Friday, 16 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 16.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात प्लास्टिक तसंच थर्माकोल पासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना कमाल २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्या, तसंच थर्माकोल आणि प्लास्टीक पासून बनवण्यात येणाऱ्या ताटल्या, कप, ग्लास, काटे चमचे, वाट्या, स्ट्रॉ, मेणकापड, पाकिटं, सर्व प्रकारचे प्लास्टिक वेष्टनं यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आयात आणि वाहतूक करण्यास राज्यात बंदी असणार आहे.

मात्र औषधांची वेष्टनं, वन आणि फलोत्पादन, कृषी, रोपवाटिका या क्षेत्रासह घनकचरा हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य साहित्य या बंदीतून वगळण्यात आलं आहे. या कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या या साहित्यावर ठळकपणे तसं नमूद करावं लागेल असं कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

****

रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी कडक धोरण स्वीकारणार असल्याचं सांगत, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी, रिक्षा टॅक्सी चालकांनी आपली वर्तणूक सुधारावी असं आवाहन आज विधानपरिषदेत केलं. तक्रार दाखल करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांकाचा स्टिकर रिक्षा आणि टॅक्सी मध्ये लावणं अनिवार्य केलं जाईल, ओला आणि उबेरला सिटी टॅक्सीचा दर्जा देऊन, त्या सीएनजीवर चालवणं सक्तीचं केलं जाईल, अशा घोषणा रावते यांनी यावेळी केल्या. राज्यात चार लाखाच्या घरात बेकायदेशीर रिक्षा आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई केली तर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे या बेकायदा रिक्षा चालकांना परवाना घेण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत दिली आहे, आवश्यकता भासली तर ही मुदत एक दोन महिन्यांसाठी वाढवली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्याचं नवीन वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २०२३ जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणात येत्या पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मिती करण्याचं तसंच २०२२ पर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

****

बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाळूच्या कमतरतेमुळे रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी, राष्ट्रीय हरित लवादाकडून विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

****

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातही स्वतंत्र परिचर्या संचालनालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याविषयीची कार्यवाही आरोग्य संचालनालय स्तरावर सुरू आहे. परिचर्या संचालनालय पुढील सहा महिन्यात होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.

****

वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या प्रदूषण निर्मुलनासाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या २५ हायब्रीड बसेसचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यापुढील काळात शंभर टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त डी.एम.मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे. औरंगाबादच्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव या पदावर त्यांची बदली झाली असून, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

****

मराठवाड्यात आजही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यात माजलगावसह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी तसंच अंबा खरबूज, टरबुजाचं मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

नांदेड जिल्ह्यात दुपारनंतर भिज पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस सुरु असून, हळद, गहू, ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही सकाळच्या सुमारास तुरळक पाऊस झाला

****

औरंगाबाद इथं आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या जनसुनावणीत निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळं फासलं. सराटे हे मराठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त एजन्सीचं ते काम करत असल्याचा आरोप करत कायर्यकर्त्यांनी काळं फासल्याचं वृत्त आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...