Thursday, 5 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

५ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 परभणी जिल्ह्यातले हुतात्मा जवान, शुभम मुस्तापूरे यांच्या पार्थिवावर आज पालम तालुक्यात कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. काल सायंकाळी या जवानाचं पार्थिव सेनादलाच्या विशेष विमानानं औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर आणण्यात आलं. विमानतळावर मानवंदना दिल्यानंतर ते परभणीकडे रवाना करण्यात आलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  परवा जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुस्तापुरे यांना वीरमरण आलं होतं.

****

 राज्यातल्या महाजनकोच्या औष्णिक वीज प्रकल्पांना पुरेसा कोळसा केंद्राकडून उपलब्ध होणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इंथं बावनकुळे यांनी केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांना पुरेसा कोळसा मिळण्याबाबतची मागणी केली, त्यांनतर त्यांनी ही माहिती दिली. वाढता उन्हाळा बघता अधिक वीज लागणार असून, वीजेची कपात होऊ नये यासाठी राज्यातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना पुरेसा कोळसा वेळेच्या आत उपलब्ध होण्याबाबतची मागणी बावनकुळे यांनी यावेळी केली.

****

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४७ हजारांहून अधिक शाळा प्रगत, तर ६३ हजारांहून अधिक शाळा डिजिटल झाल्या असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. प्रगत आणि डिजिटल शाळा होण्याचं प्रमाण हे दुप्पट आहे. कार्य आधारीत शिक्षण देणाऱ्या शाळा आणि आयएसओ प्रमाणित शाळांच्या संख्येतही गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

 औरंगाबाद इथला हवालदार संतोष त्रिभुवन याला २५ हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. एका दाखल असलेल्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी त्रिभुवन यानं ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

 तर दुसऱ्या एका प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातल्या भेंडाळा इथला ग्रामसेवक विश्वनाथ पुरी याला दीड हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. एका हॉटेल व्यावसायिकाला वीज जोडणीचं ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 11 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 11 April -2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...