Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 6 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप झाला.लोकसभेत
कामकाज सुरु होताच अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या टप्प्यात झालेल्या कामकाजाचा आढावा
घेतला. अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात कामाचे १२७ तास वाया गेल्याचं त्या म्हणाल्या.
सदस्यांनी आपल्या क्षेत्राच्या कामाइतकंच देशहितालाही प्राधान्य द्यावं, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रहीताचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी हे सदन असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सदनाचं
कामकाज वारंवार बाधित झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज सुरळीत न झाल्याबद्दल
नाराजी व्यक्त केली. विरोधकांच्या गदारोळामुळे या सत्रात सदनाचे १२० तास वाया गेल्याचं
सांगत, सदस्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज सभापतींनी व्यक्त केली. अधिवेशनाच्या या
सत्रात लोकसभेत केवळ २५ टक्के, तर राज्यसभेत ३५ टक्केच काम होऊ शकलं. दोन्ही सदनात
काही महत्वाची विधेयकही प्रलंबित आहेत.
****
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालय, अभिनेता सलमान खान याच्या जामीन अर्जावर
उद्या निर्णय सुनावणार आहे. आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयानं याप्रकरणी
सलमानला दोषी ठरवत पाच वर्षे तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा काल सुनावली,
त्यानंतर सलमानच्या वकिलांनी कालच जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.
****
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ - सीबीएसईनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या, जुलै
२०१८ मधे होणाऱ्या
राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेट
साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत येत्या १२ तारखेपर्यंत वाढवली आहे. ही
मुदत काल संपणार होती. परीक्षा
शुल्क भरण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत
मुदत देण्यात
आली आहे.
****
देशात
ब्रॉडबँडचा प्रसार वाढवण्यासाठी, तसंच इंटरनेट वापरासाठीचा
खर्च ९० टक्क्यापर्यंत कमी करण्याच्या उद्देशानं भारतीय दूरसंचार
नियामक प्राधिकरण – ट्रायनं ‘पब्लिक
वायफाय ग्रीड’ची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. ट्रायचे
अध्यक्ष आर.एस.शर्मा यांनी काल दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा
यांच्याकडे या पथदर्शी प्रकल्पाचा अहवाल सादर केला. या
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली असल्याचं शर्मा
यांनी सांगितलं.
****
मुंबईत आज सकाळी एका तीन मजली इमारतीला आग लागली. दक्षिण
मुंबईतल्या निवासी तसंच व्यापारी गाळे असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या तसंच तिसऱ्या
मजल्यावर आग लागल्याची माहिती रात्री दीड वाजेच्या सुमारास मिळाली. त्या नंतर इमारतीत
गॅस सिलिंडरचे तीन स्फोट झाल्यानं, इमारतीचा काही भाग कोसळल्याचं पीटीआयच्या बातमीत
म्हटलं आहे. अग्निशामक दलाचे चौदा बंब आणि दहा टँकरच्या सहाय्यानं ही आग विझवण्याचे
प्रयत्न सुरू आहेत. इमारतीतून आठ जणांना सुखरुप वाचवण्यात आलं असून, सुदैवानं जीवित
हानी झालेली नाही.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं २०१८-१९ या
मूल्यांकन वर्षासाठी आयकर विवरणपत्र – आयटीआर भरण्यासाठी अर्जाचा नवीन
नमुना जारी केला आहेत. या नवीन
अर्जामधे नोकरदार वर्गानं आपल्या
वेतनाची विभागणी दाखवायची आहे तर व्यापारी वर्गाला वस्तू आणि सेवा कर जीएसटी क्रमांक आणि वार्षिक उलाढाल दाखवावी लागेल. मात्र
आयकर विवरणपत्र दाखल करण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. काही करदाते वगळता सर्व सात आयकर
विवरणपत्रं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भरायची आहेत. नवीन
आयकर विवरणपत्रं आयकर विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम
टॅक्स इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २०१७-१८ या वर्षासाठी विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै
आहे.
****
जालना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील ५० जागांसाठी
आज पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या
एक हजार तीनशे बारा उमेदवारांपैकी, एक हजार दोनशे सत्तावन्न उमेदवार हजर राहिले, कुठलाही
अनुचित प्रकार न घडता, ही परीक्षा शांततेत पार पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या
राष्ट्रकुल स्पर्धेत महिला हॉकी च्या
‘अ’ गटात भारतानं मलेशियाचा चार एक नं पराभव केला.महिलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात
भारताच्या खुमूक चाम संजिता चानुनं सुवर्णपदक पटकावलं.
तर पुरुषांच्या गटात दीपक लाथरनं एकोणसत्तर वजनी गटात
कांस्यपदक पटकावलं.
जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर
बटरफ्लाय प्रकारात भारताचा विरधवल खाडे उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर
बँडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या ‘अ’ गटात
भारत आणि स्कॉटलँड यांच्यात
लढत होईल. या
गटात भारतानं आतापर्यंत श्रीलंका आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment