Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं आज नवी
दिल्ली इथं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या
आणि नुकतंच दिल्लीतल्या एस्कॉर्ट इस्पितळात त्यांना भरती करण्यात आलं होतं. तिथंच त्यांनी
शेवटचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांनी १९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे दिल्लीच्या
मुख्यमंत्री म्हणून पद भुषवलं होतं. त्या सर्व प्रथम १९८४ मध्ये उत्तर प्रदेशमधल्या
कन्नौजमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या त्या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या
अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती
एम. व्यंकय्या नायडु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून आनंदीबेन पटेल यांची
नेमणूक करण्यात आली आहे; यापूर्वी पटेल या मध्यप्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत
होत्या. तर बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी निवड करण्यात
आली आहे. बिहारच्या राज्यपालपदी फगू चौहान
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच जगदीप धनखर यांची पश्चिम बंगालच्या, रमेश बैस
यांची त्रिपुरा तर एन आर रवी यांची नागालँडचे नवे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली
असल्याचं राष्ट्रपती भवनानं याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन आय ए नं आज सकाळपासून
तामिळनाडूमधे चार जिल्ह्यांत चौदा ठिकाणी छापे मारले आहेत. ‘अन्सरुल्लाह’ या दहशतवादी
संघटनेशी संबंधित सोळा जणांना अटक करण्यात आल्यानंतर त्यासंबंधी हे छापे मारण्यात आले
आहे. चेन्नईच्या विशेष न्यायालयानं काल या आरोपींची आठ दिवस एन आय एच्या कोठडीत रवानगी
केली आहे.
****
राज्याच्या संचालनालय, लेखा आणि कोषागारे तसंच स्थानिक
निधी लेखा परीक्षा विभागातल्या ‘गट क’ संवर्गातल्या परीक्षेचा निकाल शासनाच्या
mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विभागनिहाय उपलब्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण
उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसंदर्भात २२ जुलै ते २९ जुलै या कालावधीत उपस्थितीबाबत
कळवण्यात येणार असल्याची माहिती लेखा आणि कोषागारे विभागाच्या संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
स्वाईन फ्लू आणि डेंग्यू सारखे आजार वाढत असले तरी त्यावर
उपचारासाठी राज्य शासन सज्ज आहे. नाशिक मध्ये सर्वाधिक साथीचे आजार वाढले असले तरी
त्या संदर्भातही उपाय योजना सुरू आहेत, दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर नाशिक
शहरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना राबवण्यात येईल, अशी माहिती आरोग्य
मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये दिली. नाशिक मध्ये आरोग्य विषयक आढावा बैठक
घेतल्यानंतर वार्ताहरांशी ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १८ पूर्णांक
१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५८ पूर्णांक ४८ मिलीमीटर
पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १६ पूर्णांक ७६ टक्के एवढा
पाऊस पडला आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वदूर होत असलेला भिजपाऊस
आज दुपारपर्यंत कायम होता. या पावसामुळे जिल्ह्यातल्या पिकांना अंशत: जीवदान मिळालं
असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. अद्याप पेरणी न करणारे शेतकरी
आता पेरणीसाठी सरसावत असून या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात
सुटणार आहे.
****
मराठवाडा
साहित्य परिषेदच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण प्रसिध्द समीक्षक
डॉ.वसंत पाटणकर यांच्या हस्ते उद्या औरंगाबाद इथल्या डॉ.ना.गो नांदापूरकर सभागृहात
संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. यामध्ये नरहर कुरूंदकर वाङमय पुरस्कार औरंगाबादचे
सुपडा वराडे यांना, ग.भि.चिटणीस वाङमय पुरस्कार डॉ.दत्ता घोलप, कुमार देशमुख नाट्य
पुरस्कार प्रेमानंद गज्वी, बी.रघुनाथ पुरस्कार किरण गुरव, कुसुमावती देशमुख काव्यपुरस्कार
नांदेडच्या सुचिता खल्लाळ यांना तर रा.ज.देशमुख स्मृती पुरस्कार अनिल कुलकर्णी यांना
देण्यात येणार आहे.
****
कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणारे दोन आयशर ट्रक
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर टोल नाका इथं काल पहाटे पकडण्यात आले. या वाहनातून कत्तलीसाठी
नेण्यात येणारी सुमारे १३ लाख रुपये किमतीची जनावरं पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी
शिरपूर पोलिस ठाण्यात आज दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment