Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 5 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं
सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतानं पहिलं सुवर्ण पदक
जिंकलं आहे. भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूनं
४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. पी. गुरुराज यानंही भारोत्तोलनात रौप्य
पदक पटकावलं आहे.
बॅडमिंटनमधे
मिश्र दुहेरीच्या ‘अ’ गटात भारतानं श्रीलंकेचा पराभव केला. टेबल टेनिसमधेही
भारतानं श्रीलंकेला हरवत विजयी सुरुवात केली. मनिका
बत्रा आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी एकेरीतले सामने जिंकले, तर
दुहेरीतही पूजा सहस्त्रबुद्धे आणि सुतीर्थ मुखर्जी यांच्या जोडीनं बाजी मारली. हॉकीमधे
मात्र भारताला वेल्सकडून दोन
- तीन असा पराभव पत्करावा लागला.
****
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही
व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच अखिल भारतीय अण्णा द्रमुक
मुनेत्र कळघम - एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरी पाणी वाटपप्रश्नी व्यवस्थापन
मंडळ स्थापन करण्याची मागणी करत, अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन फलक झळकावले.
तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनीही आपल्या विविध मागण्या लावून धरत घोषणाबाजी केली.
यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं
होतं. त्यानंतर कामकाज परत सुरु झाल्यावरही गदारोळ सुरुच राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज
दिवसभरासाठी स्थगित केलं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर दोन नवीन सदस्यांना
सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी विविध मागण्यांवरून गोंधळ सुरु केल्यानं
सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
दरम्यान, भाजपसहित राष्ट्रीय लोकशाही
आघाडी सरकारमधल्या इतर घटकपक्षांच्या सदस्यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या
दुसऱ्या सत्राच्या २३ दिवसांचं वेतन आणि भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय
कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांच्या सातत्यपूर्ण गोंधळामुळे
संसदेत महत्त्वाची विधेयकं मांडता आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
****
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या न्यायालयानं अभिनेता
सलमान खान याला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणातले इतर आरोपी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री
तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. १९९८ साली
एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण
कायद्याअंतर्गत सलमानला दोषी ठरवण्यात आलं आहे.
****
एक
एप्रिलपासून सुरु झालेल्या २०१८-१९ या नव्या आर्थिक वर्षासाठीचं पहिलं द्वैमासिक पतधोरण
भारतीय रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार आहे. याच संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित
पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक धोरण विषयक समितीची दोन दिवसीय बैठक कालपासून मुंबईत
सुरू झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर
महत्त्वपूर्ण धोरणात्मक दरांत कपात होण्याची अपेक्षा आहे.
****
केंद्रीय
मंत्रिमंडळानं मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक २०१८ ला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय
बाल हक्क संरक्षण आयोगात एका महिला प्रतिनिधीचा समावेश मानीव सदस्य म्हणून करण्याची
तरतूद या विधेयकात प्रस्तावित आहे. केंद्रशासित प्रदेशांमधल्या मानवाधिकार उल्लंघन
प्रकरणांकडे लक्ष देण्यासाठी एक यंत्रणा उभारण्याची तरतूदही या विधेयकात आहे.
****
सार्वजनिक
निवडणुकांमधे एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त मतदारसंघांमधून निवडणूक लढवायला निर्बंध
घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर मागितलं
आहे. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदार संघांमधून निवडणूक लढवता
येऊ नये, अशी दुरुस्ती कायद्यात केली पाहिजे, असं निवडणूक
आयोगानं गेल्या डिसेंबरमधे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यावर पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.
****
थेट
लाभ हस्तांतरण योजनेद्वारे सरकारला ८३ हजार कोटी रुपये वाचवता आले असल्याचं
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. ते
काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. ही रक्कम वाचवण्यासाठी आधार जोडणीचाही
उपयोग झाला असल्याचं ते म्हणाले. सरकारनं आतापर्यंत ४३७ योजना
थेट लाभ हस्तांतरण योजनेशी जोडल्या असून, दोन कोटी
७० लाख बनावट शिधापत्रिका उघडकीला आणल्या आहेत.
****
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव - जालना
रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी रेल्वे लोकआंदोलन समितीनं कालपासून बुलडाणा इथं सत्याग्रह
आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था, असोसिएशन,
युनियन, मंडळं यांचा पाठिंबा मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. प्रशासनानं
मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीनं दिला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment