Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 06 April 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०६ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
·
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान
खानला पाच वर्ष कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा
·
सर्व वैद्यकिय महाविद्यालयांना २०२०- २१ या शैक्षणिक
वर्षापासून, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणं अनिवार्य
·
गहिनीनाथ
महाराज औसेकर यांची पंढरपूरच्या
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
समितीच्या सहअध्यक्षपदी तर
आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह अन्य सहा सदस्यांची सदस्य म्हणून नियुक्ती
आणि
·
परभणी जिल्ह्यातले शहिद जवान
शुभम मुस्तापुरे यांना भावपूर्ण वातावरणात अंतिम निरोप
****
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी
ठरवत पाच वर्ष
कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा जोधपूर न्यायालयानं काल सुनावली, याचप्रकरणी न्यायालयानं सैफ अली खान, तब्बू, निलम आणि सोनाली बेंद्रे
या अभिनेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.जोधपूरमधल्या कांकणी गावाजवळ १९९८ मधे दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरवलं आहे. स्थानिक दुष्यंत
सिंगची या प्रकरणातून सुटका झाली
आहे. या खटल्याची सुनावणी
२८ मार्चला पूर्ण झाली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी
याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. जोधपूर न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध सत्र न्यायालयात
जाणार असल्याचं सलमानच्या वकिलानं वार्ताहरांना सांगितलं.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असलो तरी या निकालानं धक्का बसला, कारण आधीच्या
खटल्यात अशाच प्रकारच्या परिस्थितीत सलमानची निर्दोष मुक्तता झाली होती असं वकिलानं
सांगितलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०१८-१९ या आर्थिक वर्षाचं
पहिलं द्वैमासिक पतधोरण काल
जाहीर केलं असून, यात
प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नाही. किरकोळ स्थायी सुविधा दर आणि रेपो दर
सहा पूर्णांक २५ टक्के इतका कायम ठेवला आहे. याच
संदर्भात बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत
झालेल्या आर्थिक धोरण विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीची
पुढची बैठक येत्या पाच आणि सहा जून रोजी होणार आहे.
****
देशातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना २०२०- २१ या
शैक्षणिक वर्षापासून, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणं, अनिवार्य करण्यात आलं आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण कायदा २००० मधल्या सुधारणेनुसार, भारतीय वैद्यकीय परिषदेनं,
हा निर्णय घेतला आहे. नव्यानं सुरू होणाऱ्या खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानांही
हा नियम लागू राहणार असून मान्यता मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत त्यांना पदव्युत्तर
अभ्यासक्रम सुरू करणं अनिवार्य असणार आहे, असं केंद्रीय आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
काल सांगितलं.
****
औरंगाबाद
इथं अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्रीय अल्पसंख्याक
कार्य मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव
केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
मुंबई इथं अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत
होते.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी
मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची नियुक्ती करण्यात
आल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं. याशिवाय अन्य सहा
जणांची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबादचे
आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.
माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे
गुरुजी आणि शिवाजीराव मोरे यांचा समावेश आहे. या मंदिराचा कारभार चालवण्यासाठी
सरकारनं स्वतंत्र कायदा केला असून या कायद्यातल्या तरतुदीनुसार या नियुक्त्या
करण्यात आल्या आहेत.
****
शेतकऱ्यांकडची तूर आणि हरभरा खरेदी
करण्यासाठी जिल्हास्तरावर गोदामं ताब्यात
घेण्याचे निर्देश कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल दिले. या मालांच्या
खरेदी साठवणुकीसाठी गोदामं कमी पडत असल्याच्या
पार्श्वभूमीवर काल खोत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. खोत यांनी
यावेळी उपलब्ध साठवण क्षमतेचा जिल्हानिहाय आढावा घेतला. उद्दिष्टापेक्षा कमी खरेदी
झालेल्या केंद्रांवर खरेदीला गती देण्याचे निर्देशही
त्यांनी यावेळी दिले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शहिद शुभम मुस्तापुरे अमर रहे, भारत
माता की जय, वंदे मातरम च्या गगन भेदी घोषणा देत, उपस्थित
मित्र-नातेवाईकासह जनसमुदायाच्या साक्षीनं, शहिद
शुभम सुर्यकांत मुस्तापुरे यांच्यावर काल शासकीय इतमामात, परभणी
जिल्ह्यात मौजे कोन्हेरवाडी इथं, सकाळी दहा वाजता दफनविधीनं अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लष्कराच्या वतीनं, बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. या
वेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी
पी.शिवशंकर, यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जम्मु
काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात तीन एप्रिल रोजी शुभम मुस्तापुरे
शहीद झाले होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आनाळा
जिल्हा परिषद गटाच्या तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या तुर्काबाद, संवदगाव, नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी, मारतळा आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटी पंचायत समितीच्या गणासाठी आज पोटनिवडणुक होत आहे.
या सर्व ठिकाणी सकाळी साडेसात
ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. उद्या
मतमोजणी केली जाईल.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरताही आज
मतदान होत आहे. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी आणि उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या कळंब नगरपरिषदेच्या एका वॉर्डमध्ये पोटनिवडणुकीचं मतदान होत आहे.
****
मांजरा प्रकल्पातलं पाणी उन्हाळी हंगामात सिंचनासाठी सोडण्याचा
निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काल घेण्यात आला. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री
संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल लातूर इथं ही बैठक झाली. गेल्या
दोन वर्षांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्यानं
हा निर्णय घेण्यात आला. लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ
होणार आहे.
****
आयकर चुकवल्याच्या संशयावरून काल उस्मानाबाद शहरातले पाच
प्रतिष्ठित डॉक्टर्स, दोन कंत्राटदार आणि एका ठोक औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांवर
आयकर विभागानं धाडी टाकल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत अनेक महत्वपूर्ण
पुरावे हाती लागल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असं विभागीय
आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी म्हटल आहे. परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातल्या
देवठाणा इथं शेती सेवा ग्रुपनं घेतलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते
काल बोलत होते. शेती व्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास
धरण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान,जम्मू काश्मीरमध्ये आपली सेवा बजावत असतांना शहीद
झालेले जिल्ह्यातले जवान शुभम मुस्तापुरे यांच्या
कुटुंबियांना दत्तक घेण्याचे आदेशही त्यांनी पालमच्या तहसीलदारांना दिले.
****
जालना जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये
जिल्हा प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन, जाफराबाद
आणि परतूर तालुक्यातल्या ३५ गावांसह दोन वाड्यांमध्ये ४४ टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून, ९७ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं
आहे.
****
बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या तागडगाव इथल्या
नारळी सप्ताहाचा काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत समारोप झाला.
यावेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री, जिल्हा परीषद अध्यक्ष सविता गोल्हार यांच्यासह
मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुंडे यांनी सध्या जाती- धर्माच्या नावांवर
फूट पाडण्याचे प्रयत्न होत असतांना समाज एकसंघ राहणं आवश्यक असल्याचं सांगितलं.
****
आकाशवाणीच्या पश्चिम क्षेत्र विभागाची कार्यक्रम समन्वय
समितीची दोन दिवसाची बैठक कालपासून नांदेड इथं सुरू झाली. अतिरिक्त महानिदेशक निरज
अग्रवाल यांनी मुंबईहून दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करून या बैठकीचं उदघाटन केलं. नैमित्तिक
उद्घोषकांचा दर्जा वाढविणं, कार्यक्रमात बदल करून आकाशवाणी लोकाभिमुख करणं, कार्यक्रमाच्या
माध्यमातून जाहिराती वाढविणं आणि उत्कृष्ट काम केलेल्या केंद्रांचा सत्कार करणे आदी
मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या तळेगाव इथल्या सरस्वती
विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ४८ विद्यार्थिनींना काल मानव
विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलींचं वाटप करण्यात आलं. सायकलींमुळे
विद्यार्थींनींची पायपीट थांबेल, असं सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष कैलास गव्हाड यांनी यावेळी
सांगितलं.
****
हिंगोली शहरात एका ऑटोरिक्षातून एक
लाख ८० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. ऑटो रिक्षा चालकास अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी
सांगितलं.
//*********//
No comments:
Post a Comment