरणपत्रात बदल करण्याची सुविधा उद्यापासून उपलब्ध होणार असल्याचं जीएसटी मंत्रीगटाचे अध्यक्ष सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं. इन्फोसिसच्या मदतीनं हे काम केलं जाईल असं ते म्हणाले.  वस्तू आणि सेवा कराच्या दरात २०० वस्तूंमागे कपात करण्यात आली असून, या कपातीचा गैर फायदा घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.         

****

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज शंभरावी जयंती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ शक्तीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांचं स्मरण करुन आदरांजली वाहीली. 

दरम्यान, यंदाचा इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे.  इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टनं ही माहिती दिली. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

****

काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या मंजुरीसाठी उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. समितीनं निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया नऊ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण केली जाण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं पक्षांतर्गत निवडणूक पूर्ण करण्यासाठी पक्षाला या वर्षअखेर पर्यंतची मुदत दिली असल्यामुळे ही निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी करणं आवश्यक आहे.

****

भारतातल्या कारागृहात शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानी आणि अन्य देशांच्या कैद्यांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना मायदेशी परत पाठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले.  

****

एक्क्याण्णवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान बडोदा इथं होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बडोदा इथं झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही घोषणा केली. बडोद्यातल्या सयाजीराव विद्यापीठाच्या परिसरात हे संमेलन होणार असून, स्वागताध्यक्षपदी शुभांगिनी गायकवाड असतील. या संमेलनात परिसंवाद, विसंमेलन, कवितावाचन, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांनी आपला ऊसाचा दर लवकरात लवकर जाहीर करावा ज्यामुळे शेतकरी ज्यांना परवडेल त्यांना ऊस देऊ शकेल, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. ते आज अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेवटच्या हप्त्यात शेतकऱ्यांना ऊसाचा पाहिजे तो भाव मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्ग निवडावा, असं ते म्हणाले.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या तळे हिप्परगावजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे हा अपघात झाला. मृत तिघेही सोलापूरचे रहीवाशी होते.

****

हैदराबाद रेल्वे विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉक मुळे नांदेड ते मेडचल पेसेंजर गाडी आजपासून ते २५ नोव्हेंबर पर्यंत न निझामबाद पर्यंतच धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या मागणीसाठी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्याबद्दल जाब विचारण्याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे इथं ही माहिती दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा आणि नंतरच ऊस तोडावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा पाटीजवळ ऊस गाड्या अडवून आंदोलन केलं. या मागणीवर सकारात्मक विचार न झाल्यास यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

*******

No comments: