Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मार्च २०१८ दुपारी १.०० वा.
****
औरंगाबादचे
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. कचरा आंदोलन प्रकरणी आंदोलकांवर लाठीमार
आणि दगडफेक केल्याप्रकरणी ही कारवाई केली असल्याचं ते म्हणाले. शहरातल्या कचराप्रश्नी
आज विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी
याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पोलिस
महासंचालक यांच्या समितीच्या माध्यमातून एका महिन्यात चौकशी करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांसाठी केलेल्या गदारोळामुळे
संसदेचं कामकाज आजही प्रभावित झालं. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच पंजाब नॅशनल बँकेसह
विविध मुद्यांवर विरोधी पक्षांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली.
त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर
दिवसभरासाठी स्थगित केलं.
राज्यसभेत माजी मंत्री वाय एस चौधरी यांनी आंध्र
प्रदेश राज्याच्या विभाजनावर केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ
केला. २०१४ मध्ये झालेली आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती अत्यंत घाईने आणि अवैज्ञानिक
पद्धतीनं केली असल्याचं ते म्हणाले. यावर काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेत गोंधळ
घातला. यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ मार्चला आकाशवाणीवरच्या
मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग
असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक
सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र
मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
तामिळनाडूचा सत्तधारी पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र
कळघम - एआयएडीएमकेमधून बाहेर पडलेले आमदार
टीटीव्ही दिनकरन यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. अम्मा मक्कल मुनेत्र कळघम असं या
पक्षाचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी मुख्यमंत्री जयललिता यांचं छायाचित्र
असलेल्या पक्षाच्या झेंड्याचंही अनावरण करण्यात आलं. मदुराई इथं झालेल्या या सोहळ्यात
विधानसभेतले १८ निलंबित आमदार दिनकरन यांच्यासोबत उपस्थित होते.
****
चारा घोटाळा प्रकरणी चौथ्या
खटल्यात रांची इथलं विशेष सीबीआय न्यायालय आज निर्णय देणार आहे. सरकारी
कोषातून डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ या
काळात तीन कोटी ३१
लाख रुपये काढण्यातल्या गैरव्यवहार
प्रकरणी हा खटला दाखल आहे. त्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि
जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य ३०
जणांचा आरोपींमधे समावेश आहे.
****
जागतिक
बँकेनं आगामी वर्षासाठी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सात पूर्णांक
तीन दशांश टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर
२०१९-२० मध्ये तो वाढून सात पूर्णांक पाच दशांश
टक्क्यांवर जाण्याची शक्यता जागतिक बँकेच्या द्विवार्षिक प्रकाशनात व्यक्त करण्यात
आली आहे. येत्या ३१
मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक
वर्षात विकासाचा दर सहा पूर्णांक सात दशांश राहील, मात्र
भारतातल्या अर्थ सुधारणा व्यापक करण्यासाठी आठ टक्क्यांपेक्षा
जास्त विकास दर आवश्यक असल्याचं मतही या अहवालात व्यक्त करण्यात आलं.
****
पंजाब
नॅशनल बँकेसारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या घोटाळ्यांसारखी प्रकरणं
हाताळण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार हवेत, अशी मागणी बँकेचे
गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केली आहे. गुजरातमधल्या गांधीनगर इथं
गुजरात राष्ट्रीय कायदा विद्यापिठात ते बोलत होते. सरकारी
बँक आणि खाजगी बँकांसाठी रिझर्व्ह बँकेकडे समान आधिकार असावेत अशी विनंती त्यांनी
यावेळी सरकारला केली.
****
सक्तवसुली
संचालनालयानं १२ हजार ६३७
कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक
घोटाळ्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्या विरोधात
रेडकॉर्नर नोटीस जारी करण्याची
मागणी इंटरपोलकडे केली आहे. या
दोंघाविरुद्ध अजामिनपत्र वॉरंट निघाली असून, त्या
आधारावर इंटरपोलकडे ही मागणी केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यासंदर्भात
फ्रान्स मधल्या लियोन इथल्या इंटरपोलच्या मुख्यालयाशीही सीबीआयनं संपर्क साधावा
अशी विनंती सक्तवसुली संचालनालयानं केली आहे.
****
बर्मिंघम इथं सुरु असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन
स्पर्धेत आज पी व्ही सिंधू, के श्रीकांतसह सात भारतीय खेळाडू उपान्त्यपूर्व फेरीतले
सामने खेळणार आहेत. सिंधुचा सामना थायलंडच्या निचाऑन जिंदपॉल विरुद्ध, श्रीकांतचा सामना
चीनच्या यूजिआंग हुआंग विरुद्ध, तर एच एस प्रणयचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तो
विरुद्ध होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment