Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 5 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
जास्तीत
जास्त महिलांना रोजगार मिळाला तर कुटुंबाच्या उत्पन्नात तसंच सकल देशांतर्गत उत्पन्नात
वाढ होईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज फिक्की
महिला संघटनेच्या ३४ व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. सरकारनं महिलांमध्ये उद्योजकतेला
प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.
****
भारतीय
रिझर्व्ह बँकेनं २०१८-१९ या आर्थिक वर्षाचं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं असून,
यात प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नाही. किरकोळ स्थायी सुविधा दर आणि रेपो दर
सहा पूर्णांक २५ टक्के इतका कायम ठेवला आहे. याच संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक धोरण विषयक समितीच्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. या समितीची पुढची बैठक येत्या पाच आणि सहा जून रोजी होणार आहे.
****
काळवीट
शिकार प्रकरणी जोधपूरच्या न्यायालयानं अभिनेता सलमान खान याला पाच वर्षे तुरुंगवास
आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, त्याला जोधपूरच्या तुरुंगात पाठवण्यात
आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री
तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. १९९८ साली
दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरवण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या
आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरवण्याबाबत फिलिप्स कंपनीनं तयारी
दर्शवली असून, या प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन
यांनी आज मुंबई इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद
इथं अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्रीय अल्पसंख्याक कार्य
मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनाकडे
पाठवणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुंबई इथं अल्पसंख्याक
विकास विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
पायाभूत
सोयी सुविधांच्या उभारणीत महाराष्ट्र देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. केंद्र
सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागानं ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या देशभरातल्या पायाभूत सोयी
सुविधा प्रकल्पांची माहिती जाहीर केली, त्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं म्हटलं
आहे. गेल्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधा क्षेत्रातल्या एक लाख
४३ हजार ७३६ कोटी रुपयांच्या २८४ प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचं आर्थिक व्यवहार
विभागानं म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातले हुतात्मा जवान शुभम मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर आज पालम तालुक्यात कोनेरवाडी
या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या
वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर, परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यावेळी उपस्थित होते. परवा
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुस्तापुरे यांना
वीरमरण आलं.
****
कोणत्याही
राज्याला एखाद्या धर्माला मान्यता देण्याचा अधिकार नसून, कर्नाटक राज्यानं लिंगायत
धर्माची शिफारस केंद्र सरकारला केली असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत
बोलत होते. येत्या आठ एप्रिलला औरंगाबाद इथं होणाऱ्या लिंगायत धर्माच्या मोर्चाला शिवा
संघटनेचा विरोध असून, वीरशैव आणि लिंगायत अशी समाजात फूट पाडण्याचा राजकीय हेतू असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा
करण्यात येत आहे. भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातल्या ३५ गावांसह दोन वाड्यांमध्ये
४४ टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून, ९७ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.
****
जालना
जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या तळेगाव इथल्या सरस्वती विद्यालयात आठवीच्या वर्गात
शिकणाऱ्या ४८ विद्यार्थिनींना आज मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलींचं वाटप करण्यात
आलं. सायकलींमुळे विद्यार्थींनींची पायपीट थांबेल, असं सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष
कैलास गव्हाड यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात
आज सर्वात जास्त ४३ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी
आणि नांदेड इथं सरासरी ४१, उस्मानाबाद ४०, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment