Thursday, 6 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.02.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 कोरोना विषाणू संसर्गाच्या निदानासाठी मुंबई आणि नागपूर इथं विषाणू संशोधन आणि  निदान प्रयोगशाळा सुरु करण्याला भारतीय आर्युविज्ञान आणि संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं निदान करण्याकरता रुग्णालयात दाखल झालेल्यांचे नमुने पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले जात आहेत. या सुविधेचा विस्तार करण्यासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथं प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १२ हजार ७९९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या एकूण ११९ प्रवाशांपैकी ४० जणांचा १४ दिवसांचा आरोग्य विषयक चौकशी करणारा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. अन्य प्रवाशांचा पाठपुरावा सुरु आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
****

 देशातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ कोटींहून अधिक मृदा आरोग्य पत्रिकेचं वितरण करण्यात आलं आहे. जमिनीतली पोषण तत्व कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं, शेतातल्या मातीचं परीक्षण करून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्र देण्याची योजना केंद्र सरकारनं २०१५ मध्ये सुरु केली आहे
****

 दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी परवा शनिवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.  
****

 दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळून लावली. त्यामुळे आता राष्ट्रपती कार्यालयाकडे या प्रकरणातल्या  काही दोषीची दया याचिका प्रलंबित नाही.

 दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणातल्या चारही दोषींना कायदेशीर पर्याय वापरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.
****

 भारतीय रिझर्व्ह बॅंक चालू आर्थिक वर्षासाठी आज आपलं अंतिम मौद्रिक धोरण जाहीर करणार आहे. बँक दर दोन महिन्यांनी आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन मौद्रिक धोरणाची घोषणा करत असते.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...