Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Ø घरगुती वीजग्राहकांना शंभर युनीटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्यसरकारचा विचार
Ø प्राप्ती कराच्या नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्द केल्या असल्या तरी काही सवलती कायम राहणार - केंद्रीय अर्थमंत्री
आणि
Ø मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
****
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काल मुंबईत वर्षा या आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. २१ फेब्रुवारीपासून या योजनेच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरूवात होईल. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
घरगुती वीजग्राहकांना शंभर युनीटपर्यंत वीज मोफत देण्याच्या प्रस्तावावर राज्यसरकार विचार करत आहे. ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. दिल्ली सरकारच्या धर्तीवर ही योजना राबवण्याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यावरच पुढचा निर्णय अवलंबून असेल, असं राऊत यांनी सांगितलं. कृषीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावरही सरकार विचार करत असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
****
राज्यभरातल्या राष्ट्रीयकृत बँका, रेल्वे तसंच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीनं वापर करावा, अशी मागणी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारची प्राधिकरणं आणि कार्यालय त्रि-भाषा सूत्राचं पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे.
****
हिंगणघाट इथल्या जळीत प्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटर द्वारे दिली आहे.
दरम्यान, ‘मनोधैर्य’ योजनेतून पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
****
एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका बनवल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल राज्यसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. या योजनेअंतर्गत अनुदानित धान्य मिळवण्यासाठी देशभर जुन्या शिधापत्रिकाच वैध राहतील, असं त्यांनी सांगितलं. नवीन शिधापत्रिका बनवण्याबाबत सामाजिक माध्यमांवर येणाऱ्या बातम्या निराधार असून, अशा बनावट शिधापत्रिकांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशीचे संकेत त्यांनी दिले.
****
प्राप्ती कराच्या नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्द केल्या असल्या तरी काही सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत काल उद्योग प्रतिनिधी, व्यापारी वर्ग, गुंतवणूकदार तसंच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थमंत्र्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कर प्रणाली अधिकाधिक सुटसुटीत आणि सहज सोपी व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, त्या दृष्टीनेच नवीन कर रचनेचा पर्याय देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विमा महामंडळाच्या प्रारंभिक सार्वजनिक विक्री प्रस्ताव -आयपीओमुळे अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदार याकडे आकर्षित होतील, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल. विधानसभेच्या ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणी येत्या मंगळवारी ११ फेब्रुवारीला होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
विद्यमान सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. परभणी इथं काल राज्यस्तरीय कृषी संजीनवी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मराठवाड्यातल्या नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं या अपेक्षेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती, असं ते म्हणाले.
या महोत्सवानंतर वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, राज्यातलं सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याकडून होत नसून, सरकार स्वतःच्या कर्मानेच पडेल, अशी टीका केली. सरकारनं मुंबईतल्या नाईट लाईफ पेक्षा शेतकऱ्याच्या लाईफची चर्चा करावी, असंही ते म्हणाले.
दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून, फडणवीस यांनी काल या विद्यार्थ्यांची अनौपचारिक भेट घेतली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा निर्यातीला परवानगी मिळावी यासाठी काल लासलगाव इथं विविध शेतकरी संघटनांनी बाजार समितीच्या आवारात जलकुंभावर चढून आंदोलन केलं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद नगर परिषदेच्या दोन प्रभागाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षानं विजय मिळवला आहे. जिल्ह्यात पाच पालिकांच्या पोटनिवडणुकीत ६ पैकी पाच जागांवर कॉंग्रेस पक्ष तर एक जागा अपक्षानं जिंकली आहे. बिलोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ अ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार यशवंत गादगे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ७० मतं आधिक घेऊन विजय मिळवला.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अब्दुल गफार अब्दुल सत्तार विजयी झाले. गफार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएम पक्षाचे उमेदवार साबेर चाऊस यांचा एक हजार ८६६ मतांनी पराभव केला. नायगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार हणमंत बोईनवाड २०७ मतांनी विजयी झाले.
परभणी महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या खान शहनाजबी या विजयी झाल्या. त्यांना चार हजार २७९ मतं मिळाली.
****
सांगली महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी भाजपचेच आनंदा देवमाणे हे विजयी झाले आहेत. गीता सुतार यांना ४३ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना ३५ मतं पडली.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणुकीचा निकालही काल जाहीर झाला, भाजपच्या पल्लवी जाधव यांनी दोन हजार ९१५ मतं मिळवत, आपल्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या अनिता दळवी यांच्यावर एक हजार ७१२ मतांनी विजय मिळवला.
****
लातूर इथं विभागीय महसूल आणि क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धांचं उद्धाटन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते काल झालं. या स्पर्धेत औरंगाबाद, परभणी, जालना बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या जवळपास चौदाशे खेळाडूंनी विविध १४ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला आहे.
****
सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या भारतात सध्या मात्र जातीय, धार्मिक भावना अत्यंत टोकदार बनल्याचं माजी उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.एन. पठाण यांनी म्हटलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचं उद्धाटन डॉ पठाण यांच्या उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. देश सामाजिक दुभंगतेच्या उंबरठ्यावर असून, संत साहित्याचा अभ्यास हाच यावर उतारा ठरेल असं पठाण यांनी यावेळी नमूद केलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या भोसी शिवारात पोलिसांनी काल अफूच्या शेतीवर छापा टाकून झाडे जप्त केली. कांदा -लसणाच्या शेतामध्ये अफूचे सहाशे ते सातशे झाडं लावण्यात आली होती. या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवंलं आहे.
****
उस्मानाबाद इथं काल आशा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलतांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी आशा आरोग्य सेविकांच्या कार्याचा गौरव केला, या आशा सेविकांनी सुदृढ सशक्त आणि निरोगी भारत निर्मितीसाठी काम करत असतांनाच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं असं आवाहन कांबळे यांनी केलं. आगामी काळात या सेविकांना विमा संरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
****
सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळीच्या वतीनं लातूर इथं उद्या नऊ फेब्रुवारी रोजी रन फॉर मेरीटचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजातल्या गुणवत्तेवर होणाऱ्या अन्यायाची जनजागृती व्हावी, गुणवतेला न्याय मिळावा म्हणून रन फॉर मेरिट हा कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी ३० शहरात आयोजित करण्यात आला आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज ऑकलंड इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment