आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
११ सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
मुंबईमध्ये काल रात्री कोसळलेल्या एका इमारतीच्या
ढिगाऱ्याखाली दबलेल्या चौदा जणांना वाचवण्यात आलं आहे. क्रॉफर्ड मार्केट इथं ही दूर्घटना
घडली होती. बृहण मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षानं दिलेल्या माहितीनुसार या
ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.
****
जळगाव इथल्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयात राज्य सरकारनं नियुक्ती
केलेले वकील अमोल सावंत यांच्या ऐवजी वकील प्रवीण चव्हाण यांनाच नियुक्ती द्यावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा
हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षा झालेल्या आरोपींशी सावंत यांचे
संबंध असल्याचं स्पष्ट झालं असल्यानं त्यांची नियुक्ती रद्द करावी, असं अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
सांगली आणि परिसरातील पुर आपत्ती निवारणासाठी जागतिक बँक
आणि एशियन बँकेच्या पथकाकडे तिनशे कोटी रुपये
खर्चाचा आराखडा सादर करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी
सांगितलं आहे. या वर्षी सांगली शहर आणि जिल्ह्यात एकुण एकशे चार गावांना पुराचा तडाखा बसला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या सोळा हजार चारशे तेरा घनफूट प्रतिसेकंद क्षमतेनं
पाण्याची आवक सुरू असून, धरणात सध्या अठ्ठ्याऐँशी पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के पाणी साठा आहे.
उजव्या कालव्यातून नऊशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा
विसर्ग करण्यात येत आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून चार हजार
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे धुळ्यासह नदीकिनारी राहणाऱ्या
लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
राज्य शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खात्याच्या वतीनं सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या
संस्थांचा काल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुंबईच्या ज्ञानदीप संस्थेला एक लाख रुपयांचा सहकार
महर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर या संस्थेच्या सांगली
आणि कोल्हापूर इथल्या पुरात नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांच्या
मदतीची घोषणा करण्यात आली. सहकार भूषण आणि सहकार
निष्ठ असे अडोतीस पुरस्कार यावेळी प्रदान
करण्यात आले.
*****
***
No comments:
Post a Comment