Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 07 April 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०७ एप्रिल २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
v संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप
v घटनेनं दिलेलं आरक्षण भाजप रद्द करणार नाही, पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष खासदार अमित शहा यांची ग्वाही
v राज्यातल्या
जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची मोफत सुविधा उपलब्ध होणार
v मुंबईसह राज्यात पाच महानगर पालिका क्षेत्रांमध्ये प्रदूषण
नियंत्रण यंत्रणा बसवण्याचा निर्णय
आणि
v मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस
*****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा
काल समारोप झाला. लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
या टप्प्यात झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला. या काळात कामाचे १२७ तास वाया गेल्याचं
त्या म्हणाल्या. सदस्यांनी आपल्या क्षेत्राच्या कामाइतकंच देशहितालाही प्राधान्य द्यावं,
असं त्यांनी नमूद केलं.
राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं
कामकाज सुरळीत न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विरोधकांच्या गदारोळामुळे या सत्रात
सदनाचे १२० तास वाया गेल्याचं सांगत, सदस्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज सभापतींनी
व्यक्त केली.
अधिवेशनाच्या या दुसऱ्या सत्रात लोकसभेत केवळ २५
टक्के, तर राज्यसभेत ३५ टक्केच काम होऊ शकलं. दोन्ही सदनात काही महत्त्वाची विधेयकंही
प्रलंबित आहेत.
दरम्यान, संसदेचं कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारनं
काहीही प्रयत्न केले नसल्याची टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे
यांनी केली आहे.
****
घटनेनं दिलेलं आरक्षण भारतीय जनता पक्ष कधीही रद्द
करणार नाही, तसा प्रयत्न कुणी केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. भाजपच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त काल
मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. केंद्र आणि राज्य
सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याचं सांगून शहा यांनी, सरकारच्या कामाच्या आधारावरच
२०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री
प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब
दानवे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शहा यांनी,
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होणार नाहीत, असं एका प्रश्नाच्या उत्तरात
सांगितलं. शिवसेना आणि भाजपची युती कायम राहावी, ही भाजपची इच्छा असल्याचं, त्यांनी
नमूद केलं.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी
ते वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी
सांगितलं.
केंद्र सरकारनं केलेल्या विविध
कामांची माहिती गावागावात पोहोचवण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, येत्या
१४ एप्रिलपासून सबका साथ सबका विकास ही मोहीम राबवणार असल्याची माहिती, शहा यांनी दिली.
****
अर्थव्यवस्थेसह, रोजगार, कृषी, परराष्ट्र
धोरण, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या भाजपचा,
स्थापना दिवस सोहळा म्हणजे, अयशस्वी झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासारखा
प्रकार असल्याचं, कॉंग्रेस पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून ही टीका
करण्यात आली आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं
जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं आयोजित
कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी, भाजपानं फसवणूक केल्यामुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याची टीका केली.
*****
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य
माणूस भीतीच्या छायेखाली वावरत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
यांनी केली आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यात महूद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
हल्लाबोल आंदोलनात बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतले
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या वेळी उपस्थित होते. सत्तेतून बाहेर पडण्याच्या मुद्यावरून
मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली.
****
कर्करुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेली
केमोथेरपीची सुविधा राज्यातल्या
जिल्हा रुग्णालयांमध्ये
मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होईल. या पहिल्या टप्प्यात नागपूर, गडचिरोली,
वर्धा, भंडारा, अकोला, अमरावती, जळगाव, नाशिक, पुणे, आणि सातारा या दहा जिल्ह्यांतल्या
रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल, त्यानुसार पुढच्या महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातले
डॉक्टर आणि परिचारिकांना मुंबईतल्या टाटा रुग्णालयात
या उपचारांसाठीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
मुंबईसह राज्यात पाच महानगर पालिका क्षेत्रांमध्ये
प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवली जाणार आहे.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या पाच महानगरपालिकांमध्ये
पुणे, नाशिक, नागपूर, चंद्रपूर आणि औरंगाबादचा समावेश आहे. या यंत्रणेद्वारे हवेतली
धूळ, विषारी वायू शोषून घेतला जातो, आणि शुद्ध हवा बाहेर टाकली जाते. देशभरात सध्या
दिल्ली, बंगळुरू, गोवा आणि ठाणे इथं ही यंत्रणा प्रायोगिक स्वरुपात कार्यरत असून, पुढच्या
वर्षापर्यंत देशभरातल्या शंभर शहरांमध्ये ही यंत्रणा बसवण्याचं उद्दिष्ट असल्याचं,
यावेळी सांगण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी
निर्माते प्रसाद कांबळी यांची निवड झाली आहे. काल या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.
परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी अभिनेते शरद पोंक्षे यांची उपाध्यक्ष प्रशासनपदी गिरीश
ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीवर निवडून आलेल्या ११ सदस्यांमध्ये
मधुरा वेलणकर, भरत जाधव, अविनाश नारकर, राजन भिसे, मंगेश कदम, आदी रंगकर्मींचा समावेश
आहे.
****
ऑस्ट्रेलियात
गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत
५३ किलो वजनी गटात भारताच्या खुमूक चाम संजिता चानुनं सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुषांच्या गटात दीपक लाथरनं एकोणसत्तर वजनी गटात
कांस्यपदक पटकावलं.
महिला हॉकी च्या ‘अ’ गटात
काल भारतानं मलेशियाचा चार एक नं पराभव
केला, तर बँडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या ‘अ’ गटात भारत आणि स्कॉटलँड यांच्यात लढत
होणार आहे. जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर
बटरफ्लाय प्रकारात वीरधवल खाडे उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण, एक
रौप्य पदक, आणि एक कांस्यपदक मिळालं आहे.
****
नागपूर इथं काल झालेल्या महिलांच्या एक
दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर एक गडी राखून विजय मिळवला.
इंग्लंड संघानं प्रथम फलंदाजी करून दिलेलं २०८ धावांच आव्हान भारतीय संघानं पन्नासाव्या
षटकांत पूर्ण केलं. मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली असून, मालिकेतला पुढचा
सामना ९ एप्रिलला नागपूर इथंच होणार आहे.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस
झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यासह किल्लारी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा
पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, संताळा इथं वीज पडून एक
बैल ठार झाला.
या गारपीटीमुळे बहरात असलेल्या आंब्याचं नुकसान झालं,
तर बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आणलेला हरबरा, तूर, चिंच आदी शेतमाल भिजल्यानं, शेतकऱ्यासोबतच
आडत व्यापाऱ्यांचंही नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात सलगरा
दिवटी, उमरगा तालुक्यातल्या नारंगवाडी, माडज, तसंच लोहारा भागात गारपीटीसह पाऊस पडला.
नांदेड जिल्ह्यात देगलूर, मुक्रामाबाद परिसरातही
काल पाऊस झाला, नाशिकसह इतर जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वत्त आहे.
दरम्यान, राज्यात काल सर्वात जास्त ४३ अंश सेल्सिअस
तापमान विदर्भात चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी ४२ अंश, नांदेड इथं ४० पूर्णांक
पाच, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन
दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिकेसाठी
काल सरासरी ६५ टक्क्यांवर मतदान झालं. नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ५४
उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे.
****
जालना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील
५० जागांसाठी काल पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी
पात्र ठरलेल्या एक हजार तीनशे बारा उमेदवारांपैकी, एक हजार दोनशे सत्तावन्न उमेदवार
हजर राहिले, कुठलाही अनुचित प्रकार न घडता, ही परीक्षा शांततेत पार पडल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी रस्त्यावर पांगरी इथं ॲपे रिक्षा
आणि खासगी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला, तर
एक जण गंभीर जखमी झाला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला.
****
उस्मानाबाद जिल्ह्याला नीती आयोगाच्या माध्यमातून
मागास जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी प्रत्यक्ष
काम करावं अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी संबंधितांना दिल्या. जिल्ह्याच्या
विकास आराखड्याच्या आढावा बैठकीत ते उस्मानाबाद इथं बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment