Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 06 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०६ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
चालू आर्थिक वर्षातल्या
अखेरच्या दोन महिन्यांसाठी रिजर्व्ह बँकेनं आपल्या मौद्रिक धोरणात काहीही बदल केलेला
नाही. बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं, या रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश
टक्के तर रिव्हर्स रेपो दर चार पूर्णांक ९ दशांश टक्के कायम ठेवल्याचं, बँकेचे गव्हर्नर
शक्तिकांत दास यांनी सांगितलं. पतधोरण निर्धारण करणाऱ्या समितीनं एकमतानं हा निर्णय
घेतल्याची माहिती दास यांनी दिली. रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
****
निर्भया सामुहिक लैंगिक
अत्याचार आणि हत्या प्रकरणी, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकारनं दिलेल्या
आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. या प्रकरणातल्या चौघा
दोषींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणीला दिल्ली उच्च न्यायालयानं
दिलेल्या स्थगितीला केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, उच्च
न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती. ज्या दोषींचे दया याचिकांचे पर्याय शिल्लक
आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची मागणीही न्यायालयानं
फेटाळली होती.
दरम्यान, या प्रकरणातला एक दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
काल फेटाळून लावली. त्यामुळे आता राष्ट्रपती कार्यालयाकडे या
प्रकरणातल्या एकाही दोषीची दया याचिका प्रलंबित नाही.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणातल्या
चारही दोषींना कायदेशीर पर्याय वापरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.
****
केंद्र सरकारच्या कामाच्या गतीमुळे विविध क्षेत्रात
अनेक उद्दीष्ट पूर्ण करता आल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणाच्या आभार
प्रस्तावावर लोकसभेत झालेल्या चर्चेला ते सध्या उत्तर देत आहेत. आपल्या सरकारनं घेतलेल्या
अनेक निर्णयांचा तसंच विविध योजनांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
****
व्यापारिक संबंधांनुसार आपल्या मालमत्तांचा इतर कंपन्यांना
वापर करू देणं, ही सामान्य बाब असल्याचं, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर
देत होते. भारतीय संचार निगम लिमिटेड आणि महानगर संचार निगम लिमिटेड - बीएसएनएल आणि
एमटीएनएल या दोन्ही कंपन्या आपले टॉवर इतर मोबाईल कंपन्यांना भाडेतत्वावर वापरण्यास
देतात, याबाबत राऊत यांनी प्रश्न विचारला होता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी परवा शनिवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर
निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. आज प्रचाराच्या
अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा
प्रयत्न होत आहे.
****
पाच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना राष्ट्रीय संस्थांचा दर्जा द्यायला केंद्रीय
मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. सूरत, भोपाळ, भागलपूर, आगरतळा आणि रायचूर मधल्या या संस्था आहेत, असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर
बातमीदारांना सांगितलं. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभ्या राहिलेल्या या संस्थांमधून आता बी टेक, एम टेक आणि पीएचडी ची पदवी मिळवता येणार आहे.
****
राज्यात गुटखाबंदीची कडकपणे अंमलबजावणी
करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दिले आहेत. गुटखा, पानमसाला,
सुगंधीत सुपारी यासारख्या प्रतिबंधित
पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात
मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. होती
त्यावेर्ळी त्यांनी हे निर्देश दिले. या प्रतिबंधित व्यापाराच्या सूत्रधारांना
‘मोका’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत
विचार करण्यात येईल असंही पवार यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी
गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून
येईल, तिथल्या अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी तसंच
पोलिस अधिकाऱ्यांना अणि गुटखा कंपनीच्या मालकांना जबाबदार धरून कारवाई करण्याचे
निर्देश पवार यांनी दिले.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या निदानासाठी मुंबई आणि
नागपूर इथं विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा
सुरु करण्याला भारतीय आर्युविज्ञान आणि संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं निदान करण्याकरता
रुग्णालयात दाखल झालेल्यांचे नमुने पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे
तपासणीसाठी पाठवले जात आहेत. या सुविधेचा विस्तार करण्यासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय
मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथं प्रयोगशाळा
कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते
मालटेकडी दरम्यान, दुहेरीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी, आजपासून चौदा फेब्रुवारीपर्यंत
लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या
असून काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची
नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात विविध क्षेत्रातल्या
योगदानासाठी दिला जाणारा गोविंद सन्मान यंदा नकाशाकार पंडितराव देशपांडे यांना जाहीर
झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि शाल या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या २८
मार्चरोजी औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
गोविंद देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment