Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर केंद्र सरकारनं आज पुनर्विचार याचिका
दाखल केली. या कायद्याखाली दाखल झालेल्या प्रकरणांमधल्या आरोपींना चौकशीशिवाय अटक करू
नये, असे निर्देश न्यायालयानं नुकतेच दिले असून, अशा प्रकरणातल्या आरोपींसाठी अटकपूर्व
जामिनाची तरतूदही केली आहे. यामुळे या कायद्यातल्या तरतुदी निष्प्रभ होतील आणि गुन्हेगारांना
कायद्याची भीती राहणार नाही, परिणामी निर्णयाचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे, असं सरकारचं
मत आहे. सरकार दलितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद
यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष या घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
****
संसदेचं कामकाज आजही
बाधित झालं. विविध पक्षांच्या खासदारांनी आपापल्या मागण्यांसाठी केलेल्या गदारोळामुळे
दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेत कामकाज
सुरु होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आपल्या विविध मागण्या लाऊन धरत घोषणाबाजीला
सुरुवात केली. संसदेचं कामकाज न होणं ही लोकशाहीची थट्टा असल्याचं सांगत सभापती व्यंकय्या
नायडू यांनी, कामकाज चालू देण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही विरोधकांचा गदारोळ कायम
राहिल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
अखिल भारतीय अण्णा
द्रमुक मुनेत्र कळघम - एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरी पाणी वाटपप्रश्नी व्यवस्थापन
मंडळ स्थापन करण्याची मागणी लावून धरत, घोषणाबाजी केली. या सदस्यांनी अध्यक्षांच्या
आसनासमोर हौद्यात उतरुन फलक झळकावले. तसंच काँग्रेसचे कांतीलाल भुरिया आणि राष्ट्रीय
जनता दलाचे जे पी एन यादव यांनी ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या
निर्णयाचा मुद्दा उपस्थित केला. या गदारोळामुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सदनाचं
कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं,
लोकसभेचं कामकाज
पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता, सरकारविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर
पुढे कार्यवाही करण्यासाठी सदनाचं कामकाज सुरळीत नसल्याचं सांगत, अध्यक्षांनी कामकाज
दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
राज्यात
वेगानं सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये आजपासून सामाजिक-मानवी
माहिती संकलनाला सुरुवात होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती
दिली. नीति आयोगातर्फे राबवल्या जाणाऱ्या एका विशेष कार्यक्रमांतर्गत देशातल्या
१०१ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात राज्यातल्या उस्मानाबाद, गडचिरोली, वाशीम
आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. माहिती-संकलनाच्या आधारे
संबंधित जिल्ह्यांमधल्या प्रगतीचा आढावा घेणं शक्य होईल, असं
पाटील यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापन प्रश्नी
महापालिकेनं गती घेतली असून येत्या काही महिन्यात कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार
असल्याचं आश्वासन, महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलं आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय
केंद्र आणि महात्मा गांधी मिशन यांच्या वतीनं आज औरंगाबाद इथं आयोजित कचराकोंडी जागर
संवादात ते बोलत होते. मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात कार्यरत पद्मश्री डॉ.शरद
काळे यांच्यासह राज्यातल्या विविध स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर या खुल्या संवादात
सहभागी झाले आहेत. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ काळे यांनी, प्रत्येकानं
घरातला कचरा, महापालिकेकडे जाऊ न दिल्यास कचराकोंडी फुटेल, असं मत नमूद केलं. या वेळी
उपस्थितांना कचरा न करण्याची, अन्न वाया न घालण्याची, तसंच प्रत्येकानं तीन झाडं लावण्याची
शपथ देण्यात आली.
****
औरंगाबाद शहरातल्या माणिक रुग्णालयाला
आज सकाळच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाचे चार ते सहा बंब आणि पाण्याच्या अनेक
टँकर्सच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणल्याची माहिती जवाहर नगर पोलिस ठाण्याकडून देण्यात
आली. या रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
घाटी रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचं, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी सांगितलं.
****
साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या क्षेत्राचं
पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचं कर्तव्यच आहे, असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलं आहे. नांदेड इथं प्रसाद
वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार प्रदान
सोहळ्यात ते काल बोलत होते.
रत्नागिरीचे अभिजित हेगशेट्ये यांना रानवीचा
मान या कादंबरीसाठी, प्रसाद बन वाङमय पुरस्कार,
ज्येष्ठ कवी - चित्रकार भ.मा.परसवाळे यांना तर मातोश्री पद्मिनीबाई बन साधना
सन्मान, तर प्रदीप पाटील यांना गावकळा या कादंबरीसाठी आणि समीक्षक बाळू दुगडूमवार यांना
बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद या समीक्षा ग्रंथासाठी प्रसाद बन ग्रंथ गौरव
पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment