Friday, 6 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 06.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 6 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतीय जनता पक्ष, आरक्षण कधीही रद्द करणार नाही, तसा प्रयत्न कुणी केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. भाजपच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याचं सांगून शहा यांनी, सरकारच्या कामाच्या आधारावरच २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शहा यांनी, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी ते वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारचे कर एकत्रित झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, असं शहा यांनी नमूद केलं.

****

विरोधी पक्षांकडून संसदेच्या कामकाजात सातत्यानं आणल्या जात असलेल्या व्यत्ययाकडे जनतेचं लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ तारखेला भाजपाचे सर्व खासदार आपापल्या क्षेत्रात एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आज नवी दिल्लीत भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
विरोधी पक्ष विभाजनवादी राजकारण करत असून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज नवी दिल्लीत भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी, ही टीका केल्याचं, अनंत कुमार यांनी सांगितलं.

****

वायएसआर काँग्रेसच्या पाच खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीमाना दिला आहे. आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य न झाल्यामुळे या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला.

****

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य माणूस भीतीच्या छायेखाली वावरत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यात महूद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात बोलत होते. शेती समस्या, धनगर आरक्षण आदी मुद्यांवरूनही पवार यांनी सरकारवर टीका केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या वेळी उपस्थित होते. सत्तेतून बाहेर पडण्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली.

****

मुंबईत वांद्रे इथं झोपडपट्टी पुनर्विकास योजना घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं ३३ सदनिका जप्त केल्या आहेत. वाढीव एफएसआय मिळवण्यासाठी संबंधित विकासकानं खोटी कागदपत्रं सादर केल्याचं निष्पन्न झाल्यानं, चारशे बासष्ट कोटी रुपयांच्या या सदनिका जप्त केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणातली ही पहिलीच कारवाई असून, अद्याप चौकशी सुरू असल्याचं, ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

धुळे इथले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेतर्फे धुळे शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. पांझरा नदीकाठच्या रस्ते कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणं हटवण्याच्या वादातून गोटे आणि माळी यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यावरून गोटे यांनी माळींविरोधात जीवघेणा हल्ला केल्याचा दावा करून १०० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

****

राज्यातल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. पुढील महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर आणि परिचारिकांना मुंबईतल्या टाटा रुग्णालयात याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस कर्करोगाचा वाढता प्रसार पाहता त्याच्या उपचारासाठी आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

****

कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातल्या बांदवडे इथं कुस्ती खेळताना अत्यवस्थ झालेला कुस्तीवीर निलेश कंदूरकरचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. कराडच्या रुग्णालयात दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. निलेशच्या मृत्यूमुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिकेसाठी आज दुपारी २ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झालं. नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे.

****

राज्यात आज सर्वात जास्त ४३ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी ४२, नांदेड इथं ४० पूर्णांक पाच, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...