Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरु असून, दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीलाच पसंती दिली असल्याचं स्पष्ट झालं आहे. आम आदमी पार्टीनं सत्तरपैकी पस्तीस जागांवर विजय मिळवला असून अठ्ठावीस जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनं तीन जागा जिंकल्या असून चार जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचं अभिनंदन केलं आहे. दिल्लीतील जनतेनं `मन की बात` नव्हे तर `जन की बात` आता देशात चालणार, हे दाखवून दिलं असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. या निकालांमुळे भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जावी आणि दोन हजार साध्या बस गाड्या खरेदी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
****
माता, मातृभाषा आणि मातृभूमी प्रती आदर बाळगणं ही यशाची सुरवात आहे, हे स्मरणात ठेऊन आपल्या नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहत युवापिढीनं उच्च ध्येयासक्ती ठेवून देशाला बलशाली बनवावं, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या काळात संधी विस्तारत असून आपल्या कौशल्यांचा विकास करत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचा देशाचा आणि पालकांचा नावलौकीक वाढवण्याच्या ध्येयाने कृतीशील व्हावं, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा. अश्विनीकुमार नांगिया दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील जलदूत संस्थेनं लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन तसंच लोकार्पण सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज करण्यात आला. पर्यावरणाचा असमतोलपणा आणि मराठवाड्यासारख्या अवर्षण भागात पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकानं जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
****
विद्यापीठातील कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचं उद्घाटनही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झालं.
****
परभणी ते मुदखेड रेल्वे पटरी दुहेरीकरणाच्या कामामुळे लिंबगाव - मिरखेल दरम्यान १८ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येत असलेल्या लाईन ब्लॉक मुळे काचीगुडा - नगरसोल- काचीगुडा प्रवासी रेल्वे गाडीत अंशत:बदल करण्यात आला आहे. ही गाडी आजपासून शुक्रवारी १४ फेब्रुवारीपर्यंत नगरसोल-परभणी-नगरसोल दरम्यान पूर्ववत धावणार आहे.
****
औरंगाबाद इथं भारत संचार निगम लिमिटेड - बीएसएनएलच्या कर्मचाऱी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सिडकोतल्या कार्यालयासमोर आज निदर्शनं केली. थकीत असलेलं वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी ही निदर्शनं होती.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या येत्या एकवीस फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयांसह बँकांमध्ये लावण्यात येतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एक लाख नव्वद हजार ६८८ शेतकरी पात्र ठरले असून, कर्जमाफीची रक्कम सुमारे एक हजार २३९ कोटी रुपयांपर्यंत आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ दोन हजार १५१ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न करणं बाकी असल्याचं जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
संत नरहरी महाराज यांच्या पूण्यतिथीनिमित्त आज नांदेड शहरात सराफा संघटनेतर्फे संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
****
नांदेड इथं विविध महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज हिंगणघाट जळित कांड प्रकरणी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेतली. तुळजापूर इथं अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं या प्रकरणी निषेध नोंदवण्यात आला.
****
न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवीस क्रिकेट सामन्यात पाच गडी आणि सतरा चेंडू राखून विजय मिळवत मालिका तीन –शून्य अशी जिंकली आहे. यजमान न्यूझीलंड संघासमोर `बे ओव्हल` मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतानं २९७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment