Sunday, 1 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक एप्रिल  २०१ दुपारी १.०० वा.

****



  दक्षिण काश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या चकमकीत दहा दहशतवादी ठार झाले, तर तीन जवान जखमी झाले. यात हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. शोपिया जिल्ह्यात सात दहशतवादी, तर अनंतनाग जिल्ह्यात एक दहशतवादी मारला गेला, आणि एका दहशतवाद्यानं आत्मसमर्पण केल्याचं पोलिस महानिदेशक एस पी वैद यांनी सांगितलं. शोपिया जिल्ह्यात कछदूरा परिसरात तिसरी चकमक सुरु असून, यात दोन दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन खासगी शाळांच्या शिक्षकांसह एका खासगी शिकवणी चालकाला आज अटक केली. शिकवणी चालक तौकीरनं बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर सुरु होण्याच्या अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका शिक्षकांना पाठवल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी आतापर्यंत ६० जणांची चौकशी करण्यात आली आहे.

 दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला दहावीच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीएसईच्या अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या ईमेल संदर्भात गुगलकडून माहिती मिळाली आहे. संबंधित ईमेल आयडी मिळाला असून, मेल पाठवणाऱ्याची ओळख पटली असल्याचं गुन्हे शाखेचे विशेष आयुक्त आर पी उपाध्याय यांनी सांगितलं. दहावीच्या विद्यार्थ्याला वॉट्सअपवर गणिताचा पेपर मिळाला होता. त्यानं आपल्या वडिलांच्या ई-मेल आयडीवरून सीबीएसईच्या अध्यक्षांना याबाबतचा मेल पाठवला होता. याप्रकरणी संबंधित विद्यार्थी आणि आणि त्याच्या वडिलांची चौकशी सुरू आहे.

****



 देशभरात मालवाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक बिल प्रणाली आजपासून लागू झाली. त्यानुसार व्यापारी आणि वाहतुकदारांना ५० हजार रुपयांहून अधिक मूल्याचा माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्यासाठी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी निरीक्षकाला ई-वे बिल सादर करावं लागणार आहे. ई-वे बिलाच्या वैधतेचा कालावधी जीएसटी अर्ज ई डब्ल्यू बी- एक च्या भाग बी मधलं विवरण दिल्यानंतरच लागू होणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. वाहतुकदारांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल पाठवण्यासाठी दोन्ही वाहतुकदारांकडे एकई-वे बिल असणं गरजेचं असेल, असंही अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

****



 युवा डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाशी प्रामाणिक राहून सेवा करण्याचं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे. जयपूर इथल्या महात्मा गांधी आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टरांनी विनम्र, भावनाप्रधान तसंच मदतीचा हात देणारं बनावं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हवामानातील बदल तसंच तापमानवाढ सारख्या समस्यांवर सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचंही ते म्हणाले.

****



 भारतीय तेल महामंडळानं २०३० पर्यंत आपलं पेट्रो रासायनिक उत्पादन तसंच तेल-संशोधन क्षमता दुप्पट करण्याचं ध्येय ठेवलं आहे. उत्पादन १५ कोटी टन करण्याचं उद्दीष्ट असून, त्यासाठी एक लाख ४३ हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. पेट्रोलियम पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी हा विस्तार केला जाणार असून, महामंडळानं पेट्रो रासायनिक आणि पर्यायी इंधन क्षेत्रातही काम सुरु केलं असल्याचं मंडळाचे संचालक बी.वी रामा गोपाल यांनी सांगितलं.

****

 मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांच्या कथित मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दहा राज्यांच्या पोलिस महानिदेशकांना उत्तर मागितलं आहे. एकांत कारावास, कैद्यांना कुटुंबियांना भेटण्याचा अधिकार आणि त्यांचं मानसिक समुपदेशन यासारख्या मुद्यांवर, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, आसाम आणि बिहार या राज्यांना आठ मे पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. तुरुंगाचे नियम आणि मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप न्यायालयाच्या मदतीसाठी नियुक्त केलेल वकील गौरव अग्रवाल यांनी केला आहे.

****



 यावर्षी रेडीरेकनर दरात बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरवर्षी एक एप्रिल रोजी या दरांमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ केली जाते. मात्र यंदा दरवाढ न करण्याच्या निर्णयामुळे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुली उत्पन्नात घट होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेस पक्ष अधिक जागा जिंकेल, असा विश्वास गुजरातचे काँग्रेस प्रभारी खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केला आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. गुजरातमध्ये पक्षबांधणीला आपलं प्राधान्य असल्याचं सातव म्हणाले. सातव यांची नुकतीच गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असल्याचं, सातव म्हणाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं, गुजरातमधल्या सर्व २६ जागा जिंकल्या होत्या.

*****

***

No comments: