आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
काँग्रेस कार्यकारिणी
समितीची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या
अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा होणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीची अधिसूचना
आज जाहीर केली जाणार आहे. या टप्प्यात एकूण ९३ मतदारसंघासाठी
पुढच्या महिन्यात १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी
अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. एकूण १८२ जागांपैकी सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या ८९ जागांसाठी
पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
****
वातावरणातल्या बाष्पाचं
प्रमाण वाढल्यानं आज आणि उद्या राज्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, औरंगाबादसह काही शहरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवसांत कोकणचा दक्षिण भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच उर्वरित भागात हवामान कोरडं राहील, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
सातारा आणि नाशिक जिल्ह्यात
ढगाळ वातावरण आहे. आज सकाळी सातारा शहर
आणि तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
****
अमृतसरहून येणारी सचखंड
एक्स्प्रेस ही गाडी १३ तास उशीरा धावत असल्यामुळे नांदेडहून निघणारी हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्पप्रेस ही रेल्वेगाडी
आज सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी एक वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क
कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादनाला
चांगला भाव मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा
पटेल यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या कयाधू नदीवरच्या नागासिंदगी
आणि घोटा या दोन बंधाऱ्यांचं भूमिपूजन काल पटेल
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनानं सर्व डाळींवरील निर्यातीची
बंदी उठवली असल्यानं शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादनाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार
असल्याचं ते म्हणाले.
*******
No comments:
Post a Comment