Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 10 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
केंद्र
सरकारनं पायाभूत सुविधा प्रकल्पांतील गुंतवणूक वाढवण्यासाठी एका कृती दलाची स्थापना
केली असून केंद्राकडून यात निधी पुरवण्याकरता क्षेत्रं निश्चित करण्यात आली असल्याची
माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं कार्यकाळाचे
शंभर दिवस पूर्ण केल्याबद्दल आज आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सरकार सर्वाधिक
गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये करणार असून त्याकरता शंभर लाख कोटी रुपये यापुर्वीच
जाहीर करण्यात आले आहेत, असंही अर्थमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं.
****
जम्मू
- काश्मीरमधून कलम तिनशे सत्तरमधील तरतुदी हटवणं ही मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या
पहिल्या शंभर दिवसातली सर्वात मोठी कामगिरी असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्द्ल जम्मू इथं ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
राज्य
विधानसभेच्या आगामी निवडणूक प्रचार कालावधीत `पेड न्यूज`ला आळा घालण्यासाठी उपाय योजना
करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं यंत्रणांना दिल्या आहेत. त्याकरता राजकीय पक्षांचे
प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाचं प्रबोधन करण्याच्या सूचना भारत
निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी दिल्या. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत
प्रसार माध्यमांमधल्या जाहिरातींचं पूर्वप्रमाणीकरण, माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण
समितीच्या कामकाजाबाबत ओझा यांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे
संवाद साधला, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
****
शिवसेनेचा मेट्रोला विरोध नाही मात्र आरेतील प्रस्तावित मेट्रोशेडला
विरोध आहे , असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत
स्पष्ट केलं. मेट्रोच्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांविषयी आपण कधीही तक्रार
केलेली नाही, मात्र आरेमधील कारशेड हा वेगळा विषय आहे, या कारशेडमुळें परिसंस्था धोक्यात
येत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. यासंदर्भातलं सादरीकरण आदित्य ठाकरे यांनी
या वार्ताहरपरिषदेत केलं. कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरेतील जमीनीसाठीच
हट्ट का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईतील हरितपट्टा नष्ट करून कारशेड होऊ
देणार नाही असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
****
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचं
सतरा सदस्यांचं एक पथक आज कोल्हापुमध्ये दाखल
झालं आहे. पुन्हा अशी पूरस्थिती निर्माण होऊ
नये यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या पथकानं जिल्हाधिकाऱ्यांकडून
पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. दिवसभर
जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेटी दौऱ्यानंतर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयात प्रशासनासमवेत पथकाचे सदस्य सविस्तर चर्चा करणार आहे. आजच्या पहाणी संदर्भात
चर्चा करण्यासाठी जागतिक बँकेचं हे पथक परवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्याच्या पलूस तालूक्यात तावदरवाडी आणि भिलवडी या
दोन गावांमधल्या सव्वाशे पूरग्रस्त कुटुंबांचं
महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि राज्य शासनाच्यावतीनं अद्ययावत घरं देऊन
पूनर्वसन केलं जाणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष नयन शहा,
यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी आज या गावांना भेट दिली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
यासाठी जवळपास अकरा कोटी रुपये खर्च केले जाणार असून येत्या दिवाळीपर्यंत पन्नास टक्के
घरं पूर्णं केली जाणार असल्याचं शहा यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर इथं काल रात्री उशिरा
रेल्वेची धडक लागून दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कालच्या
परिवर्तिनी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी हे दोघं असल्याचा
अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
****
सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे
यांनी आज आपल्या पदाचा राजिनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे
त्यांनी हा राजिनामा सुपूर्द केला.
****
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील मौजे किन्होळा
आणि ब्रम्हपुरी, आव्हाडवाडी आदी भागातील रस्ते विकास कामांना आज प्रारंभ झाला. सुमारे
पाच किलोमीटरचे रस्ते याअंतर्गत तयार केले जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपयांहून
अधिक खर्च केला जाणार आहे.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत परभणीच्या शिवाजी
महाविद्यालयानं मुलींच्या स्पर्धेचं अजिंक्यपद राखलं तर नारायणराव वाघमारे महाविद्यालयाचा
संघ उपविजेता ठरला आहे. मुलांमध्ये मानवतच्या के. के. एम. महाविद्यालयाच्या संघानं
प्रथम तर गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालय संघानं द्वितीय क्रमांक पटकावला. हिंगोली
जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या मैदानावर या
स्पर्धा झाल्या.
****
No comments:
Post a Comment