Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2019
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** मुंबईत मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तेरा जणांचा तर पुण्यात
सहा जणांचा मृत्यू
** विधीमंडळाच्या पावसाळी
अधिवेशनाचा आज समारोप; मराठा समाजाला शिक्षणात बारा आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण देणारं
विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर
** मराठी शाळांमधल्या घटणाऱ्या पटसंख्येची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन
समिती नेमण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा
**
आणि
** राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ
****
मुंबईतल्या मालाड इथल्या उपनगरात काल झालेल्या जोरदार पावसामुळं भिंत
कोसळून १३ जणांचा जागीच मृत्यु झाला तसंच ७६
जण जखमी झाले. आज पहाटे दोन वाजता ही दुर्घटना घडली. पुण्यातही सिंहगड शिक्षण संस्थेची
संरक्षक भिंत कोसळून सहा मजूरांचा जागीच मृत्यु झाला आणि तीन जण जखमी झाले. काल रात्री
साडे अकरा वाजता ही दुर्घटना घडली. इमारती शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवीन बांधकाम
सुरू आहे. भिंतीच्याकडेला या बांधकामावरील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते.
मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमधे
सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत काल पहाटेपासून शीव, हिंदमाता,
सांताक्रूझसह इतर सखल भागात पाणी साठलं. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळं
रस्ते वाहतूक आणि उपनगरी रेल्वे सेवा विस्कळित झाली. लोणावळा- कर्जत दरम्यान एक मालगाडी रुळावरुन घसरल्यानं मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या
काही गाड्या रद्द कराव्या लागल्या. मालगाडीच्या या अपघातामुळे आज मुंबई-नांदेड-मुंबई
तपोवन या दोन्ही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे मुंबई ते नागपूर
नंदीग्राम एक्स्प्रेस ही नाशिक इथून निघेल असं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण,
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आगामी चार पाच दिवस राज्यात सर्वत्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेनं
दिला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर
आजमुंबई परिसरातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना महापालिकेनं सुटी जाहीर केली आहे.
****
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा
आज समारोप होत आहे.
दरम्यान, काल मुंबई उच्च न्यायालयाच्या
निर्देशांनुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला सरसकट सोळा
टक्के ऐवजी, शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण लागू करण्यासाठीचं सुधारणा
विधेयक काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं. यापूर्वी देण्यात आलेलं १६ टक्के
आरक्षण न्यायालयानं रद्द केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडलं. दोन्ही
सदनांनी हे विधेयक एकमतानं संमत केलं.
दरम्यान, विधान सभेनं काल विविध विभागांच्या
पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर केल्या.
****
विधानसभेत काल शून्य प्रहरात अनेक
सदस्यांनी लोकहिताचे विविध मुद्दे उपस्थित केले. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज
यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी सदस्य सुभाष
साबणे यांनी केली. अनेक सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला. लातूरचे पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी या मागणीचं स्वागत केलं.
काँग्रेसचे आरेफ नसीम खान तसंच यशोमती
ठाकूर यांनी, राज्यात मॉब लिंचिंगविरोधात कडक कायदा करण्याची गरज व्यक्त केली.
काँग्रेसचे लातूरचे आमदार अमित देशमुख
यांनी, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रादेशिक आरक्षणाची अट काढून टाकावी, अशी मागणी केली.
परभणी तालुक्यात बोबडे टाकळी इथं
पीक विम्याच्या बनावट पावत्यांसंदर्भात सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना महिनाभरात न्याय
देण्याची ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. डॉ. राहुल पाटील यांनी याबाबत
लक्षवेधी सूचना मांडली होती.
महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र औद्योगिक
वसाहत असावी, असा प्रस्ताव सदस्य प्रशांत बंब यांनी मांडला. महिला आणि बालविकास मंत्री
पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावाची दखल घेत असल्याचं सांगितलं. पुरवणी मागण्यांवरच्या
चर्चेदरम्यान त्या बोलत होत्या.
भूजलपातळीत वाढ करण्यासाठी हायड्रो
फ्रॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्यात येईल, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. अतिशोषित पाणलोट क्षेत्रांमध्ये
दोनशे फुटांहून अधिक खोलीची कुपनलिका घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचं त्यांनी
स्पष्ट केलं.
****
प्लास्टिक बंदीबाबत कोणत्याही प्रकारची
सवलत दिली जाणार नसून तातडीनं धडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं पर्यावरण मंत्री
रामदास कदम यांनी काल विधानसभेत सांगितलं. राज्यात प्लास्टिक बंदी कायद्याच्या
अनुषंगानं सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत
होते.
****
राज्यातल्या मराठी शाळांमधली पटसंख्या
कमी होत असल्याबाबत सत्यशोधन समिती नेमणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानपरिषदेत
केली. कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवाल
करत भाजपाचे अनिल सोले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर शेलार
उत्तर देत होते. सत्यशोधन समितीचा अहवाल आल्यानंतर यासंदर्भात
निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त
होण्यासाठीचा प्रस्ताव भक्कम पुराव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रस्तावाला
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी
विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील
यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन
चर्चेला ते काल उत्तर देत होते. मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत अधिवेशन संपल्यानंतर
तज्ञांची समिती नेमली जाईल, त्यानंतर हरकती आणि सूचना मागवून मराठी सक्तीचा कायदा करण्याबाबत
अध्यादेश काढला जाईल, असं ते म्हणाले.
****
परभणी इथल्या जातपडताळणी समितीच्या वंदना कोचरे आणि इतर तीन अधिकारी
यांच्याबाबतीतही भ्रष्टाचाराची तक्रार असल्याने त्यांचेही निलंबन करण्याची मागणी सदस्य
बाबाजानी दुर्रानी यांनी केली, त्यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल प्रश्नोत्तराच्या
तासाला दिले.
याशिवाय जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत
करण्यात यावी असे निर्देश सभापती निंबाळकर
यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
वातावरण बदलाच्या संकटाचं भीषण वास्तव
आपल्या समोर असून, ते निवारण्याच्या कार्यात प्रत्येकानं आपली भूमिका जबाबदारीने पार
पाडावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात ३३ कोटी वृक्ष
लागवड मोहिमेला काल चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं आनंदवनातून प्रारंभ झाला, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत्या महिनाभरात राज्यात किमान पस्तीस
कोटी वृक्षारोपण होईल, असा विश्वास, मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या मोहिमेअंतर्गत
काल मराठवाड्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.
औरंगाबाद इथं वाल्मी परिसरात जिल्हा
परिषदेच्या अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि महापौर नंदकुमार घोडेले यांनी, लातूर इथं
महापौर सुरेश पवार आणि मनपा आयुक्त एम. डी. सिंह यांनी तर जालना इथं, जिल्हा परिषद
इमारतीच्या आवारात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
यांनी वृक्षारोपण केलं.
हिंगोली इथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
शिवराणीताई नरवाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ
करण्यात आला. परभणीतही जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत परिसरात वृक्षारोपण करण्यात
आलं.
बीड इथं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार
पाण्डेय यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संगोपनावर भर देण्याचं आवाहन केलं.
****
बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या
घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला दक्षता समित्या
स्थापन करण्याची सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती
डॉ. निलम गोऱ्हे यांनी काल केली आहे. गर्भाशय
काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली
गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक विधानभवनात घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी
ही सूचना केली
****
औरंगाबाद इथल्या चिकलठाणा औद्योगिक
वसाहतीतल्या माहिती तंत्रज्ञान - आयटी पार्कमधल्या लघु उद्योजकांचे प्रश्न लवकरच मार्गी
लावले जातील, असं आश्वासन उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिलं आहे. आमदार सतीश
चव्हाण यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळानं विधान भवनात सावे यांच्यासोबत बैठक
घेतली, त्यावेळी सावे बोलत होते. या बैठकीत गाळे भाडे दरासह, उद्योजकांच्या अनेक अडचणींकडे,
उद्योग राज्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं.
****
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
सभापतीपदी अर्जुन गाढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदासाठी त्यांचा एकमेव
अर्ज आला होता.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी
असलेलं ७०-३० प्रादेशिक आरक्षण रद्द करावं, या मागणीसाठी काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई
इथं सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्यातल्या सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांवर
अन्याय होत असल्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याच्या मागणीचं पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांना
सादर करण्यात आलं.
****
नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस
तसंच धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांमध्ये द्वितीय
श्रेणीचा एक आरक्षित डब्बा वाढवण्यात आला आहे. तपोवन एक्सप्रेसमध्ये कालपासून हा वाढीव
डबा जोडण्यात आला, तर मराठवाडा एक्सप्रेसमध्ये आजपासून हा डबा जोडला जाणार आहे.
नांदेड- श्रीगंगानगर-नांदेड द्वी-साप्ताहिक
एक्सप्रेस गाडीला वातानुकुलीत तृतीय श्रेणीचे दोन डबे तात्पुरत्या स्वरुपात वाढवण्यात
आले आहेत. आजपासून येत्या एक ऑगस्टपर्यंत हा वाढीव डबा या गाडीला जोडलेला असेल, अशी
माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश संघात सामना होणार आहे.
या स्पर्धेत काल श्रीलंकेनं वेस्ट
इंडीजचा २३ धावांनी पराभव केला.
दरम्यान, अंगठ्याच्या दुखापतीमुळे
भारतीय फलंदाज विजय शंकर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवाल
याचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता पीटीआयच्या वृत्तात वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment