Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
v दुर्गम
भागासह देशभरात चांगल्या रस्त्यांसाठी पथकर अपरिहार्य - केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं
प्रतिपादन
v वैद्यकीय जैविक कचरा व्यवस्थापनाचा महिन्यातून दोनवेळा आढावा
घेण्याचे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे निर्देश
v दलित पँथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांचं काल मुंबईत निधन
v संगीत नाटक अकादमीचे २०१८चे अकादमी पुरस्कार जाहीर
आणि
v रुग्णालय स्तरावर निरीक्षण आणि नियंत्रण प्रणाली विकसित होण्याची
गरज विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडून व्यक्त
****
ग्रामीण तसंच दुर्गम भागातली गावं रस्त्यांनी जोडण्यासाठी,
तसंच चांगल्या रस्त्यांसाठी शहरी भागातल्या महामार्गांवर पथकर आकारणं, अपरिहार्य असल्याचं
प्रतिपादन, केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत परिवहन
विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते. द्रूतगती महामार्गांमुळे
दोन शहरातला प्रवासाचा वेळ कमी होतो, मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित असलेले असे प्रकल्प
राबवण्यासाठी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा - बीओटी तत्वावर काम करावं लागत असल्याचं,
गडकरी यांनी सांगितलं. गेल्या पाच वर्षांत आपल्या मंत्रालयानं चाळीस हजार किलोमीटर
लांबीचे रस्ते बांधले, त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण साठ टक्क्यांहून
अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
वैद्यकीय जैविक कचरा व्यवस्थापनाचा महिन्यातून दोनवेळा
आढावा घेण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं सर्व जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना
दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा पर्यावरण आराखडा राबवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन
करण्याचे निर्देश, प्राधिकरणानं दिले आहेत. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या
या समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक
अधिकारी, आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करावी, या समितीच्या मार्फत
जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी मासिक अहवाल, राज्यांचे मुख्य सचिवांकडे सादर करावा तसंच
जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करायचा आहे. येत्या एक ऑगस्टपासून यावर
अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले असून, या निर्देशांच्या अंमलबजावणीवर
मुख्य सचिवांनी देखरेख करण्याची सूचना प्राधिकरणानं केली आहे.
****
वीरमरण किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांना देण्यात
येणाऱ्या एक रकमी आर्थिक मदतीत भरीव वाढ करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली
आहे. या निर्णयानुसार हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना पूर्वी मिळणाऱ्या २५ लाख रुपयांऐवजी
आता एक कोटी रूपये मदत मिळेल. तर जखमी होऊन दिव्यांग झालेल्या सैनिकांना १५ लाखांऐवजी
६० लाख रूपये मदत मिळणार आहे.
औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी
भागातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मीच्या परिसरातली ३३ एकर जमीन देण्याचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
या विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी इथेच १७ एकर
जागा देण्यात आली असून, राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या निर्णयानंतर या विद्यापीठासाठी
आता ५० एकर जागा उपलब्ध झाली आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या
मानधनाच्या फरकाची रक्कम राज्याच्या निधीतून देण्याला मान्यता, सर्व शिक्षा अभियानांतर्गत
अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातल्या शिक्षकांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ, तसंच
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटी रुपयांचं अंतरिम कर्ज उभारण्यासाठी
शासन हमी देण्यालाही या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने काल याबाबतचं पत्र जारी केलं. केंद्र
सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
दिला होता. तर आशिष शेलार यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षपदाची
जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
****
दलित पँथरचे संस्थापक सदस्य आणि आंबेडकरी चळवळीचे
भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं काल सकाळी मुंबईत विक्रोळी इथल्या राहत्या
घरी निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. ढाले यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीतलं एक वादळी
व्यक्तिमत्व आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशातून
व्यक्त केली.
****
मुंबईच्या डोंगरी परिसरात एक इमारत कोसळून बारा जण ठार झाले असून,
सुमारे चाळीसहून अधिक लोक या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती पीटीआयनं वर्तवली आहे. काल
दुपारी पावणे बारा वाजता ही दुर्घटना घडली. या परिसरातल्या इतर इमारतींमधल्या रहिवाशांना
सुरक्षेचा उपाय म्हणून इतरत्र हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, दुर्घटनेची सर्वंकष
चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सांगितलं आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या
दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते.
****
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात
आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या
आरोपाखाली कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय
न्यायालयात आव्हान दिलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
संगीत नाटक अकादमीचे २०१८चे पुरस्कार जाहीर झाले
आहेत. प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकीर हुसैन, नृत्यांगना सोनल मानसिंग यांच्यासह चौघांना
अकादमी रत्न तर चाळीस जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये प्रसिद्ध गायक सुरेश
वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि अभिनेत्री सुहास जोशी यांचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार
एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि मानवस्त्र अशा स्वरुपाचा असून, अकादमी रत्न पुरस्कार तीन
लाख रुपये स्वरुपाचा आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली, स्मृतीचिन्ह आणि
२५ हजार रूपये स्वरुपाचा हा पुरस्कार बत्तीस कलाकारांना जाहीर झाला आहे.
****
रुग्णालय स्तरावर निरीक्षण आणि नियंत्रण प्रणाली
विकसित होणं आवश्यक असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी
म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्भाशय शस्त्रक्रियांच्या तक्रारींच्या
पार्श्वभूमीवर, त्यांनी काल गेवराई इथं चार सदस्यीय चौकशी समिती सह उपजिल्हा रुग्णालयाला
भेट दिली, त्यानंतर बोलत होत्या. ऊसतोडीवर जाणाऱ्या महिला कामगारांबाबत चांगल्या वैद्यकीय
सुविधांसाठी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण महिलांच्या आरोग्यात
सुधारणा होण्यासाठी महिलांबरोबरच पुरुषांमध्ये जागृती व्हायला हवी, असंही गोऱ्हे यांनी
नमूद केलं.
आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात डॉ गोऱ्हे आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही
घेणार आहेत. वंजारवाडी इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी
त्या आज संवाद साधणार आहेत. साखर कारखाना संचालक, मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय
संस्थाच्या प्रतिनिधींबरोबरही त्या चर्चा करणार आहेत.
****
राज्यात काल २६ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
करण्यात आल्या. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर इथल्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी
पी टी वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली
आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची औरंगाबाद इथं वीज महावितरण कंपनीचे
व्यवस्थापकीय सह संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा
पदभार डॉ प्रमोद येवले यांनी काल स्वीकारला. येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातल्या
ताराबाई स्त्री अध्यासन केंद्रात काल एक चर्चासत्रही घेण्यात आलं.
****
माध्यमिक शालांत आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
परीक्षा मंडळामार्फत दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होत आहे. दहावीची
परीक्षा ३० जुलैपर्यंत तर बारावीची पुरवणी परीक्षा तीन ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
****
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची विद्युत
देयकं काही प्रमाणात कमी करण्यासाठी, या योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु
करण्यात आली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव
लोणीकर यांनी ही माहिती दिली. ते काल
मंत्रालयात या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यामध्ये
मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या तीस तर राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल योजनेच्या १२ योजनांचा समावेश आहे.
****
पतंजली उद्योग समूहाला लातूर जिल्ह्यातल्या औसा इथली जमीन चार दिवसांत देण्यात आली या बातमीत काहीही तथ्य नसून, या उद्योग समुहाला अद्याप जमीन दिलेली नसल्याचं, राज्य सरकारनं स्पष्ट
केलं आहे. प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत या समूहाला दिलेली
नसल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.
****
जर्मनीच्या सुहल इथं
सुरू असलेल्या कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक
स्पर्धेत नेमबाज विजयवीर सिद्धू यानं काल राजकंवर सिंह सिंधू आणि आदर्श सिंह सोबत पुरूषांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत
सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं सात सुवर्ण, सात रजत आणि दोन कांस्य पदकं
अशी एकूण सोळा पदकं जिंकली असून,
पदतालिकेत
पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक क्रमवारीत
भारतीय क्रिकेट संघाची मात्र पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
दरम्यान फलंदाजी आणि गोलंदाजीच्या
क्रमवारीत अनुक्रमे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment