Wednesday, 13 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपत आहे. ३१ जानेवारीला हे अधिवेशन सुरू झालं होतं. या अधिवेशनात राज्यसभेत केवळ दोन विधेयकं मंजूर झाली, तर सुमारे एकशे ऐंशी विधेयकं प्रलंबित आहेत. लोकसभेतही अनेक विधेयकं प्रलंबित राहिली आहेत. आजच्या शेवटच्या दिवशी महत्त्वाची विधेयकं पारित व्हावीत, असा सरकारचा प्रयत्न राहील.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये क्रेडाई-यूथकॉन -१९ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. कंन्फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया-क्रेडाई, नं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

****



 काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सक्त वसुली संचालनालयाच्या जयपूर विभागीय कार्यालयात आज सलग दुसऱ्या दिवशी हजर झाले आहेत. राजस्तानातल्या बिकानेर जिल्ह्यात जमीन खरेदीत कथितरीत्या गैरव्यवहार केल्याप्रकरणी वाड्रा यांची चौकशी सुरू आहे.

****



 जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आज सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबा ता संघटनेच्या दोन अतिरेक्यांना ठार केलं. गोपालपुरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं तिथं कालपासून शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्यावर सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात हे अतिरेकी मारले गेले. चकमकीच्या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठाही ताब्यात घेण्यात आला आहे.

****



आज जागतिक नभोवाणी दिन आहे. आजच्या काळातही नभोवाणी या माध्यमाला असलेलं महत्त्व लक्षात घेत, २०१२ या वर्षी युनेस्कोनं आजचा दिवस नभोवाणी दिन म्हणून घोषित केला होता.”संवाद, सहिष्णुता आणि शांतता”, हे यावर्षी या दिनाचं घोषवाक्य आहे.

****



 भारतीय रिझर्व्ह बँकेनं एचडीएफसी, आयडीबीआय आणि कोटक महिंद्र बँकांना प्रत्येकी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. काळा पैसा वैध करणं, ग्राहकाची ओळख यासंदर्भातल्या मानकांचं पालन न करण्याबद्दल हा दंड केल्याचं रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अलाहाबाद बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आंध्र बँक या बँकांनाही विविध नियम आणि मानकांचं पालन न केल्यामुळे दंड केला असून, याचा ग्राहकांच्या व्यवहाराच्या वैधतेशी संबंध नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...