Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१२ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v नव्या मोटार वाहन कायद्यातल्या दंडाच्या तरतुदींचा फेरविचार करण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी; तरतुदींच्या
अंमलबजावणीस तूर्तास स्थगिती
v राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक आणि काँग्रेसचे नेते हषवर्धन पाटील यांच्यासह
४८ नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
v ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना राज्य शासनाचा ‘गानसम्राज्ञी
लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
v गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज गणपती विसर्जनानं सांगता
आणि
v केजच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे
केजच्या दिवाणी न्यायालयाचे निर्देश
****
नव्या मोटार वाहन कायद्यातल्या वाढीव दंडाच्या
तरतुदींचा फेरविचार करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे, परीवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना
ही माहिती दिली. जोपर्यंत या मागणीबाबत
केंद्र सरकारकडून उत्तर दिलं जात नाही, तोपर्यंत या
तरतुदींच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात
आली असल्याचं रावते म्हणाले. हा दंड भरण्यास सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या
प्रमाणावर विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नवी मुंबईत सिडकोतर्फे उभारण्यात आलेल्या मेट्रो
रेल्वेची चाचणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रधानमंत्री
आवास योजनेअंतर्गत सिडको ९५ हजार घरांची उभारणी करणार असून, त्यातल्या पहिल्या टप्यातल्या
दहा हजार घरांच्या नोंदणीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
नाईक यांच्याबरोबर महापालिकेतल्या ४८ नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान मुंबईत काल अन्य
एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील
यांनीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप देईल ती
जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं, पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
विद्यमान सरकारच्या कार्यकाळात राज्यात कायदा सुव्यवस्था
ढासळल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
औरंगाबाद शहरात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. जमावाकडून होणाऱ्या हत्या, महिलांची
असुरक्षितता या मुद्यांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं.
दरम्यान, वार्ताहरांशी
बोलतांना सुळे यांनी ज्या नेत्यांना भाजपनं चोर म्हटलं तेच नेते पक्षांतर करून भाजप
प्रवेश करत असल्याचंही सुळे यांनी नमूद केलं. काँग्रेसमुक्त` भारत नाही तर `काँग्रेसयुक्त`
भाजप झाल्याचं त्या म्हणाल्या. औरंगाबाद भेटीदरम्यान सुळे यांनी, महात्मा गांधी मिशन
संस्थेतले विद्यार्थी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद कार्यक्रमाद्वारे
चर्चाही केली.
****
राज्य शासनाचा सन २०१९ - २० साठीचा ‘गानसम्राज्ञी
लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक
कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये, मानपत्र
आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
गेल्या
दहा दिवसांपासून अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची आज गणपती
विसर्जनानं सांगता होत आहे. यासाठी प्रशासनानं
सर्व व्यवस्था केली आहे. औरंगाबाद इथं मुख्य विसर्जन मिरवणुकीला शहरातल्या
संस्थान गणपतीपासून सुरूवात होणार आहे.
परभणी महानगरपालिकेनं गणेश मूर्तींचं विसर्जन नदी किंवा इतरत्र
कोठेही न करता ते पालिकेच्या जलशुध्दी केंद्राजवळच्या हौदात करावं असं आवाहन केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या लोकनेते
गोपिनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या संचालक पदावर नियुक्ती करताना बनावट
स्वाक्षरी केल्याच्या तक्रारीवरून केजच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती सूत गिरणीचे संचालक विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरुद्ध
फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश केजच्या दिवाणी न्यायालयानं दिले
आहेत. सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली
होती. संचालक म्हणून नियुक्त करताना परस्पर आपल्या सह्या केल्याची त्यांची तक्रार आहे.
****
मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात काल
पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरात काही वेळ मुसळधार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात
औंढा नागनाथ, जवळा बाजार, आखाडा बाळापूर, नांदापूर, कळमनुरी परिसरात पावसानं हजेरी
लावली. नांदेड शहरातही काल रात्री दमदार पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातही पाऊस
सुरू असून गंगापूर धरणातून एक हजार ७७१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तर दारणा धरणातून
पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन
आयोग लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यामुळे
महापालिकेवर प्रतिमाह ६२ लाख रूपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या
कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असल्याची माहिती
सभेत यावेळी देण्यात आली.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेत नव्यानं विकास
आराखडा तयार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. सध्याच्या विकास आराखड्यास विरोध
करत शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी सर्वसाधारण सभेत अंगावर रॉकेल ओतून घेऊन
आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा ठराव कालच नगर विकास मंत्र्याकडे पाठवण्यात आला.
**** हिंगोली इथं काल वाहतूक शाखा आणि दहशतवाद विरोधी
पथकानं नगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन स्वच्छ
हिंगोलीची शपथ घेतली. हिंगोली शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवू असा संदेश वाहतुक शाखेनं यावेळी दिला.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं काल आमदार मोहन फड
यांच्या हस्ते सोनपेठ शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं. नागरिक सुचवतील ती
सार्वजनिक हिताची सर्व कामं करण्यास आपण कटिबद्ध असल्याचं फड यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं उभारण्यात आलेल्या एकशे पाच फूट
उंचीचा राष्ट्रध्वज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण काल पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांचे हस्ते झालं. युवकांनी
राष्ट्रहीत आणि निष्ठा जोपासावी, तसंच
तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगाद्वारे
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन
निलंगेकर यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद शहर - जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
केली. शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी आदोलनांचं नेतृत्व केलं
*****
***
No comments:
Post a Comment