Wednesday, 4 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४  एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****



Ø अॅट्रॉसिटीसंदर्भातल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; फेरविचारासाठी दहा दिवसानंतर सुनावणी घेणार

Ø खोट्या वृत्तांकनाला आळा घालण्यासाठीच्या तरतूदीसंदर्भातला आदेश रद्द

Ø जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात परभणी जिल्ह्यातला जवान शुभम मुस्तापूरे याला वीरमरण

आणि

Ø ८० हजार रूपयांच्या लाचप्रकरणी बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडेसह शिपायाविरूद्ध गुन्हा दाखल

*****



 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटीबाबत गेल्या २० मार्च रोजी दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात फेरविचार करण्याचं मान्य करत न्यायालयानं पुढची सुनावणी दहा दिवसानंतर घेण्यात येईल असं सांगितलं. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनासह इतर सर्व पक्षकारांनी आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. 

 या निर्णयाबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं, जे लोक या निर्णयाला विरोध करत आहेत, त्यांनी न्यायालयाचा निर्णय नीट वाचला नसल्याचं सांगत, या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायालय ॲट्रॉसिटी कायद्याविरोधात नाही, न्यायालयाच्या या निर्णयानं ॲट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल केला नसून, फक्त निर्दोष नागरिकांना अटक होण्यापासून संरक्षण दिलं असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे.

****



 संसदेचं कामकाज काल १९व्या दिवशीही बाधित झालं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तेलगु देसम पक्ष, आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या खासदारांनी विविध मुद्यांवरुन घोषणाबाजी केल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

 त्यापूर्वी राज्यसभेत काल नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातले रविशंकर प्रसाद, मनसुख मांडविया, जे पी नड्डा, थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, यांचा समावेश आहे. काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वंदना चव्हाण, तृणमूल काँग्रेसचे अबीर रंजन, शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे केशव उर्फ कुमार केतकर, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह ४१ नव्या सदस्यांनी काल राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

****



 खोट्या वृत्तांकनाला आळा घालण्यासाठी केलेल्या तरतूदी मागे घेण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयानं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केली आहे. खोटी माहिती छापल्यास किंवा प्रसारित केल्यात संबंधित पत्रकाराचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्यासंबंधी तरतूदी माहिती प्रसारण मंत्रालयानं जारी केल्या होत्या. त्याला पत्रकारांनी विरोध केला असून, अनेक सुधारणाही सूचवल्या जात आहेत. या सूचनांचं स्वागत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

****



 जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात कृष्णाघाटी इथं नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात परभणी जिल्ह्यातले जवान शुभम मुस्तापूरे यांना वीरमरण आलं. काल सकाळी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरु केला. दोन तास झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं. मुस्तापुरे हे परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात कोनेरवाडी इथले रहिवासी आहेत. त्यांचं पार्थिव आज दुपारी १२ वाजेपर्यंत औरंगाबाद मार्गे त्यांच्या गावात पोहचेल, त्यानंतर सायंकाळी त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

****



 राज्यातल्या रास्तभाव दुकानदारांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केलं आहे. मंत्रालयात काल ते वार्ताहरांशी बोलत होते. रास्तभाव दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी वाहतुकीच्या सवलत दरांमध्ये ७३ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत खुल्या बाजारातली साखर वगळून  गव्हाच्या ४ जाती, तांदळाच्या ११ जाती, खाद्यतेल, किराणा आणि भाजीपाला या वस्तुंची विक्री करण्यासही परवानगी देण्यात आल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं.

****



 नागपूर इथल्या दीक्षाभूमीच्या विकास कामासाठी शंभर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली. कामठी इथं ड्रॅगन पॅलेस टेंपल तसंच ठाण्यात सांस्कृतिक केंद्र उभारणं, परळमध्ये संत रोहिदास भवन उभारणं आदी विविध कामांसाठीही निधी मंजूर केला असून, यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची सुकाणू संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 व्यायामशाळेच्या बांधकामासाठी मंजूर झालेलं तीन लाख रूपयाचं अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे आणि शिपाई शेख फईमोद्दीन यांच्या विरूद्ध काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. गेवराई तालुक्यात बऱ्हाणपूर इथं तक्रारदाराची व्यायामशाळा असून नवीन बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून त्याला मंजूरी मिळाली होती. अनुदानाची ही रक्कम बँक खात्यावर टाकण्यासाठी खुरपुडे यांनी दोन लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ८० हजाराची लाच स्वीकारतांना कार्यालयाचा शिपाई शेख फईमोद्यीन याला रंगेहाथ पकडण्यात आलं तर या प्रकरणात खुरपुडे यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****



 जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी पुण्यातल्या वैंकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवर  उपस्थित होते.

****



 औरंगाबाद जिल्हा परिषदेतल्या अपंग समावेशित युनिटमधल्या ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुर्नस्थापनचे आदेश काढताना नियमांचे पालन न केल्याबद्दल शिक्षण विभागातले कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील यांना काल निलंबित करण्यात आलं. कळम पाटील यांनी संचिका नियमानुसार योग्य अधिकाऱ्यांमार्फत सादर न करता स्वतः लिहून त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन विशेष शिक्षकांच्या सेवा पुर्नस्थापनेचा आदेश जारी केला होता. चौकशीत कळम पाटील दोषी आढळल्यानं त्यांना निलंबीत करण्यात आलं.

 दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेतल्या पाच कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबीत करण्यात आलं असून या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं, अशी मागणी जिल्हा परिषदेतल्या कमर्चाऱ्यांनी केली आहे.

****

 भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस येत्या सहा एप्रिलला साजरा होत आहे. या निमित्तानं मुंबईत वांद्रे - कुर्ला संकुलात महाभाजप महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सायंकाळी ६ वाजता वैजापूर नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत ते मार्गदर्शन करतील.

****



 औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा दुग्धनगरीच्या जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संनियंत्रण समितीनं दुग्धनगरीच्या पाच एकर जागेवर केंद्रीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार या प्रकल्पाचं रेखांकन  करायला गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला काल स्थानिक नागरिकांनी परत पाठवलं. त्यानंतर नागरिकांनी महापौरांची भेट घेवून विमानतळाजवळ प्रक्रिया प्रकल्प उभारणं नियमबाह्य असून हा प्रकल्प उभारण्यास आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम नागरिकांशी चर्चा करणार असून पदाधिकारी या नात्यानं आपण नागरिकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू असं महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे.

****



 अमृतसरहून येणारी रेल्वेगाडी बारा तास उशिरानं आल्यामुळे नांदेड इथून सकाळी साडे नऊ वाजता सुटणारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही आज तिच्या नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा म्हणजे दुपारी बारा वाजता सुटणार आहे. तर  अकोला मार्गे जाणारी नांदेड ते अमृतसर एक्स्प्रेसही सकाळी  अकरा वाजेऐवजी दुपारी तीन वाजता सुटणार आहे, असं रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

****

 लातूर शहरात अनधिकृतरित्या नळजोडणी अधिकृत करुन घेण्याचं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. एका वर्षाची पाणीपट्टी आणि नळजोडणीचं नियमित शुल्क भरुन नळजोडणी अधिकृत करण्याची योजना मनपा राबवणार आहे.

****



 ग्रामीण भागात स्वच्छतेच्या कामी महिलांची भूमिका महत्वाची असल्याचं मत परभणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी व्यक्त केलं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाथरी तालुक्यातल्या आशाताई, अंगणावाडी ताई, मदतनीस तसंच महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांच्यासाठी जनजागृती प्रशिक्षणात त्या काल बोलत होत्या. यावेळी शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

****



 राज्यात काल सर्वात जास्त ४१ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. परभणी ४१ पूर्णांक चार, नांदेड ४० पूर्णांक पाच, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या तीन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...