Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 2 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी
कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर केंद्र सरकारनं
आज दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयानं स्वीकारली आहे. न्यायालयानं दिलेल्या
निर्णयाशी सरकार सहमत नसल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात अन्य एका संघटनेनं याचिका दाखल करत जलद
सुनावणी घेण्याची मागणी केली होती, न्यायालयानं याचिका दाखल करुन घेत, जलद सुनावणीस
नकार दिला आहे.
दरम्यान, सरकार दलितांच्या प्रगतीसाठी कटीबद्ध असल्याचं
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी
बोलत होते. ॲट्रॉसिटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं काँग्रेस पक्ष
राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात
अनेक दलित संघटनांच्या वतीनं आज भारत बंद पुकारण्यात आला होता. राज्यात या बंदला संमिश्र
प्रतिसाद मिळाला. धुळे शहरातील साक्री रोडवर रास्तारोको करण्यात आला. तसंच जिल्ह्यातल्या
शिरपूर, निजामपूर इथं बंद पाळण्यात आला. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनंही
करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अनाथ बालकांना शिक्षण आणि नोकरीसाठी एक टक्का आरक्षण लागू
करणारा अध्यादेश राज्यशासनानं आज जारी केला. महिला बाल विकास विभागाचं, अनाथ प्रमाणपत्र
असलेल्या बालकांना आजपासून खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू असेल, असं
या अध्यादेशात म्हटलं आहे. नोकरभरतीत अ ते ड पर्यंतच्या सर्व पदांसाठी, तसंच शिक्षणांतर्गत
शिष्यवृत्ती, वसतीगृह प्रवेश, आणि व्यावसायिक शिक्षणांतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती
योजनेसाठी हे आरक्षण लागू असेल.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईत चैत्यभूमी इथं भेट देतात.
यंदाही अनुयायांच्या सुविधेसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या सर्व
सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांच्या आढावा बैठकीत
ते आज बोलत होते. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला लागणाऱ्या सोयी सुविधाबाबत सर्व संबंधित विभागांनी उचित कार्यवाही करावी, चैत्यभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, तसंच चैत्यभूमी स्मारक संरक्षण भिंतीलगत काँक्रीट टेट्रापॅाड टाकण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिले.
****
राज्यातलं
भाजपचं निष्क्रीय सरकार जाऊन, बळीचं राज्य येवो असं साकडं आपण अंबाबाईला घातलं आहे, असं माजी उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं
राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भापासून सुरु
झालेल्या या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याला आज कोल्हापूरातून सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. विधीमंडळाच्या
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर चर्चा न
होता, बाकीचे मुद्दे मांडले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीरींसाठीची एका एकरची अट शिथील करून
अर्ध्या एकर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री
दिलीप कांबळे यांनी दिली आहे. आज कोल्हापूर इथं समाजकल्याण विभागाची आढावा बैठक
झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयांकडे
प्रलंबीत असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश दिले.
****
तिहेरी तलाक विरोधी विधेयक रद्द
करण्याच्या मागणीसाठी आज हिंगोली शहरात मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महिलांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं,
नगरसोल रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी विश्रामकक्षांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शिर्डी तसंच शनि शिंगणापूर इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माफक दरात ही सुविधा
उपलब्ध होणार असल्याचं, रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
नव्यानं सुरू होणाऱ्या जबलपूर सिकंदराबाद
रेल्वेगाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद पाहता, या गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात
आल्या आहेत. त्यानुसार आज तसंच येत्या नऊ तारखेला ही गाडी जबलपूर हून सुटणार नाही.
परिणामी उद्या तसंच येत्या १० तारखेला सिकंदराबादहून सुटणारी गाडीही रद्द करण्यात आली
आहे.
//**********//
No comments:
Post a Comment